बोरिवलीत कांदळवनांवर भराव टाकणाऱ्यांवर धडक कारवाई

30 Mar 2022 11:57:47
mangrove



मुंबई - उपनगरातील कांदळवनांवर भराव टाकणाऱ्यांवर वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. बोरिवली येथील धारिवली गावातील कांदळवनावर भराव टाकणाऱ्या डंपरला ताब्यात घेण्यात आले असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.


राज्यातील कांदळवन क्षेत्राला राखीव वनक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. म्हणजेच कांदळवनाच्या झाडांची तोड करणे, त्यांना जाळणे, त्यावर मातीचा राडारोडा टाकणे कायद्याने गुुन्हा आहे. अशा परिस्थितीत काही समाजकंटकांकडून छुप्या पद्धतीने कांदळवने तोडली जातात किंवा त्यावर राडारोडा टाकला जातो. मुंबईसारख्या शहरी भागात असणाऱ्या कांदळवनांमध्ये हा प्रकार सर्रास केला जातो. अशाच प्रकारे बोरिवलीतील मौज एरंगळ येथील धारिवली गावातील कांदळवनांवर भराव टाकणाऱ्या काही व्यक्तींना वन विभागाने ताब्यात घेतले आहे. २६ मार्च रोजी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.


२५ जानेवारी रोजी मध्यरात्री गस्ती दरम्यान ३.१५ वाजता काही डंपर आम्हाला धारिवली गावा लगत असणाऱ्या कांदळवनाच्या राखीव क्षेत्रात मातीचा भरणा करताना दिसले. त्याठिकाणी धाड टाकून आम्ही दोन डंपर पकडल्याची माहिती कांदळवन कक्षाचे पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी शरण देशपांडे यांनी दिली. या कारवाईमधून अन्सारी रफिक, रमेश मौर्या , राहुल जैसवाल, अजय खाडे आणि मोजेस बिंग या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. ही कारवाई विभागीय वनअधिकारी आदर्श रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल शरण देशपांडे, वनरक्षक संतोष जाधव, अजित परब, वनपाल हर्षल साठे, महादेव शिगांडे आणि वाहनचालक राकेश धवाळी यांनी केली.

Powered By Sangraha 9.0