उदगीर (वेदश्री दवणे) : “सत्य आपले कथन नेहमी उच्चारित राहत असते. यासाठी ऐकण्याचा कान मात्र पाहिजे. कारण, सत्य हा विवेकाचा आवाज आहे,” असे प्रतिपादन 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी शुक्रवारी केले. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे शुक्रवारपासून 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास सुरुवात झाली. यावेळी संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे उद्घाटक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख, ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ विजेते कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो, शिवराज पाटील चाकूरकर, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सासणे म्हणाले की, “सध्याचा काळ मराठी साहित्याचा हरविलेला चेहरा, साहित्याच्या अभिरूचीला मारक ठरू पाहणारा आहे. लेखकाने निर्भयपणे सत्य सांगावे, ही काळाची गरज आहे. आजच्या मराठी साहित्यातून सामान्य माणसाचा चेहरा आणि हुंकार हरवला आहे. वृत्तीगांभीर्याने लेखन करणार्या चिंतनशील लेखकाला साहित्याअंतर्गत आणि साहित्यबाह्य विषयांबाबतसुद्धा काही एक चिंतन मांडावे लागते आणि काही एक चिंता व्यक्त कराव्या लागतात. आपण ‘भ्रमयुगात’ प्रवेश केला आहे, इथे आपली वाचा हरवली आहे. माणूस भ्रमित झाला आहे आणि याबद्दल साहित्याने भूमिका घेणे आवश्यक आहे,” असे सासणे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, “लेखकाने सत्य बोलले पाहिजे आणि निर्भयतने बोलले पाहिजे, असेही साहित्य सांगते. सत्याचा आग्रह, सत्याचा उच्चार ही तर काळाची गरज आहेच आणि सत्य निर्भयपणे सांगितले पाहिजे, हीदेखील काळाची गरज आहे. मात्र, उच्चरवाने सत्याचा उच्चार का करावा लागतो, याबाबत लेखकाने आपल्याला काही सांगून ठेवले आहे.
सत्य आपले कथन उच्चारित राहत असते. ऐकण्याचा कान मात्र पाहिजे. कारण, हा विवेकाचा आवाज आहे. तसेच कोलाहलात हा आवाज उच्चरवानेदेखील उच्चारला गेला पाहिजे, जरी तो लुप्त भासणारा, न मरणारा असला तरी. द्रष्टा लेखक असे सांगत राहतो,” असेही त्यांनी सांगितले.
बालसाहित्याबद्दल आपले मनोगत मांडताना भारत सासणे म्हणाले की, “मराठी साहित्यातून आपण अद्भुतरस हद्दपार केला आहे. सध्याचे बालसाहित्य शुष्क, माहितीपर, गणित आणि विज्ञान यांच्या कोड्यांनी भरलेले, निरस असे झाल्याचे दिसते आहे. लांब नाकाच्या चेटकिणी, उडते घोडे, साहसी राजपुत्र, राजकन्या यांना कुलूपबंद तळघरात ढकलून दिले आहे. संस्कारवादी बालसाहित्याच्या आग्रही निर्बुद्धतेतून ही घटना घडलेली आहे. विशिष्ट वयात अद्भुतरसाचे सेवन ज्या मुलांना करता येते ती मुले बुद्धिमान, प्रतिभावान, तरल कल्पनाशक्तीची देणगी असलेली आणि विकसित व्यक्तिमत्त्वाची बनतात, असे बालमानसशास्त्र सांगत आलेले आहे. त्या उलट, अद्भुतरसाचा संपर्क ज्या मुलांच्या मनाशी घडला नाही ती मुले पोटार्थी, शुष्क, अविकसित व्यक्तिमत्त्वाची, अविचारी आणि अरसिक अशी निपजतात,” असे ते म्हणाले.
“एखादा समाज किंवा संस्कृती नष्ट करायची असेल, तर त्या संस्कृतीची ज्ञानसंपदा नष्ट केली पाहिजे, हा दुष्ट विचार
वचार इतिहासकालापासून सर्वत्र आढळतो. हल्लेखोरांनी आधी अन्य संस्कृतीची ग्रंथालये नष्ट केली आहेत. आपण मात्र स्वत:च आपली ग्रंथालये स्वहस्ते केविलवाणी, उपेक्षित आणि खिळखिळी करून टाकली आहेत, या बाबत आपण सर्वांनी चिंता केली पाहिजे,” असेही भारत सासणे आपल्या भाषणात म्हणाले .
‘ज्ञानपीठ पुरस्कार’ विजेते कोकणी साहित्यिक दामोदर मावजो म्हणाले की, “कोकणी-मराठी नाते 600-700 वर्षांचे आहे. संत नामदेव यांनी पंजाबी, उर्दू, कोकणी, मराठी, गुजराती अशा सर्व भाषांमध्ये रचना केल्या. तेच कोकणी भाषेचे पहिले कवी असून, 14व्या शतकात त्यांनी कोकणीत गौळण प्रकारात रचना केल्या आहेत. इतर भाषांतील शब्द संपदा स्वीकारल्यानेच मराठी समृद्ध झाली आहे. आज मराठी सर्वाधिक संपन्न भाषा असून, इतर बोलींचा आनंद घेतला पाहिजे. साहित्य हे चिरंतनाला धक्के देणारे कालानुरूप असते. आवडत नसलेले साहित्य जाळणे, बंदी घालणे हा पर्याय असू शकत नाही. सत्तेला माज चढतो, तेव्हा साहित्यावर निर्बंध लादले जातात. मात्र, अभिव्यक्तिस्वातंत्र्य जपले पाहिजे,” असे मावजो यांनी सांगितले.
साहित्यासंदर्भात आपले विचार मांडताना शरद पवार म्हणाले की, “मराठी साहित्याला खूप मोठी परंपरा आहे. आणि ही साहित्य चळवळ अनेक शतके अखंडपणे कार्यरत आहे. त्यात वा. ल. कुलकर्णी, सुधीर रसाळ, नामदेव ढसाळ, फ. मु. शिंदे, अशी कितीतरी नावे घेता येतील. पुस्तके वाचण्याचा मला फक्त छंदच नाही, तर मला त्यांचा अभ्यासदेखील करायला आवडतो. त्यामुळे जेव्हा मी वाचन करतो तेव्हा त्यातील आशय, गाभा यापर्यंत पोहोचण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो. त्यामुळे ही ज्ञानगंगा अशीच प्रवाही राहिली पाहिजे,” असे म्हणत पवारांनी आपले साहित्यप्रेम व्यक्त केले.
यावेळी अमित देशमुख म्हणाले की, “साहित्य संमेलनातील मांडले जाणारे विचार हे सरकार नेहमीच गांभीर्याने घेते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने भारत सरकारकडे मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा लवकरात लवकर मिळवून द्यावा, अशी मागणीदेखील केंद्राकडे केली असून लवकरच ती पूर्ण होईल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.