दर्याकिनारीचा ‘विकास’ नायक

12 Apr 2022 09:24:23
 
 
vikas
 
 
 
कोळी समाजबांधवांचे उत्थान व्हावे, त्यांच्या पारंपरिक आणि आधुनिक समस्या सुटाव्यात यासाठी सर्वतोपरी कार्य करणारे विकास कोळी. त्यांच्या कार्यशीलतेचा घेतलेला मागोवा...
मी डोलकर डोलकर दर्याचा राजा...’ पण खरंच समुद्रात ये-जा करणारा हा दर्याचा राजा आता राजा उरला का? कोळी समाजातील युवकांना पारंपरिकतेचा वारसा लक्षात घेत रोजगार मिळवून देता येईल का? यासाठी मुंबईतील वर्सोव्याचे विकास कोळी कार्यरत आहेत. विकास यांच्या कारकिर्दीचा आलेख तसा खूपच मोठा. ते ‘नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमन महाराष्ट्र’चे राज्य कार्याध्यक्ष तर, ‘फिशरमन चेंबर ऑफ कॉमर्स’चे संस्थापक आहेत, ‘विकास विक्ट्री कन्सेप्ट’ कंपनीचे विश्वस्त आहेत. ते ‘ब्रॅण्डिंग बॉक्स’ या कंपनीचे संस्थापक-विश्वस्त. या कंपनीने आजपर्यंत अडीच हजार मराठी उद्योजकांच्या उद्योजक व्यवसायाला ‘ब्रॅण्ड’ मिळवून दिला. ‘भूमिपुत्र फाऊंडेशन’ या संस्थेचेही ते संस्थापक असून या माध्यमातून त्यांनी कोळी समाजाच्या महिला आणि युवकांना रोजगार मिळवून दिला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना समाजातील महिला युवकांपर्यंत पोहोचवणे, त्याचा फायदा समाजाला मिळवून देणे, असे या संस्थेचे कार्य. या संस्थेतर्फे विकास यांनी जवळ जवळ ६०० लोकांना लाभ मिळवून दिला. विकास यांचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचा आग्रह असतो. त्यामुळेच समाजाच्या उद्यमशीलतेमध्ये प्रसारमाध्यमांचा उपयोग त्यांनी केला. त्यांनी ‘कोळीबाबा डॉट इन’ नावाचे संकेतस्थळ बनवले. त्यामध्ये ५०० कोळी नागरिकांना सहभागी करून घेतले. कोळी समाजातील वस्तीमध्ये कुटिरोद्योग करणार्‍या, लघुउद्योग करणार्‍या अतिशय प्राथमिक स्तरावरच्या उद्योजकांना यामध्ये संधी दिली गेली आहे. या संकेतस्थळावर ग्राहक अगदी कोळंबीचं लोणचं, सुकटची चटणी, भाकरी आणि पारंपरिक कोळी खाद्यपदार्थांची मागणी नोंदवू शकतात. इतकेच काय, एखाद्याला कोळी पारंपरिक जीवनशैली समजून घ्यायची असेल, एकदिवस कोळी समाजाच्या पारंपरिक जीवनाचा अनुभव घ्यायचा असेल किंवा सागरी सफर करत कोळ्यांचे पारंपरिक स्वयंपाकाचा आस्वाद घ्यायचा असेल, तर त्याचीही मागणी या संकेतस्थळावर करता येऊ शकते. वर्सोवा,मढ आयलंड, माहूलसारख्या कोळी गावठाणात याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातून कोळी समाजातील युवकांना रोजगार प्राप्त होत आहे.
 
