पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यासोबत चर्चा

संघर्षात भारताची भूमिका ठरतेय महत्वाची

    07-Mar-2022
Total Views |
mm


चर्चेद्वारे मार्ग काढण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही देशांमध्ये थेट चर्चा व्हावी, असे मत व्यक्त केले.
 
 
रशिया – युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या सातत्याने संपर्कात आहे. यावेळी दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवावा, याविषयी पंतप्रधान आग्रही आहेत.
 
 
पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे सुमारे ५० मिनिटे चर्चा केली. यावेळी त्यांनी युक्रेनमधील सद्यस्थितीवर चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदी यांना युक्रेन आणि रशियामधील वाटाघाटी आणि चर्चेविषयी माहिती दिली. वाटाघाटीविषयी समाधान व्यक्त करून पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्याशी थेट चर्चा करावी, असे आवाहन केले. त्याचप्रमाणे सुमीसह युक्रेनच्या काही भागांमध्ये युद्धबंदी आणि ह्युमन कॉरिडॉर उपलब्ध करून देण्याच्या रशियाचे निर्णयाचे कौतुक केले.
 
 
पंतप्रधान मोदी यांनी सुमीमधून भारतीय नागरिकांना लवकरात लवकर सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या महत्त्वावर भर दिला. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनीदेखील पंतप्रधान मोदींना भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
 
 
त्यापूर्वी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंन्स्की यांच्याशी संवाद साधला. युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षमय परिस्थितीविषयी आणि वाटाघाटींविषयी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी तपशीलवार माहिती पंतप्रधानांशी बोलताना दिली. सध्या सुरू असलेला संघर्ष आणि त्याचा मानवतावादावर झालेला परिणाम याविषयी पंतप्रधान मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. हिंसाचार त्वरित थांबवावा, याचा पुनरूच्चार करून पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की, शांततापूर्ण मार्गाने निराकरण आणि, दोन्ही बाजूंमध्ये थेट संवाद याला भारताचा नेहमीच पाठिंबा असेल.
 
 
युक्रेनमधून २० हजारांपेक्षा जास्त भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मदत केल्याबद्दल पंतप्रधानांनी युक्रेनच्या अधिका-यांचे आभार मानले. अद्याप काही भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत, त्यांच्या सुरक्षेविषयी गंभीर चिंता व्यक्त करून त्यांना तेथून तातडीने सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या गरजेवर पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना भर दिला.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.