जलतरणातील ‘सागरकांचन’ योग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2022   
Total Views |
 
 
sagar
 
 
‘सुवर्णकांचन योगा’प्रमाणे औरंगाबादच्या एका मायलेकाच्या जोडीने जलतरणामध्ये ‘सागरकांचन योग’ साधला. राष्ट्रीय जलतरणपटू राहिलेल्या कांचन म्हसकर-बडवे आणि त्यांचा दिव्यांग मुलगा सागर बडवे यांनी जलतरण क्षेत्रात आपल्या कामगिरीने ठसा उमटवला आहे. अशी ही कर्तृत्वाची कहाणी म्हणूनच केवळ जलतरणात यशस्वी ठरलेल्या एकट्या सागरची नव्हे, तर कर्णबधीर-अंशत: दृष्टिदोष असलेल्या सागरला जलतरणपटू म्हणून घडवणार्‍या मायमाऊलीचीही...
 
 
तोकिंचाळायचा... तो इतस्तत: वस्तू फेकायचा... स्थिरता तर त्याच्या गावीही नव्हती. असा हा जन्मल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत कर्णबधीर आणि अंशत: दृष्टिदोषाचे निदान झालेला दिव्यांग सागर बडवे. पण, आज ३२ वर्षांच्या सागरने आपले नाव सर्वस्वी सार्थ ठरवून प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर जलतरण क्षेत्रात कर्तृत्वाची गुढी उंच उभारली आहे.
कांचन म्हसकर या मूळच्या पुण्याच्या. पोहण्याची अजिबात आवड नसतानाही त्यांच्या पालकांनी कांचन यांना शारीरिक व्यायामाच्या दृष्टीने जलतरणाची ओळख करुन दिली. मग काय, कांचन यांनीही जलतरणकला आत्मसात केली आणि ‘राष्ट्रीय जलतरणपटू’ म्हणूून नावलौकिकही कमावले. लग्नानंतर कौटुंबिक जबाबदार्‍यांमध्ये हातपाय मारताना पोहणे साहजिकच मागे पडले.

१९८४ साली ‘सीरम इन्स्टिट्यूट’मध्ये ‘मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह’ असलेल्या औरंगाबादच्या राजीव बडवे यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. काही वर्षांतच सागरचा जन्म झाला. पण, पुत्ररत्नप्राप्तीचा तो आनंद अल्पजीवी ठरला. कारण, सागरला ‘ग्लायकोमा’ म्हणजे काचबिंदूचे निदान झाले. जन्मल्यानंतर २१व्या दिवशी शस्त्रक्रिया केल्याने सागरची दृष्टी शाबूत राहिली खरी. पण, कालांतराने तो कर्णबधीर असल्याचेही लक्षात आले. अडीच वर्षांचा असताना सागर दिव्यांग आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. सामान्य मुलांच्या शाळेनेही सागरला प्रवेश नाकारला. तेव्हा ‘श्रुतवाणी शाळे’ने सागरला प्रवेश दिला खरा. पण, सागरच्या आक्रमक वर्तनाची समस्या कायम होती. पुढे ‘स्पीच थेरपी’मुळे काही अक्षरं सागर उच्चारू लागलाही. सागरही इतर मुलांप्रमाणे बोलायला शिकावा म्हणून मग कांचनताईंनीच मुंबई गाठली आणि ‘स्पीच थेरपी’चा कोर्स पूर्ण केला. दरम्यान, सागरला मतिमंद मुलांच्या शाळेत प्रवेशही मिळाला. पुण्याला आजीकडे असताना शारीरिक तंदुरुस्तीसाठी कांचन यांनी सागरला जलतरणाची ओळख करून दिली. सागरने जलतरण आत्मसात करण्यासाठी तब्बल दीड वर्षांचा कालावधी लोटला. मात्र, सुरुवातीला जलतरण तलावापासून दूर पळू पाहणारा सागर कालांतराने जलतरणाशी एकरुप झाला. कांचन यांचा जलतरणाचा अनुभव सागरला प्रशिक्षित करण्यासाठी कामी आला आणि आईप्रमाणेच सागरचीही जलतरणपटू म्हणून वाटचाल सुरू झाली.

