‘नवाबी’ थाट उतरवला!

14 Apr 2022 12:41:03

Nawab
 
मुंबई (प्रतिनिधी): कुख्यात ‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिमशी संबंधितांसोबत ‘मनी लॉण्ड्रिंग’ केल्याच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे अल्पसंख्याकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली. ‘ईडी’ने नवाब मलिक यांच्या एकूण आठ मालमत्तांवर टाच आणली.
 
 
‘ईडी’ने नवाब मलिक यांची कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंड येथील मालमत्ता, उस्मानाबाद येथील 147 एकर जमीन, मुंबईतील तीन सदनिका आणि दोन राहत्या घरांचा समावेश आहे. ‘ईडी’ने फेब्रुवारी महिन्यात नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक यांची सातत्याने चौकशी सुरू आहे. या दरम्यानच्या काळात ‘ईडी’ने त्यांच्या मालमत्तांची माहिती गोळा केली होती. ही सर्व माहिती घेतल्यानंतर ‘ईडी’ने अखेर नवाब मलिक यांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. मुंबईतील विशेष ‘पीएमएलए’ न्यायालयाने मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत दि. 18 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मलिक यांना कोठडीत बिछाना, खुर्ची उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच घरचे जेवण आणि औषध घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0