न्यू नॉर्मल’ ही संकल्पना ‘कोविड’ काळात आणि नंतरही आपण अधूनमधून ऐकत असतो. पण, फार कमी जणांना हे ठावूक आहे की, ‘न्यू नॉर्मल’ हा शब्दप्रयोग ‘कोविड’ काळातला नसून त्याचा सर्वप्रथम वापर २००८ साली आर्थिक मंदीदरम्यान झाला. तेव्हा, हे ‘न्यू नॉर्मल’ म्हणजे नेमके काय? त्याच्याशी अंतर्बाह्य जुळवून घेताना आपल्याला काय काळजी घेणे गरजेचे आहे? यांसारख्या मुद्द्यांचा या लेखात केलेला हा उहापोह...
या जगात जगत असताना माणूस म्हणून आपण नेमके काय करत असतो; तर आपण अनेक गोष्टी करत असतो. पण, अगदी थोडक्यात सांगायचे, तर आपण जगाशी सतत जुळवून घेत असतो. ‘कोविड’च्या महामारीत आपण जगाशी जुळवून घ्यायचे म्हणजे निश्चित काय करायचे, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. म्हणजे जगातल्या प्रत्येक व्यक्तीला, समाजाला, देशाला कोरोनाने जुळवून घेण्यास भाग पाडले. आपल्या पूर्वीच्या सवयी मग त्या वैयक्तिक असो, कौटुंबिक असो, सामाजिक असो वा व्यावसायिक असो, आपण नवीन निर्माण झालेल्या परिस्थितीशी जुळवून घेतले. असे सातत्याने दोन वर्षे करत करत आपल्याला एक ‘नवीन सामान्य’ (न्यू नॉर्मल) परिस्थितीशी जमवून घेणे जवळजवळ भाग पडले आहे. ऑफिसऐवजी घरातून कामाची ‘सेटिंग‘ झाली. पालकांना व शिक्षकांना नवीन मिश्रित सेटिंगमध्ये घरी ऑनलाईन शिकवणे भाग पडले. त्यासाठी शिक्षकांना त्यांच्या परंपरागत शिकवण्याच्या सवयीमध्ये बदल घडवणे भाग पडले. सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क लावून सामाजिक अंतर पाळत कामकाज, धार्मिक सण, लग्न-वाढदिवस यांसारख्या गोष्टी कराव्या लागल्या. आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांनीच शतकातील कोरोनाकाळ हा राहू-केतूच्या काळापेक्षा भयानक आणि शापित असा काल आहे, हे निश्चित करुन टाकले आहे.
‘कोविड-१९’च्या मृत्युप्रद, चिंताजनक दहशतीमुळे आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनात प्रचंड प्रमाणात बदल झाले आहेत, जे बदल अत्यंत वेगाने आणि कुठलीही जाणीव नसताना अचानक घडत गेले. आयुष्यात नवीन गोष्टींशी जुळवून घेताना येणार्या अनुभवाचे आणि जाणवणार्या भावनांचे क्षितीज विस्तृत असते, कधीकधी ते संक्रमण सुरळीत असते, तर अनेक वेळा पारंपरिकरित्या दैनंदिन जीवनास रुळलेला हा प्रवास जेव्हा नावीन्याकडे जातो, तो खरंच ‘बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्ग सोडू नको’ या उक्तीची जाणीव करून देतो. हा ‘नवीन सामान्य’ (न्यू नॉर्मल) कडे जाणारा खडतर प्रवास गेल्या दोन वर्षांत तसा पाहिला तर थोडसा सवयीचा जरी झाला, तरी माणसं आजही त्यात रुळलेली नाहीत. आजही ती चिडलेली दिसतात.
’न्यू नॉर्मल’ ही संकल्पना पहिल्यांदा २००८ साली झालेल्या आर्थिक संकटात अस्तित्वात आली. त्यावेळी त्यादरम्यान नाट्यमयदृष्ट्या आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तनाचा एक मोठा बदल जगाला दिसला. त्याचा जबर परिणाम होऊन जागतिक अनिश्चितता, असुरक्षिता, सामाजिक अस्वस्थता, सामूहिक आणि वैयक्तिक बदल लोकांच्या जीवनात दिसून आले. कोरोनाच्या जागतिक धुमश्चक्रीत हे सगळे परिणाम पुन्हा एकदा एका विषाणूच्या संक्रमणाने झाले. या कोरोनाच्या वैश्चिक साथीने लोकांच्या जीवनातील अत्यावश्यक बाबी बदलल्या आणि सूक्ष्म पातळीवर त्यांचे दैनंदिन जगणेही बदलत गेले. त्यावेळी पुन्हा एकदा ‘न्यू नॉर्मल’-‘नवीन सामान्यजीवन’ या शब्दाचा पुन्हा एकदा विश्वव्यापी वापर झाला.
दोन वर्षांपूर्वी दि.२७एप्रिल जागतिक आरोग्य संघटनेने ‘कोविड-१९’ची साथ महामारीची साथ म्हणून घोषित केली. जगातले सगळे गरीब-श्रीमंत देश पुढील काही वर्षे सामाजिक, आर्थिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम सहन करत राहणार आहेत. सगळ्या देशाच्या सरकारी यंत्रणा ‘कोविड-19’चे दुष्परिणाम केवळ गरीब आणि असुरक्षित लोकांवर होऊ देणार नाहीत. सर्व जगाला एक लवचिक पातळीवर जगायचा प्रयत्न करायला लागणणार आहे. लोकांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी एक मजबूत आरोग्यप्रणाली निर्माण करावी लागणार आहे.
जर आपल्यापैकी एखाद्याला मार्च २०२० मध्ये कोणी सुचवले असते की, २०२२ मध्ये ‘कोविड’ या जगात असणार आहे, तर आपल्यापैकी कोणीही यावर विश्वास ठेवला नसता. परंतु, गेल्या दोन वर्षांत जगातील आपल्यापैकी प्रत्येकाने ‘कोविड-१९’च्या युगात एक वेगळेच मास्क लावण्यापासून ते प्रत्येकाने दैनंदिन गोष्टी ऑनलाईन झालेली पाहिली आहे. शिक्षण, नोकरी, सामान्य संवाद, वैद्यकीय सेवा, रोजची खरेदी-विक्री, सगळेच डिजिटल वा ऑनलाईन झाले, तेही भराभर... आपल्यापैकी कोणाला हे सगळे शिकून घेतल्यावाचून पर्याय उरलाच नव्हता. थोडक्यात, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की, ‘कोविड-१९’च्या युगात जगणे हे आपले ‘नवीन सामान्य’ झाले आहे. वैद्यकीय संशोधनाच्या अहवालानुसार ‘कोविड-१९’ हा विषाणू आगंतुक पाहुणा होता, पण तो पृथ्वीतलावर राहण्यासाठी आला. निकटच्या भविष्यात फ्लूप्रमाणेच हा विषाणू स्थिरावलेला असेल, असा अंदाज आहे, तर हे ‘नवीन सामान्यजीवन’ नक्की काय आहे आणि कसे असणार आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे.
यासाठी आपल्या सगळ्यांना आपल्या अवतीभवती पाहावयाचं तर आहे, पण आपल्या अंतर्मनातसुद्धा वेळोवेळी डोकवायचं आहे. या विषयावर अनेक संवाद जगभर घडत आहे. प्रत्येकजण हे ‘नवीन सामान्य’ कसे असेल आणि आपण त्याच्याशी कसे जुळले जाणार आहोत, याचा मागोवा घेत आहेत.
-डॉ. शुभांगी पारकर