सामान्य मुलांच्या त्रिमूर्ती बालक मंदिर शाळेत नंतर सागर दाखल झाला. तिथेही त्याच्या आक्रमक स्वभावामुळे इतर विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या तक्रारींचा कांचनताईंना सामना करावा लागला. पण, चित्रकला स्पर्धा, जलतरण स्पर्धेत सागरने शाळेचे नाव काढल्याने त्याला शाळेची स्वीकार्हता आपसुकच प्राप्त झाली. दिवस पुढे सरकत होते. श्रवणयंत्राच्या आधारे सागर ऐकू शकत होता आणि हळूहळू तो बोलायलाही शिकला. औरंगाबादसारख्या ठिकाणी जलतरणासाठी फारशा सोईसुविधा उपलब्ध नसतानाही सागरने हार मानली नाही. राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय विविध जलतरण स्पर्धांमध्ये तो दिवसेंदिवस अव्वल कामगिरी बजावत गेला. खरंतर सामान्य जलतरणपटूलाही लाजवेल, असे सागरचे जलतरण कौशल्य वाखाणण्याजोगेच. २००२ साली झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सागरने तीन सुवर्ण, दोन रौप्यपदकांची कमाई केली. तसेच विविध खाड्या पोहण्याच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्याने माजी मारली. २००५ मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे आयोजित केलेल्या ‘डेफ ऑलिम्पिक’ स्पर्धेत ४०० मीटर ‘रिले फ्री स्टाईल’ स्पर्धेत सागरने जागतिक स्तरावर आठवा क्रमांक पटकावला. ‘डेफनेस विथ ग्लायकोमा’ असून ‘जिब्राल्टर’ची खाडी पोहणाराही सागर बडवे हा एकमेव जलतरणपटू!

सागरचा प्रवास एकीकडे यशाचे महासागर पादाक्रांत करत असला, तरी त्याच्या पालकांनी त्याचे अभ्यासाकडे अजिबात दुर्लक्ष होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. सागरला दहावीला ७१ टक्के गुण मिळाले, तर पुढे दोन वर्षं विज्ञान शाखेत शिकून बारावीलाही तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. मुक्त विद्यापीठातून पुढे त्याने ‘बीसीए’ची पदवी घेतली. पण, ‘एमसीए’ करण्याच्या पालकांच्या आग्रहापेक्षा क्रीडाक्षेत्रात करिअर करण्याची इच्छा सागरने व्यक्त केली. मग पटियाळातून सुरुवातीला नकार मिळाल्यानंतर दुसर्‍या वर्षी सागरने ‘एनआयएस डिप्लोमा इन स्विमिंग कोचिंग बाय स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया’ ही पदविका पूर्ण केली. ‘बीपीएड’, ‘एमपीएड’चे शिक्षणही पूर्ण केले. परिणामी, आज सागर एक यशस्वी, हरहुन्नरी जलतरण प्रशिक्षक म्हणून लीलया मुलांना प्रशिक्षित करतो.
 
