‘ठाणे क्रिकेट’चे द्रोणाचार्य

03 Mar 2022 15:00:15

Shashikant Naik
 
शिक्षण जेमतेम सहावीपर्यंत, तरीही तब्बल ५२ वर्षे क्रिकेटचे प्रशिक्षक म्हणून नावलौकिक मिळवणार्या ६८ वर्षीय शशिकांत सिद्धू नाईक या ठाण्यातील क्रिकेटच्या द्रोणाचार्याविषयी...
शशिकांत नाईक यांचा जन्म दि. १५ जुलै, १९५४ रोजी ठाण्यात मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आई-वडील, सात भाऊ, एक बहीण असे त्यांचे मोठे कुटुंब. ठाण्यातील सेंट्रल मैदानाजवळील छोट्याशा हॉटेलवरच संपूर्ण कुटुंबाचे पोट असल्याने शशिकांत अवघे सहा वर्षांचे असताना वडिलांनी त्यांना कर्नाटकातील कारवार, कुंठा तालुक्यातील एका खेडेगावात शिक्षणासाठी पाठवले. सहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर उन्हाळी सुट्टीत आई-वडिलांना भेटण्यासाठी शशिकांत ठाण्यात आले. सुट्टीचा काळ सरला तसा पुन्हा कर्नाटकला परतताना शशिकांत यांनी, वडिलांकडे, शाळेचे कपडे ठेवण्यासाठी एक छोटी पत्र्याची पेटी, दोन वह्या आणि पेन-पेन्सिल मागितली. मात्र, संसाराचा गाडा कसाबसा हाकणार्या वडिलांनी, ‘तू शाळा सोड आणि हॉटेलमध्ये कपबशा उचलायला राहा,’ असे ठणकावले. वडिलांचा आदेश शिरसावंद्य मानून शशिकांत यांनी हॉटेलमध्ये कपबशा उचलण्यास सुरुवात केली.
हॉटेलच्या शेजारी असलेल्या ‘स्पोर्टिंग क्लब’मध्ये क्लबचे मेंबर्स तसेच बाजूला सेंट्रल मैदानात खेळायला येणार्यांना शशिकांत चहा देऊ लागले. खेळ आणि मैदानाशी एवढाच त्यांचा परिचय. इथूनच त्यांचा जीवनसंघर्ष सुरू झाला. शशिकांत सांगतात, “पॅव्हेलियन आणि स्पोर्टिंग क्लब’मध्ये चहा देता देता मी अनेकदा मैदानावर खेळण्यासाठी आलेल्या विविध कंपन्यांच्या संघातील खेळाडूंना पाहत असे. त्यांना बघून माझ्यादेखील मनात क्रिकेटची आवड निर्माण झाली. चेंडू, बॅट घेण्याची ऐपत नसल्याने खेळाडूंचा सराव संपल्यानंतर मैदानावरील तुटकी बॅट आणि चेंडू मागून घेत असे. या साहाय्याने दि. ३ नोव्हेंबर, १९६९ साली मैदानाच्या कोपर्यातच क्रिकेटच्या कोचिंगचा श्रीगणेशा केला.” सुरुवातीला टाईमपाससाठी येणार्या चार-पाच जणांना घेऊन सुरू केलेल्या या मुलांमध्ये भर पडू लागली. दुसर्या वर्षी म्हणजेच १९७० साली त्यांच्याकडे १४ ते १५ मुलं क्रिकेट शिकण्यासाठी येऊ लागली. १९७१ साली हीच संख्या २२-२३ झाल्याने शशिकांत यांच्याकडे स्वतःचा क्रिकेट संघ तयार झाला होता. त्याचदरम्यान त्यांनी, ‘मॉर्निंग क्रिकेट क्लब’ या नावाने एक क्लब सुरू केला. काही वर्षांनी शालेय क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या, तेव्हा ते सेंट जॉन स्कूलमधील विद्यार्थ्यांना क्रिकेटचे प्रशिक्षण देत होते. त्यावेळेस आ. संजय केळकर यांनी सुरू केलेल्या ‘एन. टी. केळकर टुर्नामेंट’साठी नाईक यांच्या प्रशिक्षणाखाली सेंट जॉन स्कूलने या स्पर्धेत भाग घेत २४ संघामधून प्रथम क्रमांक पटकावला.
