‘मी पंचांगाला चैत्र कधी हे विचारलेच नाही...’

02 Apr 2022 22:21:27
 
लेख
 
 
ऋतुराज वसंत चैत्राचे बोट पकडून येतो आणि संपूर्ण सृष्टीचा रंगच बदलून जातो आणि या रंगांची छटा उलगडतात ते लेखक आणि कवी. प्रेम, विरह, निसर्ग या सर्व भावनांचा कवी गोफ घालतो आणि एखाद्या जिवलगाने न्याहाळावे तसे कवी हे ऋतू अलगद न्याहाळतो आणि त्यातून प्रसवते ती मंत्रमुग्ध करणारी काव्यरचना...
 
आपल्या हिंदू संस्कृतीचे, मराठी महिन्यांचे वेगळेपण काही निराळेच. घड्याळातील १२ आकड्यांप्रमाणे,हे १२ महिने एका मागे एक अगदी तोर्‍यात येतात आणि आपले अस्तित्व रातराणीच्या सुगंधाप्रमाणे सर्वत्र उधळून जातात. आपली संस्कृती, आपले सण तर या महिन्यांवर राजेशाही अलंकाराप्रमाणे विलसत असतात आणि या आनंदयात्रेची मांदियाळी सुरू होते ती सर्व महिन्यांचा जणू राजाच असलेल्या या ‘चैत्र’ महिन्यापासून. फाल्गुनात होलिका पूजन झाले सर्व प्राणी-पक्षी-निसर्ग यांचे वेध लागतात ते चैत्राकडे... चैत्राचे बोट पकडून येणार्‍या वसंताकडे, म्हणजेच वसंत ऋतूकडे. पण, त्याहीपेक्षा जास्त उत्सुकतेने-आतुरतेने चैत्राची वाट पाहतात ते म्हणजे तमाम कवी आणि लेखक मंडळी. या कवी-लेखकाचे या ऋतूंशी, या मराठी महिन्यांशी जणू एक अनोखे नातेच असते. एखाद्या आईला जसे चटकन कळते आपल्या बाळास काही झाले आहे, तसे या कवींना या निसर्गाचे, ऋतूंचे मन जणू काही अचूक ओळखताच येते. एखाद्या जिवलगाने न्याहाळावे तसे हा कवी-लेखक ऋतूंना-महिन्यांना न्याहाळतो. आता हेच बघा ना, एखाद्या सामान्य व्यक्तीला दिनदर्शिका बघून माहीत असते की, आता चैत्र महिन्याचे आगमन होत आहे. पण, कविवर्य द. भा. धामणस्कर यांना त्याची आवश्यकताच वाटली नाही कारण ते म्हणतात,
 
मी पंचांगाला चैत्र कधी हे विचारलेच नाही;
झाडांची पोपटी पालवी मला अधिक विश्वासार्ह वाटली
सर्वसाक्षी आकाशालाच
विचारावेत असे प्रश्न
ग्रहतार्‍यांना विचारू नये,
हे उशिरा उमगलेलेही बरे असते’
 
केवढा तो विश्वास! किती ते निसर्गावर प्रेम, अपार श्रद्धा! सुखद गुलाबी थंडी सरून हाडे गोठवणारी ही थंडी... झाडांची पाने-फुले गळून पाडतात. बर्‍याचदा निसर्ग हा आपली मनाची अवस्था ठरवत असतो. शेवटी आपले मन, आपले शरीर हादेखील निसर्गच की! रखरखीतपणामुळे, पानगळीमुळे आलेल्या ‘सर्वकाही संपतेय की काय’ असे वाटण्याच्या काठावरच हा चैत्र वसंत ऋतू घेऊन येतो आणि पुन्हा एकदा आशेची पालवी आयुष्यात फुलवतो आणि अर्थातच कविवर्य द. भा. धामणस्कर हे क्षण टिपतात आणि व्यक्त होतात, ते असे-
 
नवीन व्हावे, जशी झाडे नवीन होतात अंगभर पाने, फुले लेऊन..
जुने शरीर
जीर्ण वस्त्रासारखे
फेकून दिल्याशिवाय....
 
चैत्र महिन्याचे, वसंत ऋतूचे या सर्वांशी घनिष्ट नाते आहेच, तर या आनंदात प्रेमाच्या ‘शृंगार’रसाला विसरून कसे चालेल. या वसंताचे आगमन झाले की, तो एकटा येत नाही, आपल्याबरोबर रतिभावालादेखील घेऊन येतो. तो येतो आणि सार्‍या धरणीला मोहरवून टाकतो. प्राणी-पक्षी तर आनंदाचे गुंजन करत त्याचे स्वागत करतात. आणि प्रेम म्हटले की रात्र, चंद्र आणि विरह या गोष्टी ओघाओघाने येतातच. आपल्या काव्यातून या चैत्र महिन्याचे आणि प्रेमाचे सुंदर वर्णन करताना, शांताबाई म्हणजेच शांता शेळके यांच्यातून हळूच डोकावणार्‍या प्रेयसीला प्रियकर म्हणतो-
 
तोच चंद्रमा नभात
तीच चैत्रयामिनी
एकांती मजसमीप
तीच तूहि कामिनी!
 
