हिंदू देवी-देवतांचा अवमान करणार्‍यांवर कारवाई का नाही?

29 Mar 2022 15:51:56
 

dehli  
 
 
नवी दिल्ली: “हिंदू देवी-देवतांबद्दल निंदनीय आणि आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणार्‍या खात्यांवर कारवाई का केली जात नाही,” असा सवाल दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी ट्विटरला विचारला.
 
दिल्ली उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश विपीन सांघी आणि न्यायमूर्ती नवीन चावला यांच्या खंडपीठासमोर सदर याचिकेवर सुनावणी करण्यात आली. यावेळी न्यायालयाने म्हटले की, “जर तुम्हाला एखादे प्रकरण संवेदनशील वाटत असेल, तर तुम्ही त्याविरोधात कारवाई करतात, आणि एखादे प्रकरण संवेदनशील वाटत नसेल, तर कारवाई केली जात नाही. हे अतिशय संतापजनक असून ट्विटरला विशिष्ट समाजाविषयी संवेदनशीलता वाटत नसल्याचे यातून दिसून येते.
असाच प्रकार अन्य धर्मांविषयी घडला असता तर ट्विटरने अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली असती का,” असा सवालही उच्च न्यायालयाने विचारला.यावेळी न्यायालयाने ट्विटरला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर खाते कायमचे बंद करण्याबाबतचे धोरण स्पष्ट करणारे उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारलाही प्रतिज्ञापत्रासह ट्विटर खाते बंद करण्याविषयीची नियमावली सादर करण्यास सांगितले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0