विद्यार्थ्यांना घेऊन तब्बल पाच तास स्कूलबस बेपत्ता

05 Apr 2022 11:52:44
 
 
scl
 
 
मुंबई : मुंबईतील सांताक्रूझ येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल दुपारी ही १२ वाजता सुटल्यानंतरही बराच वेळ अनेक विद्यार्थी घरी पोहचले नव्हते. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने अनेकांनी शाळा गाठली. तब्बल पाच तासांनंतर विद्यार्थ्यांसह स्कूलबस शाळेत दाखल झाली. परंतु पाच तासांपर्यंत स्कूलबस नेमकी कुठे होती, यासंबंधी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा केल्याबद्दल कारवाई करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी दिले आहेत.
 
पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना ने-आण करणारी स्कूलबस ही नेहमीप्रमाणे सोमवारी (ता. ४) दुपारी १२ वाजता शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन निघाली. पण साधारण तासाभरात घरी पोहोचवणारी मुले बराच वेळ उलटून गेला तरीदेखील घरी न पोहोचल्यामुळे पालकांनी शाळेत विचारणा केली. परंतु शाळेतून स्कूलबस दुपारी १२ वाजताच निघाली असल्याचे सांगण्यात आले. तसेच स्कूलबस चालकाचा मोबाईलही बंद असल्याने पालकांनी शाळेत धाव घेतली. शाळेच्या प्रशासनालाही विद्यार्थ्यांसह स्कूलबस नेमकी कुठे आहे याबाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती.
 
तब्बल पाच तासांनंतर विद्यार्थ्यांना घेऊन स्कूलबस पुन्हा शाळेत पोहोचली. मात्र या कालावधीत बस नेमकी कुठे गेली होती, बसमध्ये काही बिघाड झाला होता का, याबाबत अद्यापही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. दरम्यान, शिक्षण विभागाने या घटनेची गंभीर दखल घेत सदर प्रकार हा अत्यंत गंभीर असून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि अहवाल सादर करावा, असे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी शाळा प्रशासना दिले आहेत.
Powered By Sangraha 9.0