नवी दिल्ली: केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी नन बलात्कार प्रकरणात जालंधरचे माजी बिशप फ्रँको मुलक्कल यांच्या निर्दोष मुक्ततेविरुद्ध राज्य सरकारच्या अपीलावर नोटीस बजावली. याप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन आणि न्या. सी. जयचंद्रन यांच्या खंडपीठाने राज्य सरकारने केलेले अपील मान्य केले आहे. त्यानुसार न्यायालयानेे बिशप मुलक्कल यास नोटीस बजावली आहे.
मुलक्कल याची निर्दोष मुक्तता करणे हा पुराव्यांचा सखोल अभ्यास न केल्याचा परिणाम असल्याचा दावा राज्य सरकारतर्फे दाखल याचिकेमध्ये करण्यात आला आहे. कनिष्ठ न्यायालयाने दि. 14 जानेवारी रोजी एका ननवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या जालंधर प्रांताचे माजी बिशप फ्रँको मुलक्कल यांची निर्दोष मुक्तता केली होती. यावेळी मुलक्कल यांच्यावरील आरोपांविषयी सबळ पुरावा आढळल्या नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते.
मात्र, त्याविरोधात पीडित ननतर्फे उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. जून 2018 साली मुलक्कल हे पंजाबमधील जालंधर प्रांताचे बिशप असताना ननने त्यांच्याविरोधात कोट्टायम जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार केली होती. त्यामध्ये मुलक्कल यांनी आपल्यावर 2014 ते 2016 दरम्यान 13 वेळा बलात्कार केल्याचे म्हटले होते.