प्रशांत अद्यापही ‘किशोर’च!

29 Apr 2022 10:37:07

prashant
 
 
 
काँग्रेस पक्ष आणि प्रशांत किशोर यांचे ‘डिल’ न होण्यामागे प्रशांत किशोर यांची अतिमहत्त्वाकांक्षा आणि अतिआत्मविश्वास कारणीभूत ठरल्याचेच आता सिद्ध झाले आहे. कारण, काँग्रेस पक्षाची धोरणनिश्चिती करण्याची ताकद प्रशांत किशोर यांना आपल्याकडे हवी होती. थोडक्यात, प्रशांत किशोर यांना नवे अहमद पटेल बनण्याची इच्छा होती. मात्र, त्याद्वारे प्रशांत किशोर हे एकाचवेळी वैयक्तिक आणि प्रादेशिक पक्षांचा अजेंडा काँग्रेसच्या नावे चालवणार असल्याचेही स्पष्ट होते.
 
 
 
काँग्रेसचे राष्ट्रीय चिंतन शिबीर दि. १३ ते १५ मे दरम्यान राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यात होणार आहे. या चिंतन शिबिरात देशभरातील काँग्रेस नेते जमणार आहेत. सर्व खासदार, आमदार, प्रदेश प्रभारी, प्रदेश सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांच्या सहभागामुळे या शिबिरात काँग्रेसच्या दुरवस्थेबद्दल सविस्तर चर्चा होणे अपेक्षित आहे. या चिंतन शिबिरात सहा ठराव पारित होणार आहेत. या प्रस्तावांसाठी सहा वेगवेगळ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली राजकीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्या पक्षाचा नवीन अजेंडा म्हणजेच ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करतील. विशेष म्हणजे, या समित्यांमध्ये गांधी कुटुंबावर सातत्याने टीका करणार्‍या ‘जी २३’ या असंतुष्ट गटांमधील नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये संघटनात्मक, राजकीय, युवक, आर्थिक, सामाजिक विकास आणि कृषी या समित्यांचा समावेश असून त्यामध्ये गुलाम नबी आझाद, शशी थरूर, मुकुल वासनिक, भुपेंदर हुड्डा आणि आनंद शर्मा आदी असंतुष्ट नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या शिबिराच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष एकसंध असल्याचा संदेश प्रामुख्याने काँग्रेसवर कुरघोडी करण्यास उत्सुक अशा प्रादेशिक पक्षांना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून सतत नाराज असलेल्या राजस्थानमधल्या सचिन पायलट यांनाही यामध्ये स्थान देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीस अद्याप दोन वर्षांचा कालावधी असला तरी काँग्रेस पक्ष आतापासूनच त्याच्या पूर्वतयारीस लागला आहे. मात्र, पक्षाची कार्यशैली पाहता लोकसभा निवडणुकीपर्यंत हा उत्साह कितपत टिकून राहील, याविषयी शंका आहे.
 
 
काँग्रेस पक्षाच्या या चिंतन शिबिरामध्ये कदाचित नेतृत्वाविषयीही चर्चा केल्याचा भास निर्माण केला जाऊ शकतो. कारण, दर चार ते सहा महिन्यांनी नेतृत्वबदलाची चर्चा निर्माण करणे आणि अखेरीस गांधी कुटुंबाकडेच नेतृत्व ठेवायचे; याची आता सवय झाली आहे. त्यामुळे यावेळीही नेतृत्वबदलाविषयी चर्चा घडवून आणून वातावरणनिर्मिती करण्याची शक्यताच जास्त आहे. त्यात सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोन अध्यक्षांच्या कार्यकाळात लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दोनवेळा दणदणीत पराभव झाला आहे, तर नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी-वाड्रा यांच्याही नेतृत्वाच्या मर्यादा पुरेशा स्पष्ट झाल्या आहेत. अर्थात, तरीदेखील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व अन्य कोणाकडे जाण्याची शक्यता धुसर आहे.
आणखी एक विचार करण्यासारखी बाब म्हणजे जोपर्यंत गांधी कुटुंब पक्षाचे नेतृत्व करीत आहे, तोपर्यंत प्रादेशिक पक्ष काँग्रेसवर कुरघोडी करताना थोडा तरी विचार करतात. मात्र, जर अन्य कोणाकडे नेतृत्व गेल्यास प्रादेशिक पक्ष त्या नेत्यास आणि पर्यायाने पक्षाला कितपत महत्त्व देतील, हाही प्रश्न काँग्रेसपुढे आहे. त्यामुळे या चिंतन शिबिराकडे प्रादेशिक पक्षांचेही लक्ष लागलेले असेल. कारण, या शिबिरामध्ये काँग्रेस नेमकी काय रणनीति आखणार, त्यानुसार प्रादेशिक पक्षही आपले धोरण बदलतील. या शिबिरामध्ये प्रामुख्याने पक्षातीलच असंतुष्टांनाही काही काळ शांत बसविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पक्षातील असंतुष्ट सध्या पक्षांतर्गत बदलांची मागणी करीत आहेत. मागणी करणारे हे नेते एकेकाळी पक्षाचे आधारस्तंभ असल्याने त्यांना एकदमच हुसकावून लावणे सध्या नेतृत्वास शक्य नाही. त्यामुळे या नेत्यांकडे तोंडदेखलेपणासाठी का होईना, पण काही जबाबदारी देऊन त्यांना गप्प बसविण्याचा प्रयत्न पक्षनेतृत्वाकडून होऊ शकतो.
 
