नाशिक : “अनधिकृत प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांसाठी परवानगी देण्यात येऊ नये,” अशी मागणी भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्याकडे मंगळवारी केली.
पेशकार यांनी याबाबत पोलीस आयुक्त दीपक पांडे यांना याबाबत निवेदन दिले असून यात म्हटले आहे की, “सध्या महाराष्ट्रासह इतर राज्यांतही धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवरून मतमतांतरे सुरू आहेत, अशा परिस्थितीत आपण एक आदेश पारित केला, त्यामध्ये भोंग्यांबाबत परवानगी घेण्याबाबतचा उल्लेख दिसून येतो. याविषयी, आपणास सूचित करू इच्छितो की, अनेक ठिकाणी अनेक धार्मिकस्थळे अनधिकृत किंवा अतिक्रमित जागेवर असण्याची शक्यता आहे.
त्यामुळे अशा धार्मिकस्थळांबाबत भोंग्याची परवानगी देताना त्या धार्मिक स्थळाची आजची स्थिती लक्षात घेऊन जागेचे पेपर्स, बांधकामाचा मंजूर नकाशा, तसेच महापालिकेचा पूर्णत्वाचा दाखला व इतर तत्सम कागदपत्रे तपासूनच आपण नियमांप्रमाणे परवानगी द्याल, अशी आशा व्यक्त करतो. सर्व धर्मीयांसाठी नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, ही अपेक्षा व्यक्त करतो,” असे पेशकार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.