‘सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील (जीवनकार्य आणि लेखनसमीक्षा)’ या ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. अनेक वर्षे ‘दीनमित्र’ नियतकालिक प्रकाशित करुन सत्यशोधक व समाज प्रबोधक विचारांचा प्रचार-प्रसार करणार्या मुकुंदराव पाटील व त्यांच्यावरील ग्रंथाविषयी हा लेख...
स्वातंत्र्यपूर्वकालीन ब्रिटिश राजवटीत समाजप्रबोधन, समाजसुधारणा यांची प्रदीर्घ अशी उज्ज्वल परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांनी प्रबोधनपर्वाची मुहूर्तमेढ रोवली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दलितमुक्तीसाठीच्या चळवळीने तिचा कळसाध्याय गाठला. या सुमारास दीडशे वर्षांच्या कालखंडात अनेक विचारवंत, प्रबोधनकार आणि कर्ते समाजसुधारक यांनी आपले योगदान दिले आहे. त्यांच्या मांदियाळीतील मैलाचा दगड ठरणारे नाव म्हणजे महात्मा फुले व त्यांनी सुरू केलेली ‘सत्यशोधक समाज’ ही संस्थात्मक चळवळ. त्यांच्या या महान कार्यातील बिनीचे शिलेदार व निष्ठावंत सहकारी म्हणजे कृष्णराव भालेराव. २४ सप्टेंबर, १८७३ रोजी महात्मा फुले यांनी पुणे येथे ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. त्याप्रसंगी जवळजवळ ६० ‘सत्यशोधकां’नी बेलभंडार उचलून ‘सत्यशोधक समाजा’चे अनुयायित्व स्वीकारले, त्यात कृष्णराव व रामचंद्र या भालेकर बंधूंचाही समावेश होता. ते त्यांनी व्रतस्थ वृत्तीने व निष्ठापूर्वक आजीवन पाळले.
पुढे जानेवारी १८७७ रोजी ‘दीनबंधू’ या सामाजिक नावाचे साप्ताहिक त्यांनी सुरू केले. ‘सत्यशोधक’ चळवळीतील ते पहिले नियतकालिक. सव्वातीन वर्षांनंतर आर्थिक चणचणीमुळे त्यांनी हे प्रकाशन ‘मुंबईकर सत्यशोधक’ नारायण मेघाजी लोखंडे यांच्याकडे सोपविले. मात्र, साप्ताहिकाखेरीज ब्राह्मणेतर बहुजन समाजाची मुक्ती चळवळ चालविणे केवळ अशक्य आहे, हे त्यांना मनोमनी जाणवले. ‘दीनबंधू’ हातातून गेल्यानंतर त्यांनी आपले भाचे ग. स. पाटील यांच्याकडून ‘दीनमित्र’ नावाचे नियतकालिक एप्रिल 1888 पासून घेतले व प्रकाशित करण्यास सुरुवात केली. समाजोद्धाराच्या चळवळीबरोबरच पत्रकारितेचे हे व्रत त्यांनी जन्मभर निभावले. प्रथम ‘दीनबंधू’ आणि नंतर ‘दीनमित्र’ यांच्या माध्यमातून त्यांनी केवळ जगजागरण केले, असे नाही तर बहुजन समाजाच्या मुक्तीसाठी व न्याय्य-हक्कांसाठी जनआंदोलने केली व लढेही उभारले. दि. ७ मे, १९३० रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, पण तत्पूर्वी पत्रकारितेचा हा वारसा त्यांनी आपले चिरंजीव मुकुंदराव पाटील यांच्या हाती मोठ्या विश्वासाने सोपविला. सत्यशोधक ‘दीनमित्र’कार ‘मुकुंदराव पाटील : जीवनकार्य आणि लेखन समीक्षा’ या ग्रंथाचा परिचय करून देताना नव्या पिढीसाठी ही प्रस्तावना करणे, मला आवश्यकता वाटले. कारण, आज मुकुंदराव पाटील यांच्या निधनाला ५५ वर्षे पूर्ण झाली आहेत. मुकूंदराव पाटील मूळचे कृष्णराव भालेकर यांचे चिरंजीव. दत्तक