नवी दिल्ली : देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी कोरोनाचा धोका अद्याप टळला नसल्याचा पुनरुच्चार केला. त्याचप्रमाणे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी कोरोनाविषयक लसीकरण व अन्य मुद्द्यांविषयी चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत केंद्र आणि राज्याच्या एकत्रित प्रयत्नांची दखल घेतली. त्यांनी मुख्यमंत्री, अधिकारी आणि सर्व ‘कोरोना योद्धा’ यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांचे कौतुक केले. युरोपीय देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ व त्याच्या उपप्रकारांच्या संसर्गाविषयी सांगून पंतप्रधानांनी राज्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले.
अनेक देशांपेक्षा परिस्थितीचा चांगल्या प्रकारे सामना करण्यास भारत सक्षम आहे. तरीही, गेल्या दोन आठवड्यांत, काही राज्यांमध्ये वाढती रुग्णसंख्या पाहता आपल्याला सावध राहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ‘ओमिक्रॉन’ची लाट सर्वांनी काहीही गोंधळ, घबराट न पसरवता, दृढनिश्चयाने परतवून लावली, असे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “गेल्या दोन वर्षांत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा मजबूत करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच संसर्गाच्या तिसर्या लाटेत कोणत्याही राज्यांत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशातील 96 टक्के प्रौढ लोकसंख्येस लसीची किमान एक मात्र, 15 वर्षांवरील 84 टक्के लोकांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मार्च महिन्यात 12 ते 14 वर्षे वयोगटातील आणि नुकतीच 6 ते 12 वयोगटाच्या लसीकरणास परवानगी देण्याचा आली,” याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. गंभीर स्वरूपाच्या तापाच्या म्हणजेच ‘इन्फ्लूएंझा’ प्रकरणांच्या 100 टक्के चाचण्या आणि ‘पॉझिटिव्ह’ प्रकरणांचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ म्हणजेच जनुकीय क्रमनिर्धारण करणे, सार्वजनिक ठिकाणी ‘कोविड’ प्रतिबंधक वर्तन करणे आणि कुठल्याही गोष्टीने घाबरून न जाणे, यावरही पंतप्रधानांनी भर दिला.