रत्नागिरीत खवले मांजराची सुखरूप सुटका!

26 Apr 2022 19:28:20

pg1

मुंबई(प्रतिनिधी): संगमेश्वर तालुक्यातील देवळे मार्गावर देवालय येथे विक्रीच्या उद्देशाने खवले मांजर बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडे सापडलेल्या खवले मांजरची सुटका काल दि २६ रोजी नैसर्गिक अधिवासात करण्यात आली. मात्र, यामुळे कोकणात अजूनही छुप्या पद्धतीने खवले मांजराची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे.

 
 

देवळे फाटा ते देवळे गाव जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या देवालय येथे एक व्यक्ती मोटारसायकलवरून खवले मांजर घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती देवरूख पोलीसांना मिळाली होती. घटनास्थळी पोहोचून सदर व्यक्तीची चौकशी केली असता त्याच्याजवळ एका सिमेंटच्या रिकाम्या पोतळीत जीवंत खवले मांजर आढळून आले. त्याला त्वरित ताब्यात घेण्यात आले. देवरूख पोलीस आणि वनविभागाने संयुक्त रित्या ही कारवाई केली. रविवार दि. २४ रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. तसेच, सोमवारी दि. २५ रोजी आरोपीला देवरूख न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीला शुक्रवार दि. २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव ललित सतिश सावंत आहे. आरोपी २५ वर्षांचा असून संगमेश्वरच्या मेघी पवारवाडी येथे राहतो.

 

आरोपीला देवरुख पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याची पोलीसांनी सखोल चौकशी केली त्याने गुन्हा कबूल केला. त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४४, ४८, ४८ अ, ५१ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. तर खवले मांजराला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीला सोमवारी देवरूख न्यायालयात हजर करण्यात आले. देवरुख न्यायालयाने याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सापडलेल्या खवले मांजराला वनविभागाने आज सकाळी नैसर्गिक अधिवासात सोडले. सदर कारवाई पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हेड कॉन्स्टेबल सचिन भुजबळराव, हे. कॉ संतोष सडकर, पो. कॉ. ज्ञानेश्वर मांढरे, पो. कॉ. रोहित यादव, पो. कॉ.. रीलेश कांबळे तसेच देवरूख वनविभागाचे वनरक्षक न्हानू गावडे आणि वनविभागाचे इतर कर्मचारी या कारवाई मध्ये सहभागी होते.


Powered By Sangraha 9.0