गोरेगाववासीयांचा गळा पाण्याविना आजही कोरडाच!

06 Mar 2022 17:58:58

Goregaon
 
 
 
मुंबई (ओंकार देशमुख) : गोरेगावच्या प्रभाग क्रमांक ४७ मधील मुराचा पाडा परिसरातील नागरिक मागील कित्येक वर्षांपासून पाण्यासाठी दाहीदिशा भटकत असल्याचे विदारक चित्र आहे. “आमच्या भागात कमी दाबाने आणि खंडितपणे होणार्‍या पाणीपुरवठ्याची तक्रार आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे केली. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही,” असे या नागरिकांचे म्हणणे आहे. “काही वर्षांपूर्वी या भागात नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी महापालिका प्रशासनाने आमच्याकडून काही हजार रुपये शुल्काच्या माध्यमातून घेतले होते. मात्र, आज इतकी वर्षे ओलांडली तरी आमच्या पाण्याचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्हा गोरेगाववासीयांचा गळा पाण्याविना कोरडाच राहिला आहे,” अशी हतबलता स्थानिक रहिवाशांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडे मांडली. आपल्या प्रभागातील विविध प्रश्नांवर स्थानिकांनी नुकताच दै. ‘मुंबई तरुण भारत’शी विशेष संवाद साधला.
 
 
 
प्रभागात समस्यांची रांगच रांग!
आमच्या समस्यांत एक ना अनेक अशा विविध समस्या आहेत. रस्ते, पाणी, नालेसफाई आणि अशा अनेक पायाभूत गोष्टींची कमतरता या प्रभागात आहे. मुख्यत्वे पाण्याच्या प्रश्नामुळे आम्हाला मोठा त्रास भोगावा लागतो. याबाबत आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केलेला आहे, मात्र त्याला अद्याप कुठलेही यश आलेले नाही. स्थानिक नगरसेवक आणि आमदारांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी भूमिका घेणे आवश्यक आहे. मात्र, नगरसेवक किंवा स्थानिक आमदार रवींद्र वायकर यांच्यापैकी कोणीही हा प्रश्न सोडविण्यात स्वारस्य दाखवलेले नाही.
- विजय राणे, स्थानिक रहिवासी
 
 
 
२० वर्षे झाली, पण पाणी आलेच नाही!
महापालिकेतर्फे आमच्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे प्रयत्न करण्यात आले, हे खरे आहे. मात्र, आमचा पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. आजही या भागातील कित्येक लोक १५० ते २०० रुपये मोजून पाणी विकत घेतात, ही वस्तुस्थिती आहे. काही वेळा तर पाणी खरेदीसाठी आम्हाला आधीच पैसे द्यावे लागतात. मागील २० ते ३० वर्षांपासून या प्रभागात काहीही सुधारणा झालेली नसून प्रभागातील समस्या आजही ‘जैसे थे’ आहेत. स्थानिक शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांच्याकडेदेखील हा प्रश्न आम्ही घेऊन गेलो, तेव्हा त्यांनीही आश्वासनाशिवाय काही दिलेले नाही. आम्ही २० वर्षे झाली संघर्ष करतोय मात्र आजही आमच्याकडे पाणी आले नाही, ही आमची शोकांतिका आहे.
- झरीना शेख, स्थानिक रहिवासी
 
 
 
प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील!
पाण्याच्या प्रश्नावर सातत्याने मी महापालिका प्रशासन आणि प्रभाग कार्यालयाशी संपर्कात असून प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. स्वाभाविकपणे प्रभागातील प्रत्येक ठिकाणी पोहोचणे शक्य नसते तरीही समस्या सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत. मुराचा पाडा परिसरातील जो भाग उंचीवर आहे, त्या ठिकाणी पाणी पोहोचण्यासाठी अडचणी आहेत हे मान्य आहे आणि त्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करून पाणी पोहोचण्याची सोय करण्याचेही आमचे प्रयत्न आहेत. वाढती लोकसंख्या, उपलब्ध सोयीसुविधा आणि त्याप्रमाणात होणारा त्यांचा पुरवठा यातील असमतोलामुळे हे प्रश्न निर्माण होत असून त्यांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- रेखा रामवंशी, स्थानिक शिवसेना नगरसेविका, प्रभाग पी-५३
 
 
 
Powered By Sangraha 9.0