समाजहितासाठी प्रमोद...

08 Mar 2022 10:59:01

Pramod Kate
शून्यातून अस्तित्व निर्माण करताना समाजहित साधणारे आणि रा. स्व. संघविचारांनी जीवन जगण्याचा प्रयत्न करणारे प्रमोद काटे. त्यांच्या आयुष्याचा वेध घेणारा हा लेख...
 
त्यावेळी कार्यालयात त्या बैठकीस तत्कालीन सरसंघचालक सुदर्शनजी, होवे, शेषाद्रीजी आणि इतर अखिल भारतीय संघ पदाधिकारी उपस्थित होते. व्यवस्थेतला कार्यकर्ता सगळ्यांना पाणी वाटप करत होता. पाणी वाटपाची पहिली फेरी झाली. काही वेळाने त्याने पुन्हा सगळ्यांच्या तांब्यात थोडे पाणी ओतले. सुदर्शनजींच्या जवळ तो कार्यकर्ता येताच त्यांनी हाताने त्याला थांबवले आणि ते म्हणाले, “तांब्यात पाणी आहे, आजही खूप लोकांना पाण्यासाठी मैलोन्मैल चालावे लागते. कितीतरी दिवस पाणी मिळत नाही. पाणी बचत करायला हवी.” त्यावेळी उपस्थित सगळ्यांच्याच लक्षात आले की, आपल्याला पुन्हा पाणी नकोच होते. क्षणात सगळे म्हणाले, “आज काही तासांसाठीचे पिण्याचे पाणी प्रत्येकाला मिळालेले आहे,” आणि असे बोलून सगळे संघ पदाधिकारी पुन्हा बैठकीतल्या चर्चेत सहभागीही झाले. खरेच त्या सगळ्यांनी ते पाणी वाया जाऊ दिले नाही. त्यावेळी त्या व्यवस्थेत एक कार्यकर्ताही उपस्थित होता. ‘पाणी वाचवा’ यावर आजपर्यंत कितीतरी जाहिराती, उपदेश त्याने ऐकले होते. पण, प्रत्यक्षात संघाच्या अखिल भारतीय पदाधिकार्‍यांच्या बैठकीत घडलेल्या या घटनेमुळे त्या कार्यकर्त्यांच्या विचारामध्ये आमूलाग्र बदल झाला. तो कार्यकर्ता होता भांडुपचा प्रमोद काटे.
 
आज प्रमोद ‘श्री सेवा फाऊंडेशन’चे तसेच ‘उद्योग निर्माण सेवा संघा’चे अध्यक्ष आहेत, ‘कोरोना योद्धा कर्मचारी परिषद महाराष्ट्रा’चे ते संस्थापकही आहेत. पूर्व मुंबई परिसरातच नव्हे, तर महाराष्ट्रभर त्यांच्या सेवाकार्याची उपलब्धी आहे. ‘श्री सेवा फाऊंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी भांडुपसारख्या कामगार परिसरात तीन छोटे दवाखाने उभारले. त्या दवाखान्यात २० रुपयात आरोग्य तपासणी आणि तीन दिवसांचे औषध रुग्णांना मिळे. दोन वर्ष ही सेवा सुरू होती. मात्र, कोरोना काळात हे दवाखाने डॉक्टरच उपलब्ध नसल्याने बंद करावे लागले. मुंबईमध्ये कोणत्याही आजारासाठी रक्त तपासणी करणे म्हणजे एक मोठे कामच. त्यातही खूप खर्चिक. महानगरपालिकेच्या दवाखान्यात, तर यासाठी तारखांवर तारखा मिळतात. वस्तीपातळीवरील ही समस्या प्रमोद नेहमीच पाहत असत. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मग त्यांनी ‘श्री सेवा फाऊंडेशन’च्या माध्यमातून २० रुपयात रक्त तपासणी सुरू केली. मुंबईभर विविध मंडळे, संस्था यांच्यासोबत संपर्क करत ही रक्त तपासणी शिबीर आयोजित केली. तसेच, ‘उद्योग निर्माण सेवा संघा’च्या माध्यमातून विविध शहरातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे, त्यांच्या कलागुणांना, उद्योगांना वाव निर्माण करण्यासाठी प्रदर्शनी भरवणे हे उपक्रम सुरूच आहेत.
 
