हम साथ साथ हैं...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2022   
Total Views |

pakistan
 
 
 
 
पाकिस्तानातील राजकीय परिस्थितीने मागील काही दिवसांत प्रचंड उलथापालथ अनुभवली. कधीकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असणारी शरीफ आणि भुट्टो घराणी सत्तास्वार्थासाठी एकत्र आली. नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू शाहबाज शरीफ पंतप्रधानपदी विराजमानही झाले. आज-उद्यामध्ये कदाचित शरीफ यांचे मंत्रिमंडळ जाहीर होईलही. परंतु, ‘पीपीपी’, ‘एमक्यूएम’, अपक्ष अशा सगळ्यांनाच सोबत घेऊन मंत्रिमंडळाचा कारभार हाकणे हे शाहबाज शरीफ यांच्यासाठी नक्कीच आव्हानात्मक असेल, हे मात्र निश्चित. खरंतर शाहबाज शरीफ यांच्या हातात विद्यमान संसदेची मुदत संपेपर्यंत एक वर्षांचा कालावधी जरुर आहे. पण, पाकिस्तानची डळमळीत झालेली अवस्था पाहता, शरीफ यांना आपला देश सावरता येईल की नाही, याची साशंकता आहेच. त्यामुळे एकीकडे पक्षीय कडबोळ्यांचे मंत्रिमंडळ आणि दुसरीकडे देशाची बिकट अवस्था, असे दुहेरी संकट शरीफ यांच्या अडचणीत भर घालणारेच ठरू शकते.
 
 
 
 
शाहबाज शरीफ हे वास्तवादी नेते म्हणून पाकिस्तानात ओळखले जातात. एकदा एखादे काम हाती घेतले की, ते तडीस नेणे यामध्ये त्यांचा हातखंडा असल्याचे पाकिस्तानात म्हणतात. आता शाहबाज शरीफ पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांचे व्हिडिओ पाकिस्तानी आणि भारतीय समाजमाध्यमांत प्रचंड व्हायरलही झाले. त्यामध्ये शरीफ यांच्या आवेशपूर्ण हावभावांमुळे समोरील माईकची जी अवस्था झाली, तीच आता अख्ख्या पाकिस्तानचीही होते की काय, अशीही भीती आता पाकिस्तानी व्यक्त करतात. पण, आधी म्हटल्याप्रमाणे या ज्युनिअर शरीफांसाठी या सगळ्या मित्रपक्षांना एकत्र घेऊन आगामी वाटचाल करणे हे सर्वाधिक आव्हानात्मक ठरणार आहे. शरीफांचा ‘पीएमएल-एन’ आणि भुट्टो-झरदारींचा ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ (पीपीपी) हे दोन्ही पक्ष एकमेकांचे पूर्वापारचे पारंपरिक विरोधक. अगदी ज्याप्रमाणे भारतात काँग्रेस आणि भाजप, तशीच गत पाकिस्तानातही. पण, काँग्रेसप्रमाणेच घराणेशाही आणि भ्रष्टाचाराने हे दोन्ही पक्ष तितकेच पोखरलेले. म्हणूनच नवाझ शरीफांना पाकिस्तानातून कारवाईच्या भीतीपोटी इंग्लंडला पलायन करायची वेळ आली. आता आपले बंधूच पंतप्रधानपदी विराजमान होणार म्हटल्यावर नवाझ शरीफही पुढील महिनाभरात पाकिस्तानात सक्रिय होणार असल्याची चर्चा आहेच. त्यामुळे नवाझ शरीफ यांचे पक्षातील निष्ठावान, निकटवर्तीय यांना शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळात स्थान निश्चित मानले जाते आहेच. पण, ‘पीपीपी’ व अन्य पक्षातील नेतेमंडळींनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची आशा आहेच. यामध्ये सर्वाधिक चर्चेतील नाव म्हणजे बिलावल भुट्टो. पाकिस्तानच्या पहिला महिला पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे सुपुत्र. बिलावल सध्या ‘पीपीपी’चे अध्यक्ष आहेत.
 
 
 
 
शरीफ यांच्या मंत्रिमंडळात बिलावलला परराष्ट्र खाते दिले जाईल, अशा चर्चा आहेत. पण, ‘पीपीपी’मधील एक गटाला वाटते की, शरीफ यांच्या आदेशाखाली अशाप्रकारे पक्षाध्यक्षांनी मंत्री म्हणून काम करणे योग्य ठरणार नाही, तर दुसरीकडे ‘पीपीपी’मधील काही नेत्यांच्या मते, बिलावल यांनी ही जबाबदारी आव्हान म्हणून स्वीकारावी, जेणेकरून त्यांचे परदेशातील संबंध अधिक वृद्धिंगत होतील व भविष्यात बिलावल पंतप्रधान झाले, तर त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे नेमका बिलावल काय निर्णय घेतात, ते काही दिवसांत स्पष्ट होईलच. पण, ‘पाकिस्तानचा पप्पू’ अशी ओळख असलेल्या आणि त्यांच्या उर्दूमुळे पाकिस्तानात हसण्यावारी नेले जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे बिलावल भुट्टो. असे व्यक्तिमत्त्व जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करेल तेव्हा इंग्रजी सफाईदार असली तरी कुठे, किती आणि नेमके काय बोलावे, हे बिलावल यांना कितपत समजेल, याची साशंकता आहेच. त्यातच अमेरिकेशी, भारताशी परराष्ट्र संबंध पुनर्स्थापित करण्याचे आव्हानही पाकिस्तानसमोर आहे. त्यामुळे परराष्ट्र खात्यासारखे महत्त्वाचे खाते हे बिलावलपेक्षा एखाद्या अनुभवी नेत्याच्या पदरात देणेच पाकिस्तानसाठी हितकारक ठरू शकते. तेव्हा, शाहबाज शरीफ त्यासंदर्भात काय निर्णय घेतात, ते पाहावे लागेलच.
 
 
 
 
त्यातच पाकिस्तानच्या सैन्याशी आणि ‘आयएसआय’शीही शाहबाज शरीफ यांनाही सगळ्याच पंतप्रधानांप्रमाणे जुळवून घ्यावे लागेल. म्हणूनच आज इमरान खान यांना बाजूला सारुन ‘हम साथ साथ हैं’ म्हणत सत्तारुढ झालेल्या विरोधकांची एकता किती टिकते, तेच पाहायचे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@