काकांचा चेला!!!

03 Apr 2022 21:05:31

uddhav
त्यांच्या मदतीने साहेबांना ‘सीएम’ केले. (पुढे मागे त्यांच्या मदतीने मला पण ‘सीएम’ व्हायचे आहे. कंबख्त दिल मानता नहीं) तर, ‘सीएम’ बनण्याच्या जुगाडसाठी मी साहेबांसमोर अगदी झुकून राहतो. अगदी त्यांना ‘भीष्म पितामह’ सुद्धा म्हणालो. हसता काय? जसे साहेबांना ‘कोविडोलॉजिस्ट’ म्हणतात, तसेच काकांना पण ‘भीष्म पितामह’ म्हणालो. काय म्हणता भीष्म कौरवांच्या बाजूने होते? घ्या म्हणजे, आम्ही कौरव का? काय म्हणता, डोळे असूनही राज्याच्या समस्या न दिसणारा धृतराष्ट्रासारखा राजा पण आमच्याकडे आहे? आणि त्या धृतराष्ट्राला महाभारत सांगणारा (‘त्या’ संजयसारखा खरा नव्हे) स्वत:च्या मनाला वाट्टेल ते सांगणारा ‘संजय’ पण आहे? ...तर काय म्हणत होतो की, काका भीष्म पितामह आहेत. अक्षरश: काट्यावर त्यांचं जगणं आहे. आघाडीतल्या कुठच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा आणि नीतिभ्रष्टतेचा काटा कुठून टोचेल, हे मला तर काय, काकांना पण कळतच नाही. एक काटा काढावा, तर दुसरा हजरच! तर अशा नेत्यांच्या काटेरी भ्रष्टाचाराच्या कथित प्रकरणांवर आमचे भीष्म आहेत. मग उगीच त्यांना भीष्म म्हणालो का? काय म्हणता, ते ‘कमळवाले’ म्हणतात की, आम्हाला शकुनीमामामुळे सत्ता मिळाली? काय म्हणता? शकुनी काय? भीष्म काय? ते सोबत तर कौरवांच्याच आहेत ना? जाऊ द्या जाऊ द्या... कौरव वगैरे बोलू नका... मग मला मौनव्रत धारण करावं लागेल. एकवेळ मासा पाण्यात राहायचं विसरेल, पण मी बोलल्याशिवाय राहू शकतो का? जातिधर्माचे नव्हे, पण गुणावाणाचे माझे बंधू सध्या तुरूंगात नवाबी करत आहेत. त्यांना पण असेच बोलल्याशिवाय राहवत नव्हते. जाऊ दे. मी कशाला त्याची आठवण काढतो. ते नसले, तरी त्यांचा छोटा धमाका अधूनमधून मुंब्र्यामध्ये फुसके बॉम्ब सोडतो. हं! तर नवाब काय? जितू काय? दोघेही भीष्म पितामहांचे चेले. तसे तर देशमुख पण चेलेच होते म्हणा आणि भुजबळ पण चेलेच आहेत. काय म्हणता, काकांच्या चेल्यांच्या कुंडलीत आधी राजयोग आणि पुढे कसले कसले भोग येतात? काय म्हणता, आता लोक मला काकांचा चेला म्हणतात? म्हणजे काकांच्या चेल्यांच्या आणि भीष्म पितामहांच्या कौरवांचे जे झाले तेच आमचे होणार? काका नाही, नाही साहेब, नाही काका वाचवा... वाचवा मॅडम!!!
नको मला युपीएचे नेतृत्व!
 
तिकडे त्याने मला भीष्म पितामह बनवले आणि इथे मला काटे टोचू लागले. तो तर तो, तिकडे दिल्लीत मॅडमच्या एरियात आमच्या लोकांना काय गरज होती का बोलायची? काय तर म्हणे, शरद पवारांना युपीएचे नेता बनवा. असे उघड उघड कुणी बोलते का? आमच्या पक्षातली पोरं काय शिकली आमच्याकडून? अरे असं बोलून दिल्लीतल्या मॅडम, कोलकात्यातल्या मॅडम, ते ‘केसीआर’ आणि खुद्द महाराष्ट्रातले आमचे नवे मानलेले पुतणे यांना त्यांनी खडबडून जागे केले.दिल्लीला यांचे संमेलन ठेवले. म्हटलं तरुण पोरं आहेत. चला, पोरंटोरं दिल्ली बघतील. यांनी ठराव करून आमच्या खोट्या मित्रातल्या शत्रूलाच जागं केलं. त्याचं काय आहे? माझं तरी शत्रूशी युद्ध नसते. माझे कटकारस्थान माझ्या सोबत्यांसोबतच असते. सध्या सोबत असलेल्या सगळ्यांना कामाला लावून आपण त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्याच दुसर्‍या सोबत्यांवर निशाणा तरी साधायचा किंवा आपल्याच सोबत्यांच्या पाठीत खंजीर तरी खुपसायचा. या राजकारणात मी अजिंक्य आहे. पण माझ्या पक्षात राहूनही या पोरांना हे राजकारण समजत नाही? ते ‘मन की बात’ वगैरे उघडपणे मोदी करतात. मी नाही. बरं, पोरांनी ठराव केला की, यापुढे युपीएचे नेतृत्व शरद पवारांनी करावे. त्यावेळी मला वाटले की, युवा कार्यकर्ते माझ्या मनातलं ओळखून म्हटले. यावर माझ्या सोबतची लोक समर्थन देतील. म्हणतील, आम्हाला काही हरकत नाही. पण कसलं काय? ना दिल्लीच्या इटलीवाल्या मॅडम, ना त्यांचे राजकुमार, ना कोलकात्याच्या मॅडम, ना तेलंगणचे केसीआर.. कुणी कुणी म्हणाले नाही की, “हो... हो... ‘युपीए’चे नेतृत्व आता शरद पवारच करतील. त्यांच्यासारखे हुशार, कर्तबगार, महान, लोककल्याणकारी, ‘जाणता राजा’ कुणीच नाही. त्यामुळे शरद पवारसाहेबांनाच युपीएचे नेतृत्व करू द्या.” देशात तर देशात महाराष्ट्रातही असेच? ना माझ्या सख्ख्या पुतण्याला, ना माझ्या मानलेल्या पुतण्याला... गेला बाजार पटोले तरी? कुणीही म्हटले नाही की, शरद पवार साहेबांनी युपीएचे नेतृत्व करावे. आता मला नकोच ते युपीएचे नेतृत्व. काय म्हणता? युपीएचे नेतृत्व करून असे मी काय मोठे दिवे लावणार? मी युपीएचे नेतृत्व केले असते, तरी २०२४ साली येणार तर मोदीच... जाऊ दे ना. नकोच मला युपीएचे नेतृत्व!
 
 
 
Powered By Sangraha 9.0