भारतालाही अमेरिकेतील मानवाधिकारांची काळजी!

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे अमेरिकेला चोख प्रत्युत्तर

    दिनांक  14-Apr-2022 12:50:37
|

JS
नवी दिल्ली : “ज्याप्रमाणे अन्य देश भारताच्या मानवाधिकारांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवतात. त्याचप्रमाणे भारतही अमेरिकेसह अन्य देशांमधील मानवाधिकारांची काळजी करतो,” असे रोखठोक प्रत्युत्तर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी अमेरिकेस दिले. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या मंत्रिस्तरावरील ‘2+2’ चर्चेसाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे अमेरिका दौर्‍यावर आहेत. त्यादरम्यान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मानवाधिकारांविषयी भारतासह संपूर्ण जगाला उपदेश देणार्‍या अमेरिकेस रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे.
संयुक्त पत्रकार परिषदेत अमेरिकी प्रशासनातील सचिव ब्लिंकेन यांच्या टिप्पणीविषयी एस. जयशंकर म्हणाले की, “लोकांना आमच्याबद्दल विचार करण्याचा अधिकार आहे. परंतु, आम्हालाही त्यांच्या मतांबद्दल, हितसंबंधांबद्दल, लॉबींबद्दल आणि मतपेढ्यांविषयी विचार करण्याचा तितकाच अधिकार आहे. त्यामुळेच अन्य देशांसह अमेरिकेतील मानवाधिकारांच्या मुद्द्यांविषयीदेखील भारताला चिंता वाटते. प्रामुख्याने ज्यावेळी येथील भारतीय समुदायाच्या संदर्भात मानवाधिकारांचा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी भारतही त्या मुद्द्यांना अतिशय स्पष्टपणे मांडत असतो,” असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.