उज्जैन : गीतकार मनोज मुंतशीर यांनी मुघल शासकांना लुटारु म्हटले आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे आयोजित ‘गौरव दिवस’ कार्यक्रमात मुघलांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी आपल्याला चुकीचा इतिहास शिकवण्यात आल्याचे म्हटले. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ‘व्हायरल’ होत आहे. "आपल्याला सांगण्यात आले की, शेरशाह सुरी, अकबर आणि खिलजी यांच्यासारखे शासक नसते तर आपण झाडांची पानं लावून नाचलो असतो, पण या मूर्खांना कोणा सांगणार की यांच्या आधी इथे मोहेंजदडो पण होते,” असे म्हणत मनोज यांनी हिंदूविरोधी वक्तव्य करणार्यांवर निशाणा साधला.
यावेळी त्यांनी कार्यक्रमात उपस्थित लोकांना सांगितले की, “हजारो वर्षे आधी जेव्हा मुघल नव्हते तेव्हा आमच्याकडे महाकाल मंदिर तयार झाले होते. मुघल दोन विटाही जोडणे शिकलेले नव्हते, तेव्हा आमच्या क्षत्रिय राजांनी उभारलेली मंदिरे होती. अजिंठा आमच्याकडे आहे, एलोरा आमच्याकडे आहे आणि कोणार्कही आहे. कदाचित तुम्हा लोकांना माहिती नाही, पण जेव्हा आपल्या देशात 35 लाख लोकांनी उपासमारीमुळे आपला जीव गमावला होता तेव्हा एक बादशाह तेव्हाचे नऊ कोटी रुपये एका थडग्यावर खर्च करत होता. त्या नऊ कोटी रुपयांनी देशाची उपसमार थांबली असती, एका बाजूला आपण विक्रमादित्य यांना पाहिले आणि एका बाजूला महान लुटारु, दरोडेखोरांनाही पाहिले हे आपले दुर्भाग्य आहे. ताजमहाल निर्माण केला, तर ठीक आहे, पण आता आपल्याला तो प्रेमाचे प्रतीक आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करत केला जात आहे. या राजांनी आपल्या गरिबीची खिल्ली उडवली आणि आता त्याला प्रेमाचे प्रतीक म्हणत आहेत,” असे ते म्हणाले.
“प्रेमाचे प्रतीक जाणून घ्यायचे असेल तर चित्तोड किल्ल्याचा इतिहास जाणून घ्या जिथे माता पद्मिनीने राजा रतन सिंह यांच्यासाठी अग्नीत स्वत:ला झोकून दिले. प्रेम समजून घ्यायचे असेल, तर प्रभू श्रीरामाने सीतेसाठी समुद्रात पूल उभारला त्याचा अभिमान बाळगा. हे प्रेमाचे प्रतीक आहे, ” असे मनोज मुंतशीर म्हणाले.
यावेळी त्यांनी ‘सलीम-अनारकली आणि जोधा-अकबर यांच्या प्रेमाच्याही खोट्या गोष्टी सांगितल्या जात असल्याचे म्हटले. आता या सर्व दंतकथा मिटवण्याची वेळ आली आहे. तुमच्याकडे तुमचे नायक आहेत आणि आता असे मागितलेले नायक नकोत. प्रेम शिकायचे असेल तर प्रभू श्रीरामाककडून शिका, असा सल्ला त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.