अगदी सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांनाही सागर जलतरणाचे धडे देतो. परिणामी, पूर्वी ‘व्हिलचेअर’वरून साधा उभाही राहू न शकणारा मुलगा सागरच्या प्रशिक्षणानंतर आता पोहायलाही शिकला आणि ‘वॉकर’च्या मदतीने चालायलाही. त्यामुळे दिव्यांग असला तरी सागरचा आत्मविश्वास पाहून, त्याची जिद्द, चिकाटी पाहून, कित्येक पालक त्यांच्या पाल्यांना जलतरणाच्या प्रशिक्षणासाठी सागरकडे आवर्जून घेऊन येतात. त्यामुळे एकंदरीतच शारीरिक तंदुरुस्तीलाजलतरण फायदेशीर ठरते, हे प्रत्यक्ष अनुभवांतून लक्षात घेता, सागर सध्या ‘इफेक्ट्स ऑफ एक्वा थेरपी ऑन दिव्यांग जन’ या विषयावर पीएच.डीदेखील करतो आहे. तसेच सागरची जलतरणातील आजवरची कारकिर्द लक्षात घेता, त्याचा रौप्यमहोत्सवी सोहळाही आयोजित करणार असल्याचे कांचनताई कौतुकाने सांगतात.

सागरच्या या अभूतपूर्व यशामुळे एकदा नव्हे, तर तब्बल दोनवेळा राष्ट्रपतींना भेटण्याचा योग आला. २००२ साली बालदिनाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रपती पुरस्कारा’ने सागरला सन्मानित करण्यात आले. एवढेच नाही, तर जलतरणामध्ये महाराष्ट्रातून ‘छत्रपती पुरस्कार’ही सागरला मिळाला. सातवेळा सर्वसाधारण गटात राष्ट्रीय जलतरण स्पर्धा खेळलेला सागर हा एकुलता एक दिव्यांग. आजवर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ७७ सुवर्णपदके, ३७ रौप्यपदके, २० कांस्यपदकांची लयलूट करणार्‍या सागरला जलतरणाव्यतिरिक्त ट्रेकिंग, सायकलिंग स्वयंपाकाचीही तितकीच आवड. मुलांना गटागटाने सागर दुर्गांची सैरही घडवतो आणि घरातली सगळी कामेही अगदी आवडीने करतो.त्यामुळे तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर माणूस आपले इप्सित ध्येय गाठू शकतो, याचा आदर्शच सागरने घालून दिला. पण, प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे, सागरच्या प्रयत्नांमागे जिजाऊच्या रुपाने खंबीरपणे उभे राहिलेल्या कांचनताईंच्या अथक परिश्रमाचा, संयमशक्तीचा मोलाचा वाटा आहेच. म्हणूनच कांचनताईसुद्धा आज अशाच दिव्यांग मुलांच्या पालकांना प्रशिक्षण देतात. या मुलांशी कसे वागावे, त्यांच्या आवडीनिवडींना कसे पाठबळ द्यावे, यासंबंधी कांचनताई पालकांना सखोल मार्गदर्शन करतात. कांचनताई म्हणतात, “न कंटाळता सातत्याने प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे. कारण, यश हे मिळतंच. फक्त ते कधी मिळेल, ते तुमच्या मुलाची क्षमता, तुमचे प्रयत्न, तुम्ही मुलाला केलेले सहकार्य, साहाय्य यावर अवलंबून आहे.”


असा हा मायलेकांचा ‘सागरकांचन योग’ प्रत्यक्ष जलतरण स्पर्धेतही पाहायला मिळाला, जेव्हा ‘राष्ट्रीय मास्टर्स’ जलतरण स्पर्धेत आईनेही मुलासोबत सहभागी होत दोन रौप्यपदके आणि मुलानेही दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकांवर आपले नाव कोरले. तेव्हा, अशा या ‘छत्रपती’ला आणि त्याला घडविणार्‍या ‘जिजाऊ’ला मानाचा मुजरा!
 
 
मला नाही, तर किमान मी जलतरणासाठी प्रशिक्षित केलेल्या मुलांना तरी ‘ऑलिम्पिक’मध्ये पदक मिळेल, अशी मुलं घडवायची हे माझं ध्येय आहे. तसेच सामान्य मुलं आणि दिव्यांग मुलांमधील एक सेतू म्हणून ती जबाबादारी माझी आहे, असे मला वाटते - कांचन म्हसकर-बडवे
@@AUTHORINFO_V1@@