त्या मनास भुरळ पाडणार्‍या चंद्राबरोबर, चैत्राच्या रात्री माझ्याजवळ एकांती तूच आहेस, असे सांगतात तेव्हा चैत्र महिनाच मुळात किती सुंदर असेल, याचा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही. इतर कोणत्याही महिन्याचा उल्लेख नाही. परंतु, चैत्राचा आहे. प्रेम आले की, विरह येतोच. अशावेळी कवी या मनाच्या भावना, ही मनःस्थिती एखाद्या छायाचित्राप्रमाणे टिपतात. सर्व जग तर आहे तसेच सुरू राहते, पण तरीही काहीतरी मागे काहीतरी सुटले आहे, ही भावना मनातून जाऊ देत नाही. या भावना मांडताना धामणस्कर म्हणतात,
 
वसंत गेल्यावरही असतात कुठे कुठे
वसंतात फुललेली फुले
तू निघून गेल्यावर
शब्दांनी धारण केलेल्या अर्थासारखी...
 

vasant 
 
 
वसंतागमनाचे स्वागत आणि उत्सव अर्थातच चैत्राच्या पहिल्या दिवसापासून सुरू होतो. आपल्या भारत देशात, आपल्या संस्कृतीत-सणांमध्ये खूप विविधता आहे. प्रत्येक मासाचे, त्यात येणार्‍या सणांचे भारतीयांना भारी कौतुक-अभिमान! हिंदू नूतनवर्षाच्या पहिल्या दिवसानंतर म्हणजेच गुढीपाडव्यानंतर नऊ दिवसांनी येणार्‍या रामनवमीचा उत्सवदेखील आपण जोरदार साजरा करतो, अर्थात आपल्या प्रभूश्रीरामाचाच जन्मोत्सव तो. मराठी साहित्यसृष्टीत ज्यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाणे अशक्य आहे, असे ‘गीतरामायणा’चे सर्वेसर्वा, जनक, रचनाकार गजानन दिगंबर माडगुळकर म्हणजेच ग. दि. माडगुळकर स्वतः गदिमा. श्रीरामाच्या जन्माचे वर्णन करताना चैत्र मासाचे वर्णन करताना गदिमा म्हणतात,
 
चैत्रमास, त्यात शुद्ध नवमी
ही तिथी
गंधयुक्त तरीही वाट उष्ण हे किती!
दोन प्रहरी का गं
शिरी सूर्य थांबला?
राम जन्मला ग सखी राम जन्मला!
 
चैत्राच्या उष्ण तरीही गंधयुक्त अशा बहारदार वातावरणात चैत्रशुद्ध नवमीला माझ्या रामाचा जन्म झालाय, उष्णतेने पेंगुळलेल्या कळ्यांनाही वारा जाऊन आनंदाची बातमी सांगतोय की, प्रभू श्रीराम जन्माला आलाय! श्रीरामाच्या जन्मामुळे या चैत्राचा तोरा काव्यात अधिकच वाढलेला दिसतो. फक्त आत्ताच्याच कवी-लेखकांनी वसंताचे वर्णन केले असे नाही, तर संत ज्ञानेश्वर महाराज, मुक्तेश्वर, समर्थ रामदासस्वामी अशा संतमहात्म्यांनीही आपल्या साहित्यात या चैत्र महिन्याचे, वसंतागमनाचे वर्णन करण्याचा मोह आवरता आला नाही. शिशिराच्या मरगळीनंतर पुन्हा एकदा चैतन्याची पालवी फुटते. पाने फुले मोहरतात आणि याचे वर्णन करताना मुक्तेश्वर ‘पुष्पधुळीमाजी लोळे वसंत’ तर संत ज्ञानेश्वरांसारखे थोर साहित्यिक वसंताला ‘ऋतुपती’ अशी उपमा देताना म्हणून जातात-
 
जैसे ऋतुपतीचे द्वार। वनश्री निरंतर
वोळगे फळभार लावण्येसी॥
 
चैत्र महिना, ऋतुराज वसंत हा नवनिर्मितीचा सोहळाच. या सोहळ्याचे स्वागत कोकिळ आपल्या कुजनातून करतो, फळांचा राजा स्वतः त्या वसंतात सर्वांगाने मोहरतो, संपूर्ण निसर्ग, धरित्री फळा-फुलांचे अलंकार पांघरून घेतात आणि हे लहानग्यांनी कसे ओळखावे हे सांगताना लक्ष्मीबाई टिळक म्हणतात,
 
या पृथ्वीवर ये। नवेपणा उदयाला
तुज कळेल पुढती।
वसंत म्हणती याला॥
 
चैत्रपालवीचे वर्णन करताना दुर्गाबाई भागवतांचे ‘ऋतूचक्र’ विसरणे अशक्य आहे- आपल्या लेखात त्या म्हणतात, ‘चैत्रातल्या पालवीचे रुप कुठेही मोठे मनोहर. पण, ही पिंपळाची झाडे पाहा, कशी गहिर्‍या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवीत उभी आहेत. जुनी पाने गळतागळता नवी येत होती म्हणून शिरीषासारखी ही पालवी पाहिल्याने डोळ्यांत भरत नव्हती. पण, सारी नवी पाने आल्यावर खरोखरच उन्हात जेव्हा ही भडक गुलाबी पाने चमकतात, तेव्हा जणू काही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुलले आहेत असे वाटते.’ गहिर्‍या गुलाबी पानांच्या रेशमी पताका,सुंदर पुष्पाचे गेंद, या कल्पनाच किती सुखावह आणि मनावर गुलाब फिरवल्या आहेत. एकूणच काय तर प्रत्येक साहित्यिकाचे या चैत्रपालवीवर विशेष प्रेम आहे. या वसंतागमनाचे साध्य करून कधी प्रेमातून, कधी विरहातून, कधी पाना-फुलांतून तो कवी-लेखक स्वतःला अभिव्यक्त करत राहतो, हे नक्की!
 
- वेदश्री दवणे
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0