शिवरायांच्या महाराष्ट्रात महापुरुषच उपेक्षित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2022
Total Views |
 
 
cm
 
 
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव आणि पराक्रमामुळे ओळखल्या जाणार्‍या महाराष्ट्रात त्यांचेच नाव घेऊन सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी (मविआ) सरकारच्या काळात महापुरुषच उपेक्षित राहत असल्याचा लाजिरवाणा प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे दरवर्षी ज्या महापुरुषांची जयंती साजरी केली जाणार आहे, त्यांची नावे जाहीर केली जातात. मात्र, संबंधित विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या यादीतून छत्रपती संभाजी महाराज, शीख समुदायाचे गुरू नानक, गुरू गोविंदसिंग, माता रमाई आंबेडकर, लहुजी वस्ताद साळवे यांची नावे वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. याचिकाकर्ते तुषार दामगुडे यांनी या संदर्भात माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीतून ही बाब नुकतीच समोर आली आहे. “शिवरायांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या मविआ सरकारला महापुरुषांचे वावडे आहे,” अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते तुषार दामगुडे यांनी दिली आहे.
 
 
प्रतिवर्षी महाराष्ट्र शासनाच्यावतीने महापुरुषांची जयंती साजरी करताना सदरील नावांची यादी शासनाच्यावतीने जाहीर केली जाते. जयंती साजरी करण्याच्या यादीत आपल्याला पसंत असलेल्या व्यक्तींचा नव्याने समावेश करण्यासाठी ’सामान्य प्रशासन विभागा’कडे शिफारस करावी लागते. त्या शिफारशींच्या संदर्भात अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री घेतात. यांनी ’सामान्य प्रशासन विभाग’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अखत्यारित असून या विभागाद्वारे हा निर्णय घेतला जातो. तुषार दामगुडे यांनी याबाबत अधिकची माहिती समाजमाध्यमांवर टाकत या प्रकरणाचा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, “डिसेंबर २०२० पर्यंत शासकीय स्तरावर जयंती साजरी केली जावी, यासाठी सरकारकडे नऊ व्यक्तींच्या नावांची शिफारस झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यातील पाच नावे नाकारली व नव्याने चार व्यक्तींचा समावेश केला आहे.
 
 
मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या चार नावातील एक नाव त्यांचे स्वतःचे वडील आणि शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे नाव म्हणजे मुख्यमंत्र्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे आहे. विशेष बाब म्हणजे ही दोन नावे मंजूर करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी केलेल्या शिफारशींचाच आधार मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ज्यावर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची जयंती साजरी करण्याच्या संदर्भात शिफारस करण्यात आली होती, त्याच वर्षी ती लगेच मंजूर झाली आहे. मात्र, हे करत असताना मुख्यमंत्र्यांनी त्याच वर्षी शिफारस करण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज, शीख समुदायाचे गुरू नानक सिंग, गुरू गोविंद सिंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम पत्नी माता रमाई, थोर क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांची नावे डावलली आहेत.”
 
 
संभाजी महाराजांचे नाव डावलणे दुःखद !
 
“ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जातो, त्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्याच नावाने स्थापन झालेला व जहाल हिंदुत्त्वाचा पुरस्कर्ता म्हणवून घेणारा पक्षच संभाजी महाराजांचे नाव डावलतो, हे अधिक दुःखद आहे. आधुनिक हिंदुस्थानच्या जडणघडणीत वरील व्यक्तींचे किती मोठे कर्तृत्व आहे हे तमाम भारतातील सर्वसामान्य जनता जाणते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्या व्यक्तींना डावलण्यामागे नेमके काय निकष लावले, हे समजण्यास किमान मला तरी मार्ग नाही. आजवर सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांतून निर्माण केले जाणारे महामार्ग, विमानतळ, महापौर बंगले व इतर शासकीय मालमत्ता यांचा आपल्या सोईनुसार वापर करण्याचे प्रकार सुरू होते. पण, आता त्यात आपल्या कुटुंबांतील सदस्यांची वर्णी महापुरुष म्हणून लावून त्यांची जयंती साजरी करण्याचा नवा पायंडा पडण्याचा तर हा प्रकार नाही ना,” असा सवाल दामगुडे यांनी विचारला आहे.
 
 
“यासंदर्भात मी शासन स्तरावर छत्रपती संभाजी महाराज, गुरू नानक, माता रमाई, लहुजी वस्ताद, गुरू गोविंदसिंग यांची जयंती साजरी करण्यात यावी, यासाठी पत्रव्यवहार करणार आहे. त्याचप्रमाणे महापुरुषांच्या यादीत कुठल्याही व्यक्तींचा समावेश करण्यासाठी नेमके कोणकोणते गुण, कार्यकर्तृत्वआवश्यक आहेत, याचे लिखित स्वरूपातील निकष बनवण्यासाठी मान्यवरांची समिती गठीत करण्यात यावी. जेणेकरून भविष्यात अनावश्यक वादविवादाचे प्रसंग टळतील,” अशी भूमिका याचिकाकर्ते तुषार दामगुडे यांनी मांडली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@