विविध संस्था आणि कंपनीच्या माध्यमातून कोळी समाजाचा विकास करणारे विकास कोळी. विकास यांच्या कार्यशीलतेची आणि कार्यक्षमतेची प्रेरणा आणि जडणघडण कशी असेल? त्यांचा जन्मच कोळी समाजातला. वर्सोवा येथे मोतीराम आणि यशोदा या दाम्पत्याचे सुपुत्र विकास. मोतीराम एका खासगी कंपनीत कामगार, तर त्यांची आई यशोदा मासळी विकायच्या. हे कुटुंब अत्यंत कष्टाळू आणि धार्मिक. विकास यांनी लहानपणापासून पाहिले की, कोळी भवन निर्माण करा, कोळ्यांनाही शेतकर्‍यांसारखे अनुदान द्या, सवलती द्या, डिझेलचे दर कमी करा, समुद्राचे प्रदूषण थांबवा, अशा मागणी असलेले फलक कोळीवाड्यात लागलेलेअसायचे. ३५ वर्षांपूर्वी दिसलेल्या फलकांमध्ये आणि कोळी समाजाच्या मागण्यांमध्ये कोणताच फरक आला नाही. विकास यांना वाटे की, सगळे जग बदलले. मात्र, आपला कोळी समाज आणि मागण्या आहे तिथेच आहेत. मात्र, कोळी समाजाची आणि विकास कोळी यांचीही घरची आर्थिक स्थिती ढासळत होती. वाढत्या समुद्री प्रदूषणामुळे मासेमारीच्या व्यवसायात फारसा नफा मिळेनासा झाला. घरची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली की, त्यांना दहावीनंतर महाविद्यालयात प्रवेशही घेता आला नाही. त्यामुळे एक वर्ष छोटीमेाठी कामे करून त्यांनी दुसर्‍याच वर्षी महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढे ‘अ‍ॅनिमिशन’ संगणक शिक्षण घेतानाच ते त्या क्षेत्रात नोकरीही करू लागले. अत्यंत मेहनतीने अगदी वरच्या स्तरापर्यंत पोहोचले. भारतभर फिरताना त्यांना जाणवले की, मराठी बांधवही उद्योग-व्यवसायात आहेत. यातील बहुतेक उत्पादन इतर लोक किंवा मोठमोठ्या कंपनी विकत घेतात आणि त्यावर त्यांचा ‘लोगो’ लावतात. विकास यांना वाटले की, मराठी उद्योेजकांनी ‘ब्रॅण्ड’ म्हणजेच आपले नाव विकसित केले, तर त्यांचे उत्पादन ते स्वतःच्या नावाने बाजारात आणू शकतात. हा विचार अमलात आणण्यासाठी त्यांनी मराठी उद्योजकांशी संपर्क वाढवला. त्यावेळी त्यांना कळले की, खरंच या सगळ्याची गरज आहे. त्यामुळे मग ‘ब्रॅण्ड बॉक्स’ ही कंपनी त्यांनी स्थापन केली.
 
हे सगळे करत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. सागर किनारे स्वच्छ करणे, पर्यावरणासंदर्भात जागृती करणे सुरू केले. पण, समुद्र किनारे स्वच्छता करताना विकास यांना दिसले की, समुद्रातून जर १०० टक्के कचरा वाहून किनार्‍यावर येत असेल, तर त्यात २५ ते ३० टक्के कचरा हा वापरलेल्या सॅनिटरी पॅडचा असतो. सॅनिटरी पॅडची विल्हेवाट कशी लावायची? ते नेमके कुठे टाकायचे? कचर्‍यात सॅनिटरी पॅड आहेत हे कचरावेचकांना कसे कळणार? त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. हे सगळे टाळण्यासाठी विकास यांनी लाखो पिशव्या बनवल्या, ज्यावर ‘रेड डॉट’ आहेत. या ‘रेड डॉट’ असलेल्या पिशवीतच महिलांनी वापरलेले सॅनिटरी पॅड टाकायचे. तसेच, ‘रेड डॉट’च्या पिशवीत वापरलेले सॅनिटरी पॅडच असणार याबाबत जागृती कचरावेचकांमध्ये करण्याचे कामही विकास यांनी केले. त्यासाठी ‘रेड डॉट प्रोजेक्ट’ सुरू केला. त्याला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या बॅग ते महिलांना मोफत उपलब्ध करून देतात. यापुढेही स्वयंसेवी संस्था किंवा प्रशासनाच्या माध्यमातून या बॅग्ज महिलांना मोफत मिळाव्यात, यासाठी विकास प्रयत्न करत आहेत. विकास यांना सामाजिक कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कोळी समाजबांधवांच्या प्रश्नासोबतच महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नावर काम करणारे विकास कोळी हे मुंबई किनारपट्टीतल्या कोळीवाड्याचे खरे नायक आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0