"कळवा-मुंब्र्यातील अनधिकृत बांधकामे मी येण्याआधीची"

07 Mar 2022 19:16:35

Jitendra Awhad1
 
 
ठाणे : "कळवा, मुंब्र्यातली अनधिकृत बांधकामे आपण सत्तेत येण्यापूर्वी झालीत.", अशी टीका राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचा नामोल्लेख टाळून केली. कळवा येथील दलदलीच्या मोकळ्या भुखंडावर उभारण्यात आलेल्या स्व. मुकूंद केणी क्रीडा संकुलाचे लोकार्पण रविवारी जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. एरव्ही मोकळी जागा दिसल्यास ती बळकावणार्‍यांनी एवढा मोठा भुखंड मोकळा सोडला कसा? अशी टिप्पणी करीत कळवा, विटावा, खारेगाव आणि मुंब्य्रात अनधिकृत बांधकामे फोफावल्याची कबुलीही त्यांनी दिली.
 
 
 
कळवा येथे पडीक जागेत भव्यदिव्य असे स्व. मुकूंद केणी क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. ठाणे महापालिकेतील कळव्याचे माजी नगरसेवक मुकुंद केणी यांचे कोरोनाने निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रमिलाताई केणी व सुपुत्र मंदार केणी यांनी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून वडिलांच्या कार्याच्या स्मृती जागवणारे अद्ययावत क्रीडासंकूल उभारले. या क्रीडा संकुलामध्ये फुटबॉल, क्रिकेट, कब्बडी यांचे टर्फ, जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळणी, ओपन जीम अशा सर्व सुविधा आहेत. 
 
 
 
"हा भूखंड सर्वात आधी आपण पाहिला होता. एकीकडे असे मोकळे भूखंड शिल्लक रहात नसतानाही स्व. मुकूंद केणी यांनी ह्या भूखंडावर क्रीडा संकुल उभारण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. आज ते आपल्यात नसले, तरी त्यांनी दाखविलेले हे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद होत आहे.", असे जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले. त्याचबरोबर आपण आमदार झाल्यानंतर कळवा-मुंब्रा बदलत असल्याचा उल्लेख करून अतिक्रमणांना आधीचे राजकारणी जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले. 'मोकळी जागा दिसली की ठोक!', अशी टिप्पणीही त्यांनी कार्यकेरमादरम्यान केली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0