विधानाने ते मुकुंदराव गणपतराव क्षीरसागर (पाटील) झाले. गावच्या पाटीलकीमुळे क्षीरसागर हे आडनाव मागे पडले व ‘पाटील’ हेच नाव रुढ झाले. मृत्यूशय्येवर असलेल्या कृष्णरावांनी आपल्या चिरंजीवांकडून एक वचन घेतले होते. अंतसमयी त्यांनी मुकूदरावांना जवळ घेतले व त्यांना ते म्हणाले, “बाळ, मी महामार्गाने जाणारच आहे तेव्हा शोकाकुल होण्यात समंजसपणा नाही. माझी एकच इच्छा आहे की, तू ‘दीनमित्र’ हे पत्र निदान १२ वर्षे तरी माझ्या पश्चात चालविले पाहिजे. लेखणी धरण्यास असमर्थ होण्याचा प्रसंग प्राप्त होईपर्यंत तू पत्र बंद करता नये आणि माझे वचन तू पाळशील, अशी मजपुढे आताच प्रतिज्ञा कर.” मुकुंदरावांनी कृष्णरावांच्या चरणावर हात ठेवून १२ वर्षे पत्र चालविण्याची प्रतिज्ञा केली. एवढेच नव्हे, तर मृत्यूपर्यंत म्हणजे ५८ वर्षे त्यांनी ‘दीनमित्र’ वडिलांच्या पश्चात साप्ताहिक निष्ठेने चालविले. आज सत्यशोधक ‘दीनमित्र’ कार हीच त्यांची खरी ओळख राहिली आहे. मुकुंदराव पाटील यांनी आजन्म अखिल भारतीय सत्यशोधक समाजाला व चळवळीला दिशा दिली. ‘दीनमित्र’ हे ‘सत्यशोधक चळवळी’चे मुखपत्रच झाले, अशा या कर्त्या समाजसुधारकाचे व विचारवंताचे जीवन व कार्य तसेच लेखन याचे मर्म उलगडून दाखविणारा ग्रंथ म्हणजे प्रस्तुतचा ग्रंथ होय.
३२ वर्षे उच्चशिक्षण क्षेत्रात कार्य करणारे प्रा. जी. ए. उगले हे या ग्रंथाचे लेखक. ते ‘सत्यशोधक चळवळी’चे साक्षेपी अभ्यासक व कार्यकर्ते असून अनेक ग्रंथांचे त्यांनी लेखक केले आहे. मुकुंदराव पाटील हे प्रसिद्धीच्या झोतापासून कायम दूर असलेले विचारवंत कार्यकर्ते. त्यांच्या या वृत्तीमुळे त्यांच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही, तरीही संशोधनाच्या माध्यमातून उगले यांनी या अभ्यासपूर्ण ग्रंथांची मांडणी यशस्वीरित्या केलेली दिसते. मुकुंदरावांच्या जन्म २० डिसेंबर, १८६५ रोजी पुणे येथे झाला. त्यांना ८२ वर्षांचे दीर्घ आयुष्य लाभले. त्यांचे निधन दि. ४ डिसेंबर, १९६७ रोजी झाले. त्यांची कर्मभूमी तरवडी (जि. अहमदनगर) येथे झाले. मुकुंदराव आणि ‘दीनमित्र’ या एकाच नाण्याच्या दोन बाजू. त्यामुळे ‘दीनमित्र’व्यतिरिक्त त्यांच्या जीवनाचे फारसे तपशील येथे आढळत नाहीत. वडिलांना दिलेले वचन चार वर्षे सांभाळताना त्यांना खासगी असे फारसे जीवनच उरलेले दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनचरित्रापासून ‘दीनमित्र’ वा ‘दीनमित्रा’पासून त्यांचे जीवनचरित्र वेगळे काढताच येत नाही. या ग्रंथाचे जीवनकार्य हा पूर्वार्ध वाचताना या वस्तुस्थितीचे सतत प्रत्यंतर येत राहते. या भागात त्यांचा जन्म, बालपण, शिक्षण, त्यांची जडणघडण, दत्तक विधानाची पार्श्वभूमी, विवाह, सांसारिक जीवन आदी तपशीलाची धावती नोंद येते. याच्या पुढे त्यांचे सारे जीवन ‘दीनमित्रा’शीच जोडलेले दिसते. एका अर्थाने मुकुंदराव व ‘दीनमित्र’ यांच्या वैचारिक प्रवासाचीच काहणीच आपल्यासमोर उलगडली जाते.
