मुलांमध्ये रमणारा उमदा चित्रकार

22 Apr 2022 09:26:22
 
 
manas
 
 
शालेय वयात ‘बालभारती’च्या पुस्तकातील चित्र पाहून ते हरखून जात. मात्र, आज त्याच ‘बालभारती’च्या पुस्तकात त्यांच्या चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. जाणून घेऊया चित्रकार राहुल पगारे यांच्याविषयी...
 
 
निफाड तालुक्यातील विंचूर गावात जन्मलेल्या राहुल अंबादास पगारे यांचे वडील शाळेत शिपाई होते. साहजिकच पगार कमी असल्याने आई शिवणकाम करायची. हलाखीच्या परिस्थितीतही राहुल यांनी प्राथमिक शिक्षण घेताना आपली कलेची आवड जोपासली. एका वृत्तपत्राच्या चित्रकला स्पर्धेत त्यांच्या फुलपाखराच्या चित्राला पहिला क्रमांक मिळाला आणि त्यांचे चित्रकलेवरील प्रेम वाढत गेले. चित्रकलेबरोबरच नाटक, साहित्य आणि संगीताचीही त्यांना आवड होती. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात त्यांनी पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. यावेळी ‘राष्ट्रपती पुरस्कार’ विजेते शिक्षक दिलीप कोथमिरे यांनी शासनाच्या ‘शैक्षणिक साधन निर्मिती’ या उपक्रमासाठी राहुल यांच्याकडून चित्रे काढून घेतली. कोथमिरे सर त्यावेळी शारदीय व्याख्यानमाला आयोजित करत होते, यात राहुलदेखील सहभाग घेत. त्यामुळे लहानपणीच कलेचे संस्कार त्यांच्यावर झाले. वर्गसजावट, सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी स्पर्धांमध्ये राहुल यांनी सहभाग घेत यश मिळवले. एक तास प्रश्नोेत्तरे पाठ करण्याऐवजी त्यावेळेत एक चित्र काढून होईल, असा त्यांचा मनोदय असायचा.
 
 
 
राहुल शिकत असलेल्या शाळेतच त्यांचे वडील शिपाई म्हणून काम करत होते. त्यावेळी राहुल यांच्या सतत चित्रे काढण्यावरून ते रागवत. मात्र, पाहुण्या व्यक्तींसमोर त्या क्षणापुरते ते प्रचंड कौतुक करत. शाळेतील चित्रकला स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवल्यानंतर वडिलांनी चक्क पेढे वाटले होते.
 
 
draw
 
एकदा ‘एलिमेंट्री’ आणि ‘इंटरमिजिएट’ परीक्षेकरिता राहुल यांना १२ रंगांची पेटी हवी होती. त्यासाठी त्यांनी वडिलांकडे हट्ट केला. मात्र, पैसे नसल्याने डोळे सरांनी त्यावेळी ३०० रुपये उधार दिले. या परीक्षेत राहुल यांनी ‘ए ग्रेड’ मिळविली. ‘जीवशास्त्र’ विषयात ‘जर्नल’ पूर्ण करण्याकरिता अनेक आकृत्या काढाव्या लागतात. मात्र, त्या आकृत्या काढून आपला चित्रकलेचा सराव होईल म्हणून त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बारावीत असताना वर्गात शिकवण्यास येणार्‍या शिक्षकांची चित्रेही त्यांनी बाकावर पेनाने रेखाटली होती. राहुल यांचे मन विज्ञानामध्ये कधी रमलेच नाही. अखेर पद्माकर दराडे यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी तिळभांडेश्वर चित्रकला महाविद्यालयात ‘एटीडी’ करिताप्रवेश घेतला. २००६ साली वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाची जबाबदारी राहुल यांच्यावर आली.
 

