नुपूरचा सांगीतिक प्रवास

23 Apr 2022 11:13:26
233  

 
शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीताचे धडे गिरविलेल्या नुपूर काशीद-गाडगीळ हिने आकाशवाणीवर झालेल्या संगीत स्पर्धेत भारतातून पहिले येण्याचा मान २००८ साली मिळविला होता. अशा या नुपूरचा सांगीतिक प्रवास उलगडणारा हा लेख.
 
 
 
नुपूर ही मुळची डोंबिवलीकर. तिचे संपूर्ण बालपणही डोंबिवलीतच गेले. नुपूरचे वडील अविनाश हे ‘टेक्सटाईल’ कंपनीत नोकरी करीत होते. लग्नानंतर नुपूर ठाणेकर झाली. २०१४ साली तिने डॉ. गौरव गाडगीळ यांच्याशी विवाह केला. तिचे पती सोमय्या महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक आहेत. नुपूरचे शालेय शिक्षण चंद्रकांत पाटकर विद्यालयात झाले. नुपूरने पेंढरकर महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून पदवी घेतली. लहानपणापासूनच नुपूरची आई नीता या गाणं शिकण्यासाठी जात असत. त्यांच्यासोबत चिमुरडी नुपूरही जात होती. बंदिशी तिच्या कानावर पडत होत्या. घरी भातुकली खेळत असताना त्या बंदिशी नुपूरही गुणगुणायची. त्यामुळे नुपूरलाही संगीताची गोडी निर्माण झाली. तसेच नुपूरलाही स्वरांची चांगलीच जाण आहे, ही बाब तिच्या पालकांच्या लक्षात आली. त्यांनी नुपूरला संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण देण्याचे ठरविले. शालेय शिक्षण सुरू असतानाच नुपूरचे संगीताचे शिक्षणही सुरू झाले.
 
 
 
नुपूरने वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासून पंडित मधुकरबुवा गजानन जोशी यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. मधुकरबुवांनी नुपूरला ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर घराण्याची गायकी शिकविली. खरंतर नुपूरच्या आईवडिलांना ती लहान असल्याने तिला मधुकरबुवा संगीत शिकवतील की नाही, अशी शंका होती. मात्र, मधुकरबुवांनी ‘लहान वयात संगीत शिकवल्यास चांगले संस्कार होतात,’ असे सांगत नुपूरला संगीत शिकवण्यास लगेचच होकार दिला. मधुकरबुवांनी नुपूरकडून प्रचंड मेहनत करून घेतली. त्यासाठी सर्वप्रथम नुपूरच्या आवाजाचा स्वर, जात यावर त्यांनी काम केले. तो सुधारण्यासाठी प्रयत्न केले. उजव्या हातात ‘तंबोरा’ आणि डाव्या हातात ‘डग्गा’ या पद्धतीने त्यांनी नुपूरकडून रियाज करून घेतला. या पद्धतीने रियाज करणे म्हणजे एक ‘मल्टीटास्किंग’च.
 
 
 
पण, त्यामुळे तालावर आणि स्वरांवर प्रभुत्व प्रस्थापित करण्यास मदत होते. सोबत तालीमही होतीच. मधुकरबुवांनी नुपूरला तबल्यांचे बोलही शिकविले. वेगवेगळ्या रागात लयकारी करण्यासाठी त्याचा नुपूरला उपयोग झाला. पुढे मधुकरबुवांच्या सांगण्यानुसार नुपूरने ‘विद्याधर गोखले प्रतिष्ठान’मध्ये नाट्यसंगीताचे प्रशिक्षण घेतले. यावेळी तिला शुभदा दादरकर, रजनी जोशी, पं. रामदास कामत, अरविंद पिळगावकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
 
 
 
नुपूरला संगीत शिक्षणाची आवड असल्याने दरम्यानच्या काळात तिचे शिक्षणही सुरूच होते. गांधर्व महाविद्यालयाची ‘संगीत विशारद’ आणि ‘संगीत अलंकार’ ही पदवीदेखील नुपूरने संपादित केली. ‘एसएनडीटी’मधून तिने संगीतात ‘एम.ए’ ही पदवी मिळविली आहे. ‘एम.ए’ला संपूर्ण विद्यापीठातून पहिला येण्याचा मान नुपूरला मिळाला होता. त्यामुळेच तिला विद्यापीठातून ‘गानहिरा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुपूरने ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या शास्त्रीय संगीत स्पर्धेत संपूर्ण भारतातून पहिले येण्याचा मानही मिळविला. विशेष म्हणजे, हा मान तिने वयाच्या १७व्या वर्षीच मिळविला. यापूर्वी हा मान एवढ्या लहान वयात विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे यांना मिळविला होता. त्यानंतर नुपूर त्याची मानकरी ठरली.
 
 
 
नुपूर सध्या ‘एसएनडीटी’ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. याशिवाय तिचे खासगी वर्गही ती घेत असते. ‘कोविड’ काळातही तिचे अनेक ऑनलाईन कार्यक्रम झाले. गायनाचे कार्यक्रम नुपूर करते. तिचे संगीताचे शिक्षणही सुरूच आहे. “संगीत म्हणजे अथांग सागर. आताशी कुठे त्यातून एकदा मोती काढू शकलो आहे. अजून संगीत क्षेत्रात खूप काही शिकायचे आहे,” असे नुपूर नम्रपणे सांगते. संगीतातील नुपूरचा रियाज सुरू आहे. अधूनमधून पंडित मधुकरबुवा यांच्याकडे जाऊन ती तालीम घेते. नवनवीन गोष्टी आत्मसात करते. दिग्गजांचे संगीताचे कार्यक्रमही ती ऐकत असते. या सगळ्यात तिला सासरच्यांकडून म्हणजेच गाडगीळ कुटुंबीयांचीही चांगलीच साथ लाभली.
 
 
 
नुपूरला अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये ठाणे महापालिकेच्या ‘राम मराठे स्मृती युवा’ पुरस्काराचाही समावेश आहे. अनेक संस्थांच्या शिष्यवृत्तीची ती मानकरी ठरली आहे. ‘षण्मुखानंद भारतरत्न डॉ. एम. एस. सुब्रलक्ष्मी’ शिष्यवृत्ती नुपूरला मिळाली. याशिवाय ‘पंडित भीमसेन जोशी शिष्यवृत्ती’चीही ती मानकरी ठरली आहे. तरुण कलाकारांना वाव देण्यासाठी केंद्र सरकारकडून ही शिष्यवृत्ती दिली जाते. नुपूरने ‘एनसीपीए’ मुंबई, पुणे फेस्टिव्हल,चंदीगढ फेस्टिव्हल आणि गोवा येथील फेस्टिव्हलमध्येही नुपूरने गाणे सादर केले आहे.
 
 
 
नुपूरचा संगीत क्षेत्रात ‘पीएच.डी’ करण्याचा मानस आहे. पण, सध्या कौटुंबिक जबाबदारी सुद्धा तिच्याकडे असल्याने तिला ते लगेचच करणे शक्य नाही. वेळ मिळेल तशी ‘पीएच.डी’ करणार असल्याचे ती सांगते. नुपूरसारख्या हरहुन्नरी कलाकाराला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.
 
 
Powered By Sangraha 9.0