उत्तर बंगालमध्ये 3 कांगारूंची सुटका: तस्करांनी फेकून दिलेले २ मृतदेह आढळले.

04 Apr 2022 19:32:39
Kangaroo





मुंबई (प्रतिनिधी)
- उत्तर बंगालमधील जलपाईगुडी येथून तीन कांगारूंची सुटका करण्यात आली आहे. वन्यजीव तस्करांकडून तस्करी करण्याआधीच वन अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची सुटका केली. शुक्रवारी (१ एप्रिल रोजी) स्थानिकांना सिलीगुडीजवळ एका कांगारूचा मृतदेह सापडला. शनिवारी सकाळी स्थानिकांनी दुसऱ्या कांगारूचा मृतदेह पाहून वनविभागाला कळवले.
 
“तिघेही पौगन्डावस्थेत होते आणि त्यांची तब्येत खूपच खराब होती. त्यांची सुटका करून उपचारासाठी सरकारच्या वन्य प्राणी उद्यानात पाठवण्यात आले. या महिन्याच्या सुरुवातीला आम्ही उत्तर बंगालमधील अलीपुरद्वार जिल्ह्यातून एका कांगारूची सुटका केली होती,” असे पश्चिम बंगालचे मुख्य वन्यजीव वॉर्डन देबल रॉय यांनी सांगितले. शुक्रवारी, दोन कांगारूंना सिलीगुडीजवळील जलपाईगुडी जिल्ह्यातील गजोल्डोबा येथून वाचवण्यात आले, तर आणखी एकाला फराबारी येथून वाचवण्यात आले. ही गावे सिलीगुडीजवळील जलपाईगुडी जिल्ह्यात सुमारे 40 किमी अंतरावर आहेत.
 
 
"कांगारूंची तस्करी होणार असल्याची माहिती आमच्याकडे होती. त्यानुसार नाकाबंदी करून तपासणी करण्यात येत होती. नंतर कांगारू रस्त्यावर दिसले. ते बहुधा तस्करांनी फेकले असावेत . तपास सुरू करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही", असे एका वन अधिकाऱ्याने सांगितले. बैकुंठपूर वनविभागाचे विभागीय वन अधिकारी (डीएफओ) हरी कृष्णन यांनी सांगितले की, सुटका करण्यात आलेल्या कांगारूंना सिलीगुडी येथील बंगाल सफारी प्राणीसंग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
  
म्यानमार आणि ईशान्येकडून भारतात कांगारूंची तस्करी होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. भारतातील स्थानिक नसलेल्या प्रजातींना वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत संरक्षण दिले गेले नसले तरी, वन्यजीव आणि वनस्पतींच्या लुप्तप्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशना अंतर्गत काही प्रजाती सूचीबद्ध करण्यात आल्या आहेत. या प्रजातींचा ताबा असलेल्या मालकांना 'परिवेश' या पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या पोर्टल वर त्या घोषित कराव्या लागतात. त्याच बरोबर लोकसभेत सादर झालेल्या वन्यजीव (संरक्षण) सुधारणा विधेयक, २०२१ कायद्यानुसार संरक्षित प्रजातींची संख्या वाढवण्याचा प्रयत्न सरकार कडून. जून २०१९ मध्ये कोलकाता येथे वन्यजीव तस्करांपासून सिंहाच्या पिलाची सुटका करण्यात आली होती.
Powered By Sangraha 9.0