संयुक्त महाराष्ट्राचे कलादालन आजही अंधारात!

30 Apr 2022 17:14:28


Uddhav Thackeray - Nitesh Rane




मुंबई : "स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची उभारणी करण्यात आली. त्याला आता ३० एप्रिल रोजी १२ वर्षे पूर्ण होतील परंतु या कलादालनाकडे आपण हेतूपूरस्परपणे दुर्लक्ष करत आहात.१ मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर संयुक्त महाराष्ट्र कलादानवर विद्युत रोषणाई करावी, दालन पर्यटकांना खुले करावे," अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
 
 
 
नितेश राणेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, "महाराष्ट्र दिन तोंडावर आलेला असताना हे कलादालन अद्यापही पर्यटकांसाठी खुले करण्यात आलेले नाही. इथे कुठली रंगरंगोटी केली गेलेली नाही. एवढंच नाही तर कलादालनावर विद्युत रोषणाई करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर करून सहा महिने उलटले तरी कलादालनावर विस्मरणाचा अंधार पडलेला आहे. उलटपक्षी या कलादालनाचा उपयोग अधिकाऱ्यांच्या पार्किंगसाठी व मिटींगासाठी केला जातोय. स्व.बाळासाहेबांच्या हेतूला बाजूला सारत स्वत:च्याच फोटोग्राफीसाठी आपण यातील एक मजला अडवलेला आहेच. आता संपूर्ण कलादालनच ठाकरे कुटुंबियांची प्रायव्हेट प्रॉपर्टी करण्याचा घाट तर आपण घालत नाहीयेत ना? अशी खदखद आता सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनात आहे. सर्वच पातळ्यांवर आपण कलादालनाचा सर्वसामान्यांना विसर पडावा यासाठीची खबरदारी घेतली जात आहे.", असा आरोपही नितेश राणेंनी या पत्रातून केला आहे.
 
 
  
पुढे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत नितेश राणे लिहितात, "पर्यटन खाते युवराजांकडे असतानाही कलादालनाचा समावेश महाराष्ट्र पर्यटन विकास कॉर्पोरेशनला सुचीत का गेला जात नाही? यावरून हेच स्पष्ट होते आहे की आपली या कलादालनाबाबत असणारी मनिषा काही वेगळीच आहे. आपण जो महाराष्ट्राच्या अस्मितेचा उसना राग आळवता किमान त्याच्याशी तरी प्रामाणिक राहन १ मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर संयुक्त महाराष्ट्र कलादानवर विद्युत रोषणाई करावी, दालन पर्यटकांना खुले करावे, याचा पर्यटन सुचीत समावेश करावा आणि आपला हेतूवर उठलेलं शंकेच मोहोळ शांत करावं.", अशी मागणीही नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0