नागपूर: एकीकडे कोळसा टंचाईमुळे राज्यावर लोडशेडिंगचे संकट ओढवलेले असताना, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नागपुरात पार पडलेल्या जाहीर सभेसाठी चक्क विजेची चोरी केल्याचे उघड झाले आहे. नागपुरातल्या गजानन नगर येथे गुरुवारी (दि.२१ एप्रिल) संजय राऊत यांची सभा झाली. त्यासाठी वीज वाहिनीवर आकडे टाकून वीज घेण्यात आली होती.
संपूर्ण राज्य लोडशेडिंगमुळे त्रस्त असताना नागपुरातल्या या वीजचोरीसाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत आता कोणावर गुन्हा दाखल करणार? हा प्रश्न उद्भवला आहे. "सभेशेजारच्या गजानन महाराज मंदिराच्या संचालकांच्या परवानगीनेच तिथून वीज पुरवठा घेण्यात आला होता, विजेची चोरी केलेली नाही.", असा दावा शिवसेनेचे नागपूर शहर प्रमुख नितीन तिवारी यांनी केला आहे. 'ऐन उन्हाळ्यात राज्य वीजटंचाईचा सामना करत असताना शिवसेनेकडून झालेला हा प्रकार संतापजनक आहे', अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेकडून दिली जात आहे.