आनंदवनभुवनी।

29 Mar 2022 13:02:08

happy
 
डेन्मार्क, फिनलंड, नॉर्वे, स्वीडन आईसलंड यांना ‘नॉर्डिक देश’, म्हणजे युरोप आणि अटलांटाच्या उत्तरेकडे येणारे देश म्हणून ओळखले जाते. महामारीच्या काळातही ‘कोविड’ विषाणूने या देशातही थैमान घातले असले, तरी फिनलंड व डेन्मार्कसारख्या देशात एकमेकांना सामाजिक आणि भावनिक आधार देण्याची जनतेची ‘फिलॉसॉफी’ असल्याने लोक जगातील इतर लोकांइतके त्रस्त झाले नाहीत. येथील सामाजिक व्यवस्था सर्वसामान्यांसाठी आधार देणारी आणि अवघड परिस्थिती सावरणारी आहे.
 
 
आनंदाचा जागतिक अहवाल हा १४६ देशांत राहणार्‍या लोकांच्या समग्र आनंदाची पातळी किती आहे, याबद्दल सांगतो. जे देश जास्त आनंदी आहे, त्या देशातील लोक प्रसन्न जीवन जगत असतात, असा त्यांचा दावा. हा अहवाल काही महत्त्वाच्या घटकांवर अवलंबून असतो. या लोकांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात कौटुंबिक आयुष्य, मैत्री, भावनिक आयुष्य, दीर्घायुष्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्याची अनुभूती, अर्थव्यवस्था (जीडीपी) इ. घटकांबद्दल माहिती घेतली जाते. युएन सर्व साधारणपणे ‘गॅलॉप वर्ल्ड पोल’ यांचा आपल्या आयुष्याचे या देशांत राहणारे लोक कशा पद्धतीने मूल्यमापन करतात, या अहवालाचे विश्लेषण करुन त्या देशाचा आनंदाचा गुणांक ठरवतात. फिनलंड, डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे यांसारख्या देशांचा या यादीत पहिल्या दहामध्ये नंबर असतो. फिनलंड या देशात दीर्घकाळ चालणारी व भयानक गोठवणारी थंडी असते. काही अर्थशास्त्रज्ञांना असे वाटते की, जे लोक अशी भयानक आव्हाने एकत्रितपणे पेलतात जसे की, फिनलंडमध्ये असणारा बोचरा हिवाळा ते खूप एकमेकांजवळ येतात आणि घट्ट नाती निर्माण करत आनंदाला जोपासतात. शिवाय त्यांची अर्थव्यवस्था मजबूत आहे. त्यांचे सामाजिक कार्यक्रम नागरिकांसाठी उपयुक्त आहेत. उच्चशिक्षण त्यांच्याकडे मोफत किंवा स्वस्तात मिळते. फिनीश लोक तशी त्यांच्या जीवनमानाबद्दल एकंदरीत समाधानी आहेत. त्यांच्या अपेक्षाही कमी आहेत. त्यामुळे ते जगातील सर्वात आनंदी लोक आहेत. डेन्मार्क हा विकसित देश आहे. त्यांचे सामाजिक राहणीमान, अर्थव्यवस्था, शैक्षणिक आणि आरोग्याचे राष्ट्रीय कार्यक्रम उच्च पातळीचे आहेत. डेन्मार्कचे लोक आपल्या कुटुंबाबरोबर आणि मित्रमैत्रिणींबरोबर उत्तम दर्जाचा वेळ घालविणे अधिक पसंत करतात. यामुळे त्यांची तणावाची पातळी खूप कमी आहे. त्याचे व्यक्तिगत जीवन आरोग्यपूर्ण आणि समाधानी आहे.
 
डेन्मार्क, फिनलंड, नॉर्वे, स्वीडन आईसलंड यांना ‘नॉर्डिक देश’, म्हणजे युरोप आणि अटलांटाच्या उत्तरेकडे येणारे हे देश म्हणूून ओळखले जाते. महामारीच्या काळातही ‘कोविड’ विषाणूने या देशातही थैमान घातले असले, तरी फिनलंड व डेन्मार्कसारख्या देशात एकमेकांना सामाजिक आणि भावनिक आधार देण्याची जनतेची ‘फिलॉसॉफी’ असल्याने लोक जगातील इतर लोकांइतके त्रस्त झाले नाहीत. येथील सामाजिक व्यवस्था सर्वसामान्यांसाठी आधार देणारी आणि अवघड परिस्थिती सावरणारी आहे. खरेतर संकटकाळात येथील माणसे एकमेकांना आपत्कालीन पातळीवरचा आधार देतात व प्रेम देतात. परोपकाराची भावना या देशांमध्ये खोलवर रुजलेली आहे. येथे सामाजिक विश्वासाची भावना भक्कम आहे. अप्पलपोटेपणाची संस्कृती येते दिसत नाही. संकटकाळात मिळून मिसळून वागायचे जे आहे, जेवढे आहे ते समाजात वाटून-विभागून घ्यायचे, हे या लोकांचे तत्त्वज्ञान आहे. त्यांना आपापले भल्यासाठीचे महत्त्वाचे निर्णय स्वतंत्रपणे घेता येतात. त्या स्वातंत्र्यात या लोकांची परानुभूतीही प्रबळ असते. एकमेकांच्या भल्यासाठी या लोकांचा आपल्या राष्ट्रीय व्यवस्थापनेवर नितांत विश्वास दिसून येतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, या देशांमध्ये कुठल्याही पातळीवरचा भ्रष्टाचार अत्यंत कमी प्रमाणात किंवा नसल्यातच जमा आहे. संकटकाळी अन्नधान्य, भाजीपाला गायब करून लोकांची लूट करून पैसा जमवायची वृत्ती या देशांमध्ये व्यापारी लोकांत दिसत नाही. या देशांतील उद्योजक आणि उद्योगजगत दानधर्मात विश्वास ठेवतात. महामारीच्या काळात या देशांतील अनेक सामाजिक उपक्रम सामान्य नागरिकांसाठी राबवण्यात येतील. उद्योगजगताने केलेल्या दानधर्माचा भाग प्रशंसा करण्यासारखा होता. बंधुभाव आणि औदार्य हे या देशांमधील नागरिकांचे प्रसन्नता वाढवणारे महत्त्वाचे घटक आहेत. यातील एक आनंद देणारा आवश्यक घटक म्हणजे लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास. देशात आपल्याला न्याय मिळतो, ही आनंदाची गोष्ट आहे.
 
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपल्या व्यवस्थापनेवर आणि समाजावर विश्वास असणे हे सर्वसामान्य नागरिकांच्या आनंदासाठी आवश्यक गोष्टी आहेत. या गोष्टी महामारीच्या काळातही अनेक देशांना समाधान देऊन गेल्या आहेत. खरेतर या देशांमध्ये लोकांनी आपले तन-मन-धन आपल्या देशातल्या बांधवांसाठी अर्पून, कुठल्याही तक्रारी न करता ‘कोविड-१९’ला दूर ठेवण्यासाठी जी बंधने पाळायला लागतील, ती सर्वांच्याच भल्यासाठी आहेत हे जाणून, ती स्वत:हून पाळली. हा जो आपल्या देशावरचा विश्वास, आपल्या लोकांवरचे प्रेम आणि उच्च पातळीवरची सामाजिक बंधुत्वाची भावना आहे, त्यामुळे या देशांत ‘कोविड’ विषाणूमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण रोखता आले. इतर देशात जसे की, अमेरिका, इंग्लंड, कॅनडा या देशात पैशांची श्रीमंती भरपूर आहे. शास्त्रीय पातळीवरचा विकासही आधुनिक पातळीवर आहे, पण हे देश केवळ यामुळे पहिल्या दहामध्ये पोहोचू शकले नाहीत. याचाच सरळ साधा अर्थ एकच की, जो आपण सगळे अनेक वर्षानुवर्षे तत्त्वज्ञानात ऐकत आलो आहोत आणि तो म्हणजे, ‘पैशाने आनंद विकत घेता येत नाही.’
 
 
आपण जर एखाद्याला विचारलं की, “आपली एखादी महत्त्वाची गोष्ट हरवली, तर ती आपल्याला मिळेल का?” एखाद्या नागरिकाने अगदी आत्मविश्वासाने सांगितले की, “आमच्या देशातील माणसांवर व पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. ती वस्तू कुणाला सापडली, तर ते नक्की ती पोलिसांकडे देतील आणि आमच्या तक्रारीनुसार पोलीस ती आमच्याकडे देतील.” आपण दुसरा प्रश्न एखाद्या नागरिकाला विचारला की, “तुम्हाला तुमच्या गुणांनुसार वा शैक्षणिक योग्यतेनुसार ‘प्रमोशन’ मिळेल का?” तेव्हा नक्कीच “आम्हाला कुणा राजकीय नेत्याच्या आशीर्वादाशिवाय किंवा अधिकार्‍यांचे लांगूलचालन न करता किंवा त्यांना चिरीमिरी न देता नक्कीच ‘प्रमोशन’ मिळेल,” असे सांगता येईल तेव्