अनाथ मादी तरसाचे सह्याद्रीच्या जंगलात पुनर्वसन

28 Apr 2022 12:31:21

hyena2 
  
मुंबई (प्रतिनिधी) : नाशिकजवळ मानवी वस्तीमध्ये सापडलेल्या एका मादी तरसाचे वर्षभर संगोपन करून तिचे पुन्हा जंगलात स्थानांतर करण्यात आले आहे. १२ एप्रिल रोजी या मादी तरसाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. सातारा वन विभागाच्या मदतीने 'रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट', पुणे या संस्थेने ही कामगिरी पार पाडली.
 
 
 
hyena
 
नाशिकच्या 'इको ऐको फाऊंडेशन'ला वर्षाभरापूर्वी एक तरसाचे पिल्लू मानवी वस्तीजवळ आढळून आले होते. या पिल्लांचे तिच्या आईसोबत पुनर्भेट घडवून आणण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरते. सरतेशेवटी नाशिक वनविभागाने हे पिल्लू पुण्याच्या 'रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट'कडे संगोपनासाठी पाठवले. बावधनमधील बचाव केंद्रात आणलेल्या या पिल्लांचे वजन त्यावेळी ४०० ग्राम इतकेच होते. मात्र, पुढच्या काळात संस्थेच्या सदस्यांनी मादी पिल्लाची काळजी घेण्यास सुरुवात केली. या पिल्लाचे जंगलामध्ये पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी वर्षभराचे ध्येय ठेवण्यात आले. पिल्लू मोठं होत गेल्यावर तिच्या पिंजऱ्याच्या आकार वाढवण्यात आला. ज्यामुळे पिल्लाला गुफा बनवणे, खोदणे, तिचा प्रदेश चिन्हांकित करणे आणि अन्न लपवणे या नैसर्गिक प्रवृत्तीला उत्तेजन मिळाले.

hyena12 
 
गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या हवामान परिस्थितीचा या पिल्लाला सामना करावा लागला. पिल्लाने स्व-आहार सुरू केल्यावर संस्थेच्या सदस्यांनी तिच्याशी मर्यादित स्वरूपाचा संपर्क ठेवला. अखेरीस वर्षभरानंतर हे पिल्लू जंगलात पुनर्वसनासाठी सक्षम झाल्याचे समजल्यानंतर तिला १२ एप्रिल रोजी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. पाहणीसाठी गेल्यावर ही मादी तरस लपून बसली आणि तिचा सांभाळ केलेल्या लोकांजवळही ती आली नाही, त्यामुळे ती जंगलात पुन्हा सोडण्यासाठी योग्य असल्याचे आमच्या निर्दशनास आल्याची माहिती साताऱ्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली. प्रधान मुख्य वनसंरक्षकाच्या परवानगीने साताऱ्यातील सह्याद्रीच्या वनक्षेत्रात या मादी तरसाला सोडण्यात आल्याचे मोहिते यांनी सांगितले. सोडण्यापूर्वी तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तिला जीपीएस काॅलर लावण्यात आले आहे. सोडतेवेळी तिचे वजन २० किलो होते आणि ती १ वर्ष दोन महिन्यांची होती.
 
 
सोडल्यानंतरचा प्रवास
सोडल्यानंतर ही मादी तरस पहिल्या दिवसात ६०० मीटरच्या वनपरिक्षेत्रातच वावरली. दुसऱ्या दिवासापासून तिने आसपासच्या प्रद्रेशांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पुढील दहा दिवस ती त्याच वनपरिक्षेत्रात राहिली, त्यानंतर तिने इतर प्रदेशात स्थलांतर केले. थर्मल ड्रोन, कॅमेरा ट्रॅप्स वापरून तिच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आल्याचे 'रेस्क्यू'चे क्षेत्र संचालक तुहिन सातारकर यांनी सांगितले.
 
 
 
hyena3
 
 
तरसाविषयी
भारतीय पट्टेदार तरस(हायना) हा प्राणी सहसा एकाकी जीवन जगतो. 'इंटरनॅशनल युनियन फॉर द कॉन्झर्वेशन ऑफ नेचर'ने (आय.यु.सी.एन) या प्राण्याला ‘संभाव्य धोकाग्रस्त' श्रेणीत घोषित केले आहे.स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार तरसांची संख्या कमी होत आहे. याला वाढती लोकवस्ती जबाबदार आहे. समाजात प्रचलित समजुतींमुळे होणाऱ्या हत्या याला कारणीभूत आहेत. त्यामुळे विषबाधा झाल्याच्या अनेक घटना ही यापूर्वी समोर आल्या आहेत. लोककथांमधून पसरलेल्या दहशतीमुळे तारसांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
Powered By Sangraha 9.0