संघसमर्पित ध्येयव्रती

15 Apr 2022 09:23:21
 
 
maans
 
 
नागपूरमध्ये देश आणि समाजकल्याणासाठी कार्यरत विविध संघटनांचे प्रतिनिधित्व आणि सामाजिक नेतृत्व करणारे सुनील किटकरू. त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला मागोवा...
 
 
 
तीन वर्षांपूर्वीची घटना. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी एका शिक्षकाची भर बाजारात गोळी मारून हत्या केली. त्यावेळी ‘विवेक विचारमंच’ नागपूर शहराचे प्रमुख सुनील किटकरू गडचिरोलीमध्ये होते. यासंदर्भात आणखी माहिती घेण्यासाठी सुनील स्थानिक पोलीस ठाण्यात गेले. त्यावेळी तिथल्या भिंतीवर मोजून 350 पोलीस कर्मचार्‍यांचे फोटो लावले होते. हे सगळे कर्मचारी नक्षली हल्ल्यात ठार झाले होते. आता तिथे भिंतीवर तसूभरही जागा नव्हती. नक्षल्यांचे क्रौर्य आणि जंगलराज पाहून सुनील यांना वाटले यांना विरोध कोण करणार? पुढे ते त्या शिक्षकाच्या शाळेत गेले. शाळेच्या मुख्याध्यापकांशी आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर गडचिरोलीच्या इतिहासात कधी घडले नव्हते ते घडले. शाळेचे कर्मचारी आणि जवळ जवळ 600 विद्यार्थ्यांनी ‘नक्षली मुर्दाबाद, हिंसा थांबवा’ वगैरे घोषणा देत बॅनर हातात घेऊन गावात मोर्चा काढला. पहिल्यांदाच नक्षलींना असा गावातून विरोध झाला. त्यानंतर त्याच रात्री नक्षल्यांनी गावात पत्रक फेकली. त्यात लिहिले होते - शिक्षकाची हत्या गैरसमजुतीमुळे झाली. एकंदर नक्षल्यांना हादरा बसला होता. त्यानंतर गडचिरोली आणि परिसरातून नक्षल्यांना जनसामान्यांकडून विरोध वाढत गेला. नागपूरचे रहिवासी असूनही गडचिरोली जिल्ह्यातील अन्याय, अत्याचार, दहशत आणि देशद्रोही कृत्यांना विरोध म्हणून नक्षल्यांच्या विरोधात जनसमर्थन एकत्र करणारे असे हे सुनील किटकरू.
सुनील ‘विवेक विचारामंच’ विदर्भाचे संयोजक आहेत. ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भातील ‘भारत मेरा घर’ या उपक्रमाचे नागपूर शहराचे ते संयोजक आहेत. रा. स्व. संघ समरसता गतविधी टोळी महाराष्ट्राचे आणि धर्म जागरणमहाराष्ट्र टोळीचेही ते सदस्य आहेत.याचबरोबर ते ‘भारतीय विचार मंच’ नागपूरचे संयोजकही आहेत. देश- समाजासाठी तळमळ असणार्‍या आणि आयुष्यभर कार्यरत असणार्‍या सुनील यांच्या आयुष्याचा मागोवा घेतला.
मुळचे नागपूरचेच असलेले विठ्ठल आणि विजया किटकरू दाम्पत्य. अत्यंत धार्मिक आणि पापभिरू. त्यांचे सुपुत्र सुनील. अभ्यासात हुशार असलेलेसुनील बालपणापासून रा.स्व.