चिटणीसांच्या साहाय्याने बॅकडेटेड प्रस्ताव मंजुरीस ! ; चहल साहेब जागे व्हा

04 Apr 2022 23:41:07
 
Nitesh Rane
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिकेच्या कारभार संदर्भात दररोज आरोप आणि प्रत्यारोप हे होत असतात. त्याचाच प्रत्यय सोमवार, दि. ४ एप्रिल रोजी झालेल्या एका आरोपावरून आला आहे. भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी महापालिकेद्वारे मंजुरीस आणल्या जात असलेल्या प्रस्तावांवरून पुन्हा एकदा पालिकेच्या कारभारावर आरोप केले असून आयुक्त इकबाल सिंह चहल यांना जागे होण्याचे आवाहन केले आहे.
 
 
 
सोमवारी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून केलेल्या ट्विटमध्ये आ. नितेश राणे म्हणाले की, 'मुंबई महापालिकेतील स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीमध्ये सुमारे सात हजार कोटींचे एकूण ३७० प्रस्ताव हे सादर करण्यात आले होते. या प्रस्तावांमध्ये ठेकेदारांशी मांडवली करण्यासाठी विमल अग्रवाल हे स्वतः स्थायी समितीचे अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांच्या दालनात सकाळी ११ वाजल्यापासून उपस्थित होते. मात्र, प्रस्तावांच्या संदर्भात झालेल्या बोलणीत काही गोष्टी फिसकटल्याने सुमारे १२३ प्रस्ताव हे नॉट टेकन अर्थात विचारार्थ घेण्यात आले नव्हते. मात्र, विचारार्थ न घेण्यात आलेले ते १२३ प्रस्ताव आता चिटणीसांच्या साहाय्याने बॅकडेटेड म्हणजे जुन्या तारखा नमूद करून आता मंजूर केले जात आहेत,' असा गंभीर आरोप केला आहे. तसेच, या घटनांवर पायबंद घालण्यासाठी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी जागे व्हावे,' असे आवाहन देखील आ. नितेश राणे यांनी महापालिका आयुक्तांना केले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0