अफजल्याचा वध प्रत्यक्षात अवतरला....

‘शेर शिवराज; स्वारी अफजलखान’ सिनेमागृहात प्रदर्शित

    दिनांक  24-Apr-2022 12:28:20
|
sher shivraj
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमा, त्यांच्या युद्धनीती, स्वराज्यस्थापनेत त्यांच्यासोबत असणारे शिलेदार यांच्या पराक्रमांच्या गोष्टी ऐकतच आपण मोठे झालो आहोत. आजही या गोष्टी आपल्या कानावर पडल्या तर अंगावर रोमांच उभे राहते. महाराजांच्या अनेक गोष्टी आपण पाठ्यपुस्तकात वाचल्या आहेत. एवढंच काय तर आपण या गोष्टी नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातूनही अनुभवल्या आहेत. पण तरीही प्रत्येक शिवभक्ताच्या मनाला त्या तितक्याच आकर्षित करतात. परंतु गोष्टी सांगणे आणि आणि त्या तितक्याच प्रभावीपणे पडद्यावर मांडणे यात खूप फरक आहे. हा पण सध्या तंत्रज्ञानाचा वापर करून या गोष्टींमधील थरार आणि रोमांच पडद्यावर जिवंत करणे शक्य झाले आहे. आणि याची प्रचिती आपल्याला दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी त्याच्या शिवाष्टके या चित्रपटांच्या मालिकेतील फर्जंद फत्तेशिकस्त आणि पावनखिंड चित्रपटातून आली. आता दिग्पाल चौथे पुष्प ‘शेर शिवराज; स्वारी अफजलखान’ शुक्रवार २२ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे.
 
 
शिवाजी महाराज आणि त्यांच्या शिलेदारांनी लढलेल्या प्रत्येक मोहिमांची आखणी त्यांनी कश्याप्रकारे केली असेल? त्यावेळी नक्की काय काय झाले असेल?प्रत्यक्षात यासर्व घटना नक्की कश्याप्रकारे घडल्या असतील? या सर्व गोष्टींची मांडणी दिग्दर्शकाने शेर शिवराज चित्रपटात उत्तम रित्या केली आहे. शिवाय प्रत्यक्ष प्रतापगडावर केलेले चित्रीकरण ही गोष्ट सिनेमाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवते. चित्रपटाच्या नावावरून चित्रपटाचा विषय लक्षात येत असला तरी, त्या ताळआत आजूबाजूला घडत असलेल्या घटना प्रत्यक्षात उभारण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.
 
 
दुंदुभी निनादल्या नौबती कडाडल्या दशदिशा शहारल्या,
केसरी गुहे समीप मद्द हत्ती चालला, मद्द हत्ती चालला!
 
सिनेमात अफजल खान स्वराज्यावर चाल करून येत आसताना ऐकू येणाऱ्या या ओळी अंगावर शहारे आणतात. या ओळींचा अर्थ लक्षात घेतला तर, सगळीकडे हाहाकार माजला आहे, संकाटाची आरोळी द्यायला नौबती कडाडत आहेत आणि यामुळे दहा दिशा शहारून गेल्या आहेत. या सगळ्याला कारण म्हणजे एक माजलेला हत्ती छत्रपती शिवाजी महाराज या सिंहाने उभारलेल्या स्वराज्याच्या केसरी गुहेवर चाल करून येत आहे.
 
 
खर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयातून आपण बरंच काही शिकू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं स्वराज्य, या स्वराज्य उभारणीमध्ये त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे असणारे त्यांचे मावळे आणि शिलेदार. यांच्या पराक्रमाच्या कथा कधीही ऐकल्या की अंगावर रोमांच उभं राहिल्याविना राहत नाही. महाराजांच्या प्रत्येक मोहिमेमध्ये युद्धनीतीसोबतच शस्त्रकलाही तितकीच महत्त्वाची आहे. मात्र अफझलखान वधाची मोहीम ही त्याच्या शस्त्रामुळे सर्व मोहिमेंपेक्षा वेगळी ठरते.
 
 
खरं म्हणजे सिनेमातील एक एक सीन स्वराज्यासाठी मावळ्यांची आणि खुद्द छत्रपती शिवाजी माहाराजांची असणारी प्रामाणिक भावना दाखवते. एका प्रसंगात जिजाऊसाहेब (मृणाल कुलकर्णी) महाराजांवर (चिन्मय मांडलेकर) चिडतात. या प्रसंगातले संवाद, दोंघांचाही अभिनय, दिग्दर्शन आणि छायांकन सगळं फारच उत्तम जमून आले आहे. मृणाल यांनी आऊसाहेबांच्या भूमिकेतली तळमळ, काळजी आणि राग कुशलतेनं व्यक्त केला आहे. अभिनेते मुकेश ऋषी यांनीही अफजलखानाची व्यक्तिरेखा प्रभावीपणे निभावली आहे. या व्यक्तिरेखेचे वजन आणि बाहुतली ताकद त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच आहे. काही प्रसंगांमध्ये ते गोंधळलेले वाटतात. चिन्मय नेहमीप्रमाणे महाराजांची भूमिका जगला आहे. पराक्रमांव्यतिरिक्त महाराजांच्या जीवनप्रवासातल्या काही हळव्या प्रसंगांनाही चित्रपट स्पर्श करतो. ते चिन्मयनं उत्तम केले आहेत. शिवाय संवादलेखन आणि विविध व्यक्तिरेखांच्या तोंडी असलेल्या संदर्भांमधून लेखकाची मेहनत दिसून येते. युद्धाची तयारी, आखणी आणि प्रत्यक्ष युद्ध यांचं चित्रणही परिणामकारक आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या चित्रपटांमधील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष ठिकाणी करण्यात येणार चित्रीकरण. फर्जंद असो, फत्तेहशिकस्त असो, पावनखिंड असो किंवा आताच प्रदर्शित झालेला शेर शिवराज. प्रत्येक चित्रपटातील ८० टक्के चित्रीकरण हे प्रत्यक्ष ठिकाणीच करण्यात येते. अफझलखान वधाच्या या गोष्टींचेही चित्रीकरण प्रत्यक्ष प्रतापगडावर करण्यात आलेले आहे.
 
 
महाराजांच्या युद्धनीतीचे मूर्तस्वरूप प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकाने केला आहे. महाराजांचे विविध गुण, दूरदर्शिपणा, युद्धनैपुण्य, राजकारणातील अष्टपैलुत्त्व आपल्या पर्यंत कसे पोहचतील याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. विदुर, कृष्ण, चाणक्य, शुक्राचार्य, हनुमान आणि राम अशा सर्वांचे विचार आणि गुण शिवरायांनी आत्मसात केले होते. आई जिजाऊसाहेबांकडूनही रामायण आणि महाभारताची शिकवण घेतली आणि येथूनच कथानकाचा प्रारंभ होतो. ‘नरसिंह आणि हिरण्यकश्यपू’ यांची गोष्ट तर आपणा सर्वांना ठाऊक आहेच. पण नेमके याच कथानकाचा वापर करून चित्रपटाचे उपकथानक अगदी कुशलतेने रचले आहे. शिवकालीन इतिहास आणि पुराणकथा यांची सांगड घालण्याची जबाबदारी लेखकाने उत्तमरीत्या बजावली आहे. किल्ले प्रतापगडाचा पायथा म्हणजे ‘स्वराज्याचा उंबरठा’ मानला गेला. याच उंबरठ्यावर महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानावर वाघनखं आणि बिचव्यानं हल्ला करत त्याचा कोथळा बाहेर काढला. या प्रसंगातील थरार, रोमांच आणि महाराजांचे नरसिंहासारखे रूप जिवंत होते.
 
 
केवळ महाराजचं नव्हे, तर त्यांच्या साथीदारांचा पराक्रम, कूटनीती आदी पैलूही चित्रपटात ठळकपणे येतात. सरनोबत नेताजी पालकर (विक्रम गायकवाड), सुभेदार तानाजी मालुसरे (अजय पुरकर), मातोश्री दिपाऊ बांदल (दीप्ती केतकर), बहिर्जी नाईक (दिग्पाल लांजेकर), केसर (मृण्मयी देशपांडे), कृष्णाजी भास्कर (ज्ञानेश वाडेकर), गोपीनाथ बोकील (वैभव मांगले), येसाजी कंक (सुश्रुत मंकणी), सरदार कृष्णाजी बंककर (मंदार परळीकर), कान्होजीराव जेधे (समीर धर्माधिकारी), विश्वास दिघे (आस्ताद काळे), नरवीर जीवा महाले (निखिल लांजेकर), पिलाजी गोळे (अक्षय वाघमारे) आदी सर्व व्यक्तिरेखांचं कौशल्य आणि वेगळेपण पडद्यावर नीट उमटतं. वैभव मांगले यांनी महाराजांचे वकिल अर्थात गोपीनाथपंत बोकील यांची व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारली आहे. मुत्सद्दी बहिर्जी नाईकांची भूमिकास्वत: दिग्पालनं उत्तम साकारली आहे. खरं तर एखादा ऐतिहासिक चित्रपट नुसता तयार करून चालत नाही. तर त्या चित्रपटात इतिहास हा जिवंत करावा लागतो. पण दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर फक्त एक ऐतिहासिक चित्रपट बनवून थांबला नाही तर शिवरायांच्या पराक्रमाच्या कथा आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी शिवाष्टके या शृंखलेची सुरवात केली. प्रत्येक चित्रपटात इतिहासाला कोठेही धक्का लागू न देता एक लेखक आणि दिग्दर्शक अशा दोन्ही जबाबदाऱ्या दिग्पालने निर्विवाद पार पडल्या आहेत. शेर शिवराज मध्ये फक्त लेखक आणि दिग्दर्शक अशा दोन जबाबदाऱ्यांवरच तो थांबला नाही. तर त्याने बहिर्जी नाईक हि भूमिका साकारून अभिनेता म्हणूनही जबाबदारी पूर्ण केली आहे.
 
 
सिनेमाला खऱ्या अर्थाने जागृत ठेवते ते सिनेमाचे संगीत. संगीतकार देवदत्त बाजी यांने पार्श्व संगीतावर खूप मेहनत घेतली आहे आणि ही मेदनत सिनेमातील प्रत्येक टप्पयावर जाणवत राहते. याशिवाय आद्रश शिंदे अवधूत गांधी आणि जुईली जोगळेकर यांच्या आवाजात सिनेमाची गाणी ऐकली की उर आणखी भरून येतो. सिनेमाची कथा जरी अफजलखानवाच्या वधावर आधारलेली असली तरी, या सगळ्या घटनांची पार्श्वभूमी, अफजलखानाने माजवलेला हाहाकार आणि छत्रपती शिवराय आणि अफजलखान यांच्यात असलेले वैर दाखवण्यासाठी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने विशेष मेदनत घेतली आहे. सिनेमात फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड पेक्षा अधिक मोठी स्टरकास्ट पहायला मिळते. शिवाय प्रत्येक कलाकाराने शिंवरायांप्रती आदर ठेवत आपल्या अभिनय कलेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळएच एकाच वेळेस स्क्रिन वर अनेक कालाकार असतानाही प्रत्येक पात्राची विविधता दिसून येते.चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. शेर शिवराज पाहिल्यानंतर दिग्पालच्या आगामी शेर शिवराज - स्वारी आग्रा या चित्रपटाची उत्सुकता राहिल्याशिवाय राहत नाही हे नक्की !
 
 
-प्रणव ढमाले 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.