मुंबई : मुंबईत दररोज साचणारा कचरा साफ करून जनतेला दिलासा देणार्या सफाई कर्मचार्यांच्या १९० कोटी रुपयांच्या भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) हातसफाई करण्यात आली आहे. एवढी मोठी रक्कम गेली कुठे, असा संतप्त सवाल या कर्मचार्यांनी केला आहे. यामुळे त्रस्त झालेल्या सफाई कर्मचार्यांनी मंगळवार, दि. १२ एप्रिल रोजी आझाद मैदानावर ‘महा मोर्चा’ काढण्याची घोषणा केली आहे.
कचरा वाहतूक श्रमिक संघाचे सरचिटणीस मिलिंद रानडे यांनी सांगितले की, “२००९ पासून ४ हजार, ९०० सफाई कामगारांच्या ‘पीएफ’ खात्यात ३ लाख, ८० हजार रुपये जमा व्हायला हवे होते. परंतु, आतापर्यंत ‘पीएफ’ खात्यात ही रक्कम जमा झालेली नाही. ही सर्व रक्कम १९० कोटी आहे. सफाई कामगारांबाबत कामगार न्यायालयाने सर्वोच्चन्यायालयाला जे काही आदेश दिले होते, तेपण पाळले गेले नाहीत.”
दि. २ जून, २०१८ रोजी कामगारांचे प्रधान सचिव राजेशकुमार यांच्यासमवेत झालेल्या संयुक्त बैठकीत प्रत्येक कामगाराचा भविष्य निर्वाह निधीचा हिशेब देण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, चार वर्षे उलटल्यानंतरही महापालिका प्रशासन हिशोब देण्यात अधिकारी टाळाटाळ करत आहेत. तसेच, अधिकार्यांनी १९० कोटी रुपये कोठे गायब केले, याची माहिती नाही. कोरोना योद्ध्यांकडून व्यावसायिक कर कपात करण्यात आली. मात्र, त्याची रक्कम किती आहे, हेदेखील माहीत नाही. महापालिका प्रशासन आणि कंत्राटदारांच्या भ्रष्ट कारभाराचा फटका सफाई कर्मचार्यांना विनाकारण बसत आहे, असे रानडे यांनी सांगितले.