विलेपार्लेचे रस्ते पुन्हा उजेडात; पथदिव्याचा प्रश्न अखेर निकाली

01 Apr 2022 16:36:43
   
vileparle
 
मुंबई : विलेपार्ले पूर्वच्या महात्मा गांधी मार्गावर लावण्यात येणार्‍या पथदिव्यांवरून मोठा वाद रंगला होता. या मार्गावरील मणिभवन आणि पटेल हाऊससमोर लावण्यात येणारा पथदिवा काही महिन्यांपूर्वी कोसळला होता. काही कालावधी नंतर सदरील भागातील रस्त्याची दुरुस्ती करून त्या ठिकाणी फूटपाथ बांधण्यात आले होते. दरम्यानच्या काळात काढण्यात आलेला या ठिकाणचा पथदिवा पुन्हा लावण्यास काही स्थानिक दुकानदारांनी विरोध केल्याने या भागातील रस्ते अंधःकारमय झाले होते. अखेर या रस्त्यावरील काळोखाचे साम्राज्य आता दूर झाले असून, सामाजिक कार्यकर्ते सदानंद साटम तसेच, इतर स्थानिकांच्या पुढाकाराने त्या ठिकाणी पुन्हा एकदा पथदिवा लावण्यात आला आहे.
 
 
अनेक महिन्यांपासून अंधारात हरवलेल्या या रस्त्यावर पुन्हा एकदा पथदिवे लावण्यात हातभार लावण्यासाठी स्थानिकांच्यावतीने अदानी समूहाचे संबंधित अधिकारी, महापालिका प्रशासनातील अधिकारी तसेच, विलेपार्ले पोलीस ठाण्यातील पोलीस बांधवांचे आभार मानण्यात आले आहेत. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करून खरी बाजू समोर आणल्याबद्दल स्थानिकांच्यावतीने दै. ‘मुंबई तरुण भारत’चेदेखील आभार मानले आहेत. त्यासोबतच पथदिवे लावण्यास विरोध करणार्‍या संबंधित दुकानदारांवर प्रशासनाचा नाहक वेळ घालवने, सार्वजनिक कामात अडसर आणणे व अंधरामुळे अप्रिय घटना घालनेस चालना देणे या नियमांच्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणीदेखील स्थानिकांच्यावतीने करण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0