 
काँग्रेस पक्षाच्या या चिंतन शिबिरावर निवडणूक प्रचार व्यवस्थापनाचा व्यवसाय करणारे प्रशांत किशोर यांचा प्रभाव असणार आहे. कारण, देशात प्रशांत किशोर यांच्याकडेच निवडणुका जिंकण्याचा हमखास ‘फॉर्म्यु’ला असल्याचे वातावरण काही वर्षांपासून तयार करण्यात आले आहे. त्यामुळे अगदी अनुभवी नेतेही प्रशांत किशोर यांना शरण जाताना दिसतात. अर्थात, प्रशांत किशोर यांनाच सर्व श्रेय देणे हा सर्वपक्षीय अनुभवी नेत्यांचा अपमान आहे. कारण, जनतेची नेमकी नाडी ओळखून त्यानुसार रणनीति आखणारे नेते हे सर्वच राजकीय पक्षांमध्ये असतात. त्यामुळे, प्रशांत किशोर यांचा नेमका किती वापर करायचा; याचा धडा सर्वच राजकीय पक्षांनी भाजपकडून घेण्यासारखा आहे.
 
 
तर असे हे निवडणूक प्रचार व्यवस्थापन व्यावसायिक प्रशांत किशोर काँग्रेस पक्षात प्रवेश करणार, काँग्रेसला पुढील सर्व विधानसभा आणि लोकसभा निवडणूक जिंकून देणार, असे वातावरण गेल्या दोन आठवड्यांपासून तयार करण्यात आले होते. प्रशांत किशोर यांच्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांसोबत होणार्‍या मॅरेथॉन बैठका, प्रशांत किशोर यांनी सादर केलेले ६०० स्लाईड्चे ‘पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन’ याद्वारे आता प्रशांत किशोर हेच काँग्रेस पक्ष चालविणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, मंगळवारी प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार नसल्याचे ‘ट्विट’ केले. त्यामध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाला माझी नव्हे, तर नेतृत्व बदलाची आणि पक्षातील समस्या सोडविण्याची अधिक गरज आहे, असा सल्लाही दिला. अर्थात, असा सल्ला देणारे प्रशांत किशोर हे काही पहिले व्यक्ती नाहीत आणि शेवटचेही व्यक्ती नाहीत. आजवर हा सल्ला ‘जी २३’ नेते, शरद पवार, ममता बॅनर्जी, के. चंद्रशेखर राव आदी प्रादेशिक नेत्यांनी वेळोवेळी दिले आहेत आणि त्या सल्ल्याला काँग्रेसने प्रथेप्रमाणे केराची टोपलीही दाखविली आहे.
 
मात्र, संपुआ काळात सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेल्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये निर्णायक भूमिका मिळण्यात प्रादेशिक पक्षांचा लाभ होता आणि तेच टाळण्यासाठी काँग्रेसने प्रशांत किशोर यांना नाकारले आहे. प्रशांत किशोर यांनी संपुआचे अध्यक्षपद काँग्रेसशिवाय अन्य पक्षाच्या नेत्याकडे सोपवावे, असा सल्ला दिला होता. हा सल्ला म्हणजे सरळसरळ प्रादेशिक पक्षांची वकिली करण्याचा असल्याचे काँग्रेसचे स्पष्ट मत होते. कारण, संपुआमध्ये काँग्रेस पक्षाच्याच लोकसभेत सर्वाधिक जागा आहेत, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पुन्हा एकदा ममता बॅनर्जी, शरद पवार, चंद्राबाबू नायडू, के. चंद्रशेखर राव आदी प्रादेशिक नेते तिसर्‍या, चौथ्या, बिगरकाँग्रेस आघाडी तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ही आघाडी बनविण्यामध्ये सर्वांत मोठी अडचण ही काँग्रेस पक्षाचीच आहे. काँग्रेस पक्ष जेवढा गोंधळलेला असेल, तेवढे प्रादेशिक पक्षांना काँग्रेसवर कुरघोडी करणे सोपे होणार आहे. प्रशांत किशोर यांच्या ६०० वगैरे स्लाईड्समध्ये काँग्रेस पक्षाला फार काही लाभ होईल, असेही काही नसल्याचे त्या नेत्याने सांगितले. त्यामुळेच काँग्रेस पक्षाने प्रशांत किशोर यांना रितसर पक्षात सामील होऊन निवडणूक व्यवस्थापन समितीमध्ये काम करण्याची ‘ऑफर’ दिली.
काँग्रेस पक्ष आणि प्रशांत किशोर यांचे ‘डिल’ न होण्यामागे प्रशांत किशोर यांची अतिमहत्त्वाकांक्षा आणि अतिआत्मविश्वास कारणीभूत ठरल्याचेच आता सिद्ध झाले आहे. कारण, काँग्रेस पक्षाची धोरणनिश्चिती करण्याची ताकद प्रशांत किशोर यांना आपल्याकडे हवी होती. थोडक्यात, प्रशांत किशोर यांना नवे अहमद पटेल बनण्याची इच्छा होती. मात्र, त्याद्वारे प्रशांत किशोर हे एकाचवेळी वैयक्तिक आणि प्रादेशिक पक्षांचा अजेंडा काँग्रेसच्या नावे चालवणार असल्याचेही स्पष्ट होते. अर्थात, पक्ष सध्या गाळात रुतला असला तरीही बाहेरच्या एखाद्या व्यक्तीस पक्ष आंदण देऊन पक्षाचे अस्तित्वच धोक्यात घालण्याचा आततायी निर्णय घेणार नसल्याचा स्पष्ट संदेश प्रशांत किशोर यांच्यासह प्रादेशिक पक्षांनाही दिला आहे. त्यामुळे प्रशांत भलेही स्वत:ला निवडणुकीचे ‘चाणक्य’ समजत असले तरीही भारतीय राजकारणात ते अद्याप ‘किशोर’ असल्याचेच काँग्रेसने दाखवून दिले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0