draw 
 
आईच्या शिवणकामात घरखर्च भागत नसल्याने त्यांनी मटकी उसळ व भाजीपालादेखील विकला. काहीकाळ पत्रकारिताही केली. पहाटेच्या रेल्वेने ते नाशिकला महाविद्यालयात येत. त्यानंतर घरी जाण्यासाठी थेट रात्रीच गाडी असायची. प्रख्यात चित्रकार प्रफुल्ल सावंत यांनी त्यांना मूर्ती रंगविण्याचे काम दिले. त्यातून त्यांना काही पैसे मिळू लागले. यातच त्यांनी नंबरप्लेट तयार करणे, घरांवर नावे टाकणे अशी अनेक कामे हाती घेण्यास सुरुवात केली. नाशिकरोड रेल्वे स्थानक व बस स्थानकात त्यांची चित्रकला आणखी बहरत गेली. ‘एटीडी’चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिने त्यांनी ‘फाऊंडेशन’चा कोर्स केला. कल्याण-मुरबाड महामार्गावर एका नामांकित दारू कंपनीच्या जाहिरातीचे काम राहुल आणि नवनाथ निफाडे यांना मिळाले. व्यसनमुक्तीसाठी आग्रही असणार्‍या राहुल यांना गरिबीमुळे भितींवर कंपनीची जाहिरात करण्याचे कामही स्वीकारले.
 
 
draw
 
यानंतर ते ठाणगाव येथील शाळेत कलाशिक्षक म्हणून रूजू झाले. योगेश रूपवते यांच्यामुळे राहुल यांना वाचनाची आवड लागली. याठिकाणी असलेल्या मुलांना कलेचे धडे देताना अनेक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. दरवर्षी एखाद्या विद्यार्थ्याचे ते स्वखर्चाने पुस्तक प्रकाशित करत. नेहरू आर्ट गॅलरीतील प्रदर्शनासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांची दरवर्षी निवड होत असे. माधुरी पानसरे या मुलीला गावात वेडी म्हणून ओळखले जात. मात्र, राहुल यांनी तिला कलेचे धडे देत स्वतःची ओळख मिळवून दिली. जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स, जहांगीर गॅलरीची सफरही राहुल यांनी विद्यार्थ्यांना घडवली. बालसाहित्य संमेलन भरवणे, मुलांकडून पथनाट्य बसवून घेऊन ती गावात, जत्रेत सादर करणे, चित्रकला कार्यशाळा भरवणे, असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. यानंतर त्यांची श्रीरामपूर येथे बदली झाली. दरम्यान, राहुल यांच्या कलेची दखल घेत त्यांच्या चित्रांचा दुसरी आणि तिसरीच्या ‘बालभारती’च्या पुस्तकात समावेश करण्यात आला. राहुल यांनी अनेक लेखकांच्या पुस्तकांना मुखपृष्ठ दिले आहे. व्यक्तिचित्रण आणि जलरंगातील निसर्गचित्रण यात त्यांना विशेष रूची आहे. स्वतःच्या हळदी समारंभात राहुल यांनी कविसंमेलन भरवले, तर लग्नसमारंभात आहेर न घेता पक्ष्यांची 300 घरटी पाहुण्यांना दिली. सध्या राहुल दापूर येथील शाळेत कार्यरत आहेत.
 
 
draw
 
आतापर्यंत हजारांहून अधिक चित्र रेखाटणार्‍या राहुल यांना कुटुंबीयांसह किरण भावसार, विवेक उगलमुगले, मनीषा कुलकर्णी, रवींद्र मालुंजकर यांचे सहकार्य लाभले आहे. पालकांनी कलेकडे उदासिनतेने पाहू नये, असा सल्ला देत जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये किमान एक वर्ष शिक्षण घ्यायचे असून, विद्यार्थ्यांना कलेशी जोडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राहुल सांगतात. हलाखीच्या परिस्थितीतही आपल्या यशाचा मार्ग आपल्या कलेच्या साहाय्याने सुकर करणार्‍या राहुल पगारे यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
 
 
Powered By Sangraha 9.0