 
 
 
‘कोरोना योद्धा कर्मचारी परिषदे’च्या माध्यमातून प्रमोद यांनी मोठा लढा उभारला. कोरोना काळात कोरोनाच्या वाढत्या कहरापुढे कर्मचारी संख्याबळ कमी पडू लागले. अशावेळी महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीवर डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य सेवक, सेविका आणि विविध कार्यप्रणालीसाठी नोकरभरती केली गेली. सुरुवातीला तीन महिन्यांसाठी असलेल्या या भरतीचा कालावधी वाढतच गेला. वर्षभरानंतर कोरोना निवळला. त्यानंतर या कर्मचार्‍यांना प्रशासनाने अचानक सेवामुक्त केले. खरे तर ज्यावेळी सगळ्यांनी लोकसेवेकडे पाठ फिरवली होती, त्यावेळी हे कर्मचारी जिवाची पर्वा न करता लोकसेवा करत होते. कोरोनाने सिद्ध केले होते की, आपद्स्थितीत परिस्थिती हाताळण्याइतके मनुष्यबळ प्रशासनाकडे नाही. त्यासाठी मनुष्यबळ वाढवणे गरजेचेच आहे. या काळात अनेक देशविघातक शक्ती या सेवेतून मुक्त केलेल्या लोकांना भेटून भडकवत असत. ते सांगत, “या समाजात देशात तुम्हाला काही किंमतच नाही. आमच्यासोबत या, तुम्हाला नोकरी, न्याय मिळवून देऊ.” त्या समाजविघातक संघटनांना या कर्मचार्‍यांना फितवायचे होते. कोरोना काळात अशाप्रकारे मोठा कामगारवर्ग जर अशा देशविघातक जाळ्यात फसला तर? या विचारांनी मग प्रमोद यांनी या कर्मचार्‍यांच्या हक्कासाठी ‘कोरोना योद्धा कर्मचारी परिषद’ स्थापन केली. कर्मचार्‍यांच्या हक्कासाठी आंदोलन केले. आंदोलन करून गर्दी जमवली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पण, तरीही आपल्या सेवाकार्यात प्रमोद तसूभरही मागे हटले नाहीत. प्रमोद यांच्या सेवाकार्याची आणि लढवय्या वृत्तीची प्रेरणा काय होती? तर प्रमोद यांचे म्हणणे रा. स्व. संघाच्या शाखेने दिलेले संस्कार.
 
मुळच्या पोलादपूर परिसरातील काटे कुटुंब. कामानिमित्त धोंडीराम वयाच्या १२व्या वर्षी मुंबईत आलेले. एका खासगी कंपनीत कामाला लागले. त्यांची पत्नी सुनिता ही गृहिणी. उभयतांना चार अपत्ये, त्यापैकी एक प्रमोद. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची. अशा परिस्थितीत इयत्ता नववीमध्ये जाईपर्यंत प्रमोद यांच्या आयुष्यात फारसे घडलेच नाही. मात्र, ते नववीला नापास झाले आणि आयुष्य पालटले. नववीला अभ्यासक्रमात नव्याने ‘स्वदेशी’वर पाठ समाविष्ट करण्यात आला होता. त्याचवेळी प्रमोद यांचा संबंध संघ शाखेशी आला. स्वातंत्र्य सेनानी बाबु गेनू यांचे चरित्र वाचनात आले आणि विचारांमध्ये क्षणार्धात परिवर्तन झाले. या काळात संघाचे शाहजी, राजेंद्र यादव, राजेश तिवारी, योगेंद्र अग्रवाल, बाबुजी आणि अभय जगताप यांचे मार्गदर्शन मिळत होते. त्यातून आपल्याला देशासाठी, समाजासाठी काय करायला पाहिजे ही दिशा प्रमोद यांना मिळत गेली. पुढे व्यवसायात अनंत चढउतार आले. उद्योगाची प्रदर्शनी करताना, तसेच बांधकाम क्षेत्रात काम करताना अनेकवेळा तोटा झाला. अगदी ग्राहकांचे पैसे परत द्यायचीही नामुष्की आली. पण, प्रमोद यांनी हार मानली नाही. कारण, आपण जे काही करतो ते स्वच्छ मनाने आणि लोकसेवेसाठी हा त्यांचा मनोदय पक्का होता. समाजसंघटन करताना लोकसेवेचा मंत्र उपयोगात आणायला हवा, असे मानणारे प्रमोद काटे. शून्यातून विविध संस्था उभे करून आज त्यांनी समाजात स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. प्रमोद काटेंसारखे तरुण समाजाची संपत्ती आहेत हेच खरे...
 
 
 
Powered By Sangraha 9.0