‘दीनमित्र’ पत्राची सुरुवात, त्याचे सोमठाण्याहून तरवडीस झालेले स्थलांतर, ‘दीनमित्रा’वरील संकट, ‘सत्यशोधक’ अधिवेशने, त्यांचे अन्य साहित्यिकांशी व ‘सत्यशोधक’ कार्यकर्त्यांशी असलेले भावबांध, त्यांच्याशी झालेल्या गाठीभेटी, काही कौटुंबिक घटना-घडामोडी, त्यांचे अखेरचे आजारपण या विषयांना धरुन त्यांच्या जीवनपटाची व कार्याची मांडणी येथे केलेली दिसते. हे चरित्र वाचताना असे लक्षात येते की, मुकुंदराव हस्तिदंती मनोर्यात बसून लेखणी चालविणारे संपादक वा पत्रकार नव्हते, तर ‘बोले तैसा चाले’ या वृत्तीने चालणारे सच्चे ‘सत्यशोधक’ व कर्ते समाजसुधारक होते. अनेक सत्यशोधकांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिलेले दिसतात. सत्यशोधकांवर वा बहुजनांवर झालेल्या अन्यायाविरोधात लढताना ते दिसतात. त्यांच्या जीवनशैलीचे हे वैशिष्ट्य आज विशेषच अनुकरणीय वाटते, ज्यांना सामाजिक चळवळी चालवायच्या आहेत. त्यांना ते निश्चितच दिशादर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो. लेखनसमीक्षा या भागात विचारवंत, ललित साहित्याचे लेखक, पत्रकार व संपादक, विविध व्यासपीठावरून घणाघाती परंतु विचारप्रवर्तक भाषणे देणारे वक्ते, बालसाहित्यकार अशा त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण व अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे सुलभ दर्शन होते. एकविसाव्या शतकातील सुधारणावादी नावाची जी विचारसरणी महाराष्ट्रात रुजली, तिचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात उमटलेले दिसते. विवेकबुद्धीच्या आधारे व्यक्तिगत व सामाजिक व्यवहाराची तसेच धर्म व कालबाह्य रुढी, परंपरांची चिकित्सा, सामाजिक संस्थांची पुनर्रचना, नव्या कालसंगत मूल्यांचा शोध, निवृत्तिवादाचा धिक्कार व प्रवृत्तिवादाचा पुरस्कार, जातीपातीतील उच्चनीचतेला विरोध, इष्टवादाचा स्वीकार, प्रत्यक्ष कृतीचा आग्रह व विषमता व अन्याय यांना विरोध, समतेचा पुरस्कार, स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह, पददलित व स्त्रियांवरील अत्याचाराचा विरोेध, स्त्रीमुक्तीचा हुंकार, व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य, समाज सुधारणेसाठी कायद्याचा पाठिंबा आवश्यक ही भूमिका अशा अनेक विषयांचा समावेश त्यांच्या सर्व प्रकारच्या लेखनात होतो. हे लेखन बहुजन समाजाला विचार व व्यवहार प्रवृत्त करेल अशा स्पष्ट व रोखठोक भूमिकेतून दिले आहे. विचारदृष्टीचे व समाजजागरणाचे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे त्या लेखनाचा भाग काहीसा प्रचारकी असणे स्वाभाविक आहे. पण त्यामुळे त्यातील विचारांचे महत्त्व कमी होत नाही.
‘दीनबंधू’, ‘दीनमित्र’ व अशाच बहुजनवादी नियतकालिकांतून पत्रकारितेची एक स्वतंत्र परंपरा निर्माण झाली आहे. एक नवी वृत्तपत्रीय व वाङ्मयीन संस्कृती उदयास आली आहे. या परंपरेचे कृष्णराव भालेकर व मुकुंदराव पाटील हे पिता-पुत्र उद्गाते व प्रवक्ते आहेत, हे निश्चित. ज्यांना वैचारिक, प्रबोधनात्मक व व्यावहारिक अंगांनी सामाजिक समस्यांचा अभ्यास करायचा आहे, अशा जिज्ञासू वाचकांना हा ग्रंथ निश्चितच प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल. या ग्रंथाची परिशिष्टे, संदर्भ यादी व प्रत्येक प्रकरणाच्या भोवती आलेल्या विस्तृत टीपा पाहिल्या म्हणजे लेखकाने हा ग्रंथ किती परिश्रमपूर्वक लिहिला आहे, हे लक्षात येते. वैचारिक जगतात या अभ्यासपूर्ण ग्रंथाचे स्वागत होईल, असा विश्वास वाटतो.
- प्राचार्य श्याम अत्रे