ठाणे: ठाण्यातील ऐतिहासिक वारसा असलेली कन्याशाळा बंद करण्याचा डाव जिल्हा परिषदेकडून केला जात आहे. ब्रिटिशांनी ठाण्यात मुलींसाठी सुरु केलेली ही पहिली कन्याशाळा आहे. ही शाळा बंद करून बी. जे. हायस्कूल मध्ये तिचे विळणीकरण करण्याचा घाट जिल्हा परिषदेकडून घातला जात आहे. शाळेतील विद्यार्थिनींची संख्या कमी झाल्याने हा निर्णय घेतला असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले असले तरी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शाळेच्या भूखंडाच्या लोभाने हे सर्व चालले असल्याचा संशय व्यक्त होतो आहे.
ऐतिहासिक वारसा असलेली ही शाळा बंद करणे कठीण गेले असते म्हणून कमी पटसंख्येचे कारण पुढे करून ही शाळा बंद केली जात असल्याचा आरोप शिक्षण क्षेत्रातून होतो आहे. जीर्ण झालेली बी. जे. हायस्कूलची इमारत जिल्हा परिषदेने तब्बल सव्वाचार कोटी रुपये खर्च करून बांधून काढली आणि आता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. मग तश्याच प्रकारे या कन्याशाळेचे पुनरुज्जीवन का करता येऊ नये? असा सवाल ठाण्यातील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ करत आहेत.