त्यावेळेस सेंट जॉनमध्ये शिकणारा नंतर भारतीय संघाचा कसोटीपटू बनलेला अभिजित काळे ११ वर्षांचा होता. त्याने ‘एन. टी. केळकर टुर्नामेंट’मध्ये चारपैकी तीन सामन्यांत सलामीला येऊन ४५ ओवर ‘नॉटआऊट’ राहत स्वतःची वेगळी छाप पाडली. अभिजितची प्रगती व्हावी, तो उच्चस्तरावर खेळावा यासाठी शशिकांत यांनी त्यावेळी चार महिन्यांमध्ये भर पावसात त्याला प्रशिक्षण देऊन मुंबईतील सिलेक्शनसाठी तयार केले. त्यावेळेस मुंबईतील मोठ्या टुर्नामेंटमध्ये जे खेळाडू खेळले, त्यांनाच मुंबईच्या पंधरा वर्षांखालील क्रिकेट संघामध्ये खेळता येईल, अशी अट होती. शशिकांत यांनी मुंबईतील टुर्नामेंट खेळण्यासाठी ठाण्यातील खेळाडूंना संधी द्या, अशी मागणी केली. तेव्हा, ‘मुंबई क्रिकेट क्लब’च्या निवड समितीमधील विलास गोडबोले आणि सदुकाका सातघरे यांनी मोलाची मदत केल्याने अभिजित काळे यांच्या रुपाने ठाण्याच्या एकमेव खेळाडूची निवड होऊ शकली. अर्थात, याचे श्रेय शशिकांत यांचेच! अशाप्रकारे १९६९ पासून ठाण्यात २२ हजारांहून अधिक क्रिकेटपटूंचे प्रशिक्षक, तर सुमारे ८,५०० विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यासह अनेकांच्या नोकरीची तदातही त्यांनी मिटवली. ठाण्यातील अभिजित काळे, सुलक्षण कुलकर्णी, प्रवीण तांबे या प्रथितयश क्रिकेटपटूंचे ते प्रशिक्षक असून वार्धक्यातही उन्हातान्हात मैदानावर त्यांचे कोचिंग सुरूच आहे. ठाणे महापालिकेच्या क्रिकेट संघाचे १९८३ ते २००० तब्बल १७ वर्षे त्यांनी मोफत प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.
भारतात प्रथमच १९८६ मध्ये ठाण्याच्या सेंट्रल मैदानात ’नाईट क्रिकेट’ची संकल्पना रुजवण्याचा शशिकांत यांनी प्रयत्न केला. त्यांच्या या कर्तृत्वाचा सन्मान सुरूच असतो. ठाणे महापालिकेतर्फे २०१४ साली ‘ठाणे गुणिजन’, २०१८ साली ‘ठाणे गौरव’ आणि २०२२ मध्ये ‘ठाणे भूषण’ अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय १९८० साली तत्कालीन पंतप्रधान एच. के. देवेगौडा, १९९२ साली शरद पवार यांच्या हस्ते आणि नुकतेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘समाजभूषण’ पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. “भविष्यात करायचं काहीच शिल्लक नाही. न खेळताही क्रिकेट या खेळाने मला भरभरून दिले. भले अर्थप्राप्ती झाली नसेल. पण, याच ठाणे शहराचा मी ‘भूषण’ ठरलो. हेही नसे थोडके,” अशी कृतज्ञता व्यक्त करताना, खेळण्यासाठी शहरात मोकळी मैदानेही टिकणे गरजेचे असल्याचे शशिकांत आवर्जून नमूद करतात.
नवीन पिढीने अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रालाही वाहून घ्यायला हवे. तसेच, खचून न जाता दैनंदिन सरावात सातत्य राखणे गरजेचे आहे, तरच आपण यशाची पताका फडकवू शकतो, असा संदेश युवा पिढीला देणार्या शशिकांत नाईक यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या आरोग्यदायी शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0