संघाच्या शाखेत जाऊ लागले. त्यावेळी विलास फडणवीस हे नागपूर महानगर कार्यवाह होते, तर नगर कार्यवाह होते अविनाश संघवई. या दोघांच्या विचारकार्यामुळे सुनीलयांच्या देश आणि सेवाकार्याला एक दिशा मिळाली. विलास हे अनेकदा सुनील आणि इतर मुलांना म्हणत, “चला फिरून येऊ.” मुलांची वय ती काय? १३-१४ वर्षे. या मुलांना ते नागपूरच्या झोपडपट्टीमध्ये घेऊन जात. आपल्याच समाजबांधवांना कसे कष्टात राहावे लागते? त्यांचे दुःख आपणच दूर करायला हवे. या सगळ्यांना वाटायला हवे की आपण त्यांचे बंधू आहोत,असे ते मुलांना सांगायचे. त्यातूनच मग वयाच्या १४व्या वर्षीच नागपूरच्या काचीपुरा या गोंड समाजाच्या वस्तीमध्ये सुनील यांनी संघाची शाखा लावली. मात्र, त्यावेळी स्थानिक काँग्रेसी कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला त्यांनी सुनीलवर हल्ला करत त्यांचा चष्माही तोडला. मात्र, किशोरवयीन सुनील डगमगले नाहीत. त्यांनी तिथे संघ माध्यमातून वाचनालयसुरू केले. हळूहळू लोकपयोगी उपक्रम सुरू केले. काही वर्षांतच ती वस्तू १०० टक्के संघमय झाली आणि तिथे एका कार्यक्रमाला संघाचे तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस आले. यामुळे सुनील यांच्या मनात आले की, ध्येयाने आणि चिकाटीने केलेल्या समाजशील नि:स्वार्थी कामाला समाजसमर्थन लाभतेच.
असो. समाजाचे कार्य करत असतानाच त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांनी ‘मॅकेनिकल इंजिनिअरिंग’ पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. नव्वदचे दशक असावे. ईशान्य भारत दहशतवादामुळे आणि धर्मांतरामुळे अस्वस्थ होता. त्यावेळी सुनील यांनी अरूणाचल प्रदेशमध्ये प्रचारक म्हणून जायचे निर्णय घेतला. हे दहा वर्ष तर संघर्ष आणि समन्वयाची निर्णायक वर्षे होती. यावर तर एक पुस्तकच तयार होईल. या काळात त्यांनी अरूणाचल प्रदेशामध्ये संघशाखांचा विस्तार केला. पुढे ते नागपूरमध्ये परतले. त्यांचा विवाह नीता यांच्याशी झाला. सुरुवातीला काही काळ सुनील यांनी नोकरी केली. मात्र, नोकरीमुळे समाजकार्याला वेळ देता येत नव्हता. समाजकार्य तर सुनील यांचा ध्यास. त्यामुळे मग त्यांनी नोकरी सोडून आर्थिक सल्लागार म्हणून स्वतंत्र व्यवसाय करायला सुरुवात केली. ईशान्य भारतात दहा वर्षे प्रचारक म्हणून काम केल्यामुळे तिथल्या तरुणाईला देशाच्या इतर भागाशी जोडणे कसे महत्त्वाचे आहे, हे त्यांना माहिती होते. त्यामुळेच ‘भारत मेरा घर’ या योजनेसाठी ते काम करू लागले. गेल्या काही वर्षांत ईशान्य भारतातील हजारो मुलांना नागपूर शहरात शिक्षण मिळवून देण्यासाठी सुनील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी काम केले. आजही ईशान्य भारतातील मुले ईशान्य भारतात देशसमाजाच्या कल्याणासाठी काम करणार्‍या विविध संस्थामध्ये स्वेच्छेने काम करत आहेत. सुनील म्हणतात, “मी रा. स्व. संघाचा स्वयंसेवक आहे. समाजाचे ऋण आहेत. देश कल्याणापुढे सगळे शून्य आहे. मातृभूमीसाठी प्राणपणाला लागले, तर ते भाग्यच.” अगणित तरुणांमध्ये राष्ट्रनिष्ठेची आणि समाजप्रेमाची ज्योत तेववणारे सुनील किटकरू हे समाजासाठी आदर्शच आहेत.
Powered By Sangraha 9.0