४ मे पासून मुंब्र्यांतील मशिदींबाहेर हनुमान चालीसा! मनसेची तयारी पूर्ण

28 Apr 2022 16:17:50
manse
 
 
 
ठाणे : मशिदीवरील भोंगे ३ मे पर्यत न उतरविल्यास देशभरातील मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचा इशारा महाराष्ट्रनवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. त्याअनुषंगाने,ठाण्यातील मनसे आक्रमक झाली आहे.तसेच,मुंब्रा कौसा येथील जामा मशिदीवरील भोंगे ३ मे पर्यत न काढल्यास ४ मे रोजी मशिदीसमोर भोंगा लावुन हनुमान चालिसा म्हणण्याची परवानगी द्या.अशी मागणी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मुंब्रा पोलिसांकडे पत्राद्वारे केली आहे.कौसा येथील जामा मशीद ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी मशीद म्हटली जाते.
 
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तरसभेत भोंगे उतरवण्याबाबत ३ मे पर्यंत मुदत दिली होती. अन्यथा देशभरात हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे एकीकडे राजकारण ढवळुन निघाले असताना ठाकरे सरकारने भोंगे उतरण्यास नकारार्थी सूर लावला. तरीही,मनसे आपल्या भूमिकेवर ठाम असुन ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांनी थेट मुंब्य्रातील जामा मशीदीसमोरच हनुमान चालिसा म्हणण्याचा इरादा जाहिर केला आहे. या पार्श्वभूमीवर ३ मे पर्यत मशिदीवरील भोंगे न उतरवल्यास ४ मे रोजी सकाळपासून हनुमान चालीसा पठण करण्यासाठी भोंगे लावण्याची परवानगी मुंब्रा पोलिसांकडे पत्राद्वारे मागितली आहे.सकाळी ६ वाजता, दुपारी १ वाजता, सायंकाळी ५ आणि रात्री ८ वाजता हनुमान चालिसा म्हणण्याचा निर्धार अविनाश जाधव यांनी बोलुन दाखवला.त्यामुळे, मनसे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने पोलिसांसमोर मात्र मोठा पेच उभा ठाकला आहे.
 
 
उत्तरप्रदेशात भोंगे उतरले मग महाराष्ट्रात का नाही ?
 
 
मुंब्रामधील जामा मशीदीसमोर ४ मे रोजी हनुमान चालीसा पठण करण्याची परवानगी मागितली आहे. हा एक सामाजीक विषय असुन कायदा सर्वाना सारखा आहे त्यांना जर परवानगी दिली असेल तर आम्हाला देखील परवानगी दिली पाहिजे. सरकारने सर्वांसाठी एकच नियम ठेवावा.
 
 
आम्हाला परवानगी देणार नसाल तर त्यांचे भोंगे उतरवा.उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवले तर महाराष्ट्रात भोंगे का उतरवत नाहीत? इतरवेळी अधिकाराचा गैरवापर करता मग इथेही करा. बाळासाहेबांनी सांगितले होते की, मशिदींवरील भोंगे उतरले पाहिजेत आता त्यांच्या मुलाचे सरकार आहे. बाबांचा शब्द पाळण्यासाठी मुख्यमंत्री झाले ना? मग बाबांचा शब्द पाळण्यासाठी त्यांनी मशिदीवरील भोंगे देखील उतरवावे अशी बोचरी टीका अविनाश जाधव यांनी केली आहे.
 
 
औरंगाबादसाठी ठाण्यातुन २०० गाड्या
 
 
राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील जंगी सभेसाठी मनसेची जय्यत तयारी सुरु आहे.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर जर सगळ्यात मोठी सभा होणार असेल तर ती म्हणजे राज ठाकरे यांची होणार आहे.औरंगाबादला ठाण्यातुन महाराष्ट्र सैनिकांच्या २०० गाड्या जाणार असुन राज ठाकरे तिथे काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
  
 
Powered By Sangraha 9.0