पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी (दि. ६ मार्च) मेट्रो आणि इतर विकासकामांच्या उद्घाटनासाठी पुणे दौऱ्यावर होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून यावेळी तीव्र आंदोलनही करण्यात आले. मात्र शिवसेनेकडून यावर कोणतीही प्रखर भूमिका घेण्यात आली नाही. याउलट विशेष म्हणजे शिवसेनेच्या सामना वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यासंदर्भात असलेली भाजपची फूलपेज जाहिरात छापून आली. त्यामुळे पंतप्रधानांवर टीकेचे बाण सोडणाऱ्या सामनात पंतप्रधानांची मोठी जाहिरात झळकल्याने चर्चांना उधाण आले आहे.
या जाहिरातीवरून भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 'गंदा है पर धंदा है' असं म्हणत त्यांनी ट्वीट केले आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात जाहिरातीबाबत विचारले असता त्यांनी, 'कुणाच्याही जाहिराती वृत्तपत्रात येऊ शकतात', असे सांगितले.