अभिजात मराठीचे दालन साहित्य संमेलनातील विशेष आकर्षण

    23-Apr-2022
Total Views |

sahitya 
 
 
 
उदगीर (वेदश्री दवणे) : ’माय मराठी असे आमुची वंद्य मराठी भाषा, अभिमान आम्हा अभिजात मराठी भाषा....’ हे सुमधूर गीत आणि मराठी ही ’अभिजात’ दर्जाचीच भाषा असल्याचे दाखले देणार्‍या छायाचित्रांच्या प्रतिकृतींनी साहित्यप्रेमींना दालनात खेचून आणले. अभिजात मराठीचे दालन अशा अनेक कल्पक गोष्टींमुळे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे.
 
 
 
साहित्यनगरीत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर अभिजात मराठी दालन सर्वांसाठी खुले करण्यात आले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून देण्यात येणार्‍या दाखल्यांची प्रतीके दालनात उभारण्यात आली आहेत. मराठीतील पहिला शिलालेख, अभिजात मराठी भाषा समिती, संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, व्याकरणकार वररुची, महाराष्ट्रातील पहिला ज्ञातग्रंथ गाथा सप्तशती, संत एकनाथ, संत नामदेव, तुकोबांचे अभंग, शिवछत्रपतींची पत्रे, शिवकालीन नाणी, दासोपंतांची पासोडी, शाहिरांची भाषा आणि त्यांचा इतिहास, मराठी शब्दकोश दालन अशा 13 दालनांचा येथे समावेश आहे.
 
 
 
एवढेच नाही, तर महाराष्ट्रातील ‘भारतरत्न’, ‘ज्ञानपीठ’ पारितोषिक विजेते यांची माहिती चित्र तसेच लिखित स्वरूपात उभारून मराठी भाषा किती अभिजात आहे, याचा प्रत्यय या अभिजात दालनातून दिसून येतो. ‘लीळाचरित्रा’पासून मराठी साहित्य वळणे घेत आले आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, या विषयी माहितीपर लघुपट येथे भाषा प्रेमिकांना उद्घाटन प्रसंगी दाखविण्यात आला. अभिजात मराठी दालनात साहित्यप्रेमींना ‘शांतता मराठीचे कोर्ट चालू आहे’ हा लघुपट दाखविण्यात आला. एवढेच नाही, तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून राष्ट्रपतींना पाठविण्यात येणारी विनंती पत्र येथे ठेवण्यात आले आहे. या पत्रांवर आपण स्वाक्षरी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
 
 
 
95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्ताने मराठी भाषेचा जागर करताना ती प्राकृत, अपभ्रंश, अभिजात, देवनागरी अशा कुठल्याही विशिष्ट साच्यात अडकून न राहता या सार्‍यांचा परस्पर संबंध घेऊन ती दर कोसा गणिक वाहत येते, हे दाखवणारे मार्गदर्शक असे हे दालन आहे.