रा.स्व.संघाच्या पत्राबाबत माध्यमांचा खोडसाळपणा!

14 Apr 2022 13:29:24


RSS
 
 
 
मुंबई (प्रतिनिधी): हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळामुळे आपली अडचण होत असल्याची तक्रारवजा विनंती करणारे पत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे धाडण्यात आल्याचे वृत्त बुधवारी सर्वत्र प्रसारमाध्यमांमध्ये झळकले. परंतु, हा माध्यमांचा खोडसाळपणा असून वास्तविकता काही वेगळीच आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परळ विभाग धर्मजागरण संयोजक नितीन म्हात्रे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला सांगितले.
 
ते म्हणाले की, “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने कोणताही विरोध करण्यात आलेला नाही. आम्ही महापालिकेकडे रीतसर पत्रव्यवहार करून पर्यायी जागेची मागणी केली आहे. आमची मूळ मागणी हीच आहे. आम्ही कोणत्याही प्रकारे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळास विरोध केलेला नाही. परंतु, काही माध्यमांमध्ये याबाबात असे वार्तांकन करण्यात आले आहे. हा निव्वळ खोडसाळपणा आहे,” असे ते म्हणाले.
 
शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाला लागूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेसाठीची जागा आहे. संघाच्या दादरमधील विभागामार्फत पालिकेला पाठवलेल्या पत्रानुसार, 1936 पासून संघाची शिवाजी पार्कवर शाखा भरते. 1967 मध्ये पालिकेने तेथील 1755 चौरस मीटरचा भूखंड संघाच्या शाखेसाठी भाडेपट्टीवर दिला. 2007पर्यंत या भूखंडाचे भाडेदेखील शाखेमार्फत भरण्यात आले. मात्र, 2007पासून आत्तापर्यंत पालिकेकडे वारंवार मागणी करूनदेखील या भूभागाचे आरेखन करण्यात न आल्यामुळे त्याचे भाडे थकीत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. सदर जागेचे थकीत भूभाडे तातडीने स्वीकारण्यात यावे, अशी मागणीही या माध्यमातून करण्यात आली आहे. स्मृतिस्थळाची वाढती व्याप्ती लक्षात घेता सदर भूभागाऐवजी शिवाजी पार्क मैदानाजवळील ‘नाना-नानी पार्क’ येथील मोकळा पर्यायी भूखंड भाडेपट्ट्यावर जागेचे आरेखन करून देण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0