मुंबई : भाजप खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्री यावर येऊन मुख्यमंत्र्यांसोबत हनुमान चालीसा पठणाची इच्छा काही दिवसांपूर्वी व्यक्त केली. मात्र शनिवारी (दि. २३ एप्रिल) राणा दांपत्यांना घराबाहेर पोलीसांकडून त्यांना अडवण्यात आले. त्यांच्यावर काही कलमांअंतर्गत कारवाई करण्यात आली. यावेळी शिवसैनिकही आक्रमक भूमिकेत दिसून आले. यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत ठाकरे सरकारकडून पोलिसांमर्फत करण्यात आलेल्या कारवाईला तीव्र विरोध दर्शवत मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.
"भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले मात्र आरोपीला अद्याप अटक झाली नाही, मोहित भारतीय यांच्यावर हल्ला झाला, एका महिला लोकप्रतिनिधीला २० फूट गाडण्याची भाषा काहींनी केली त्याची साधा गुन्हा दाखलसुद्धा घेतली नाही. परंतु राणा दाम्पत्य हनुमान चालिसा पठनाला येणार म्हटल्यावर त्यांना थेट अटक करण्यात आली. इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार? इतका द्वेष? सत्तेचा इतका माज? एवढीच तुमची मदुर्मकी? लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला?", असे ट्वीट करत फडणविसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. "सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या. पण, जनता सारे काही पाहते आहे! ही गोष्ट निव्वळ लज्जास्पद आहे. लोकशाहीचे गार्हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का?" असेही ते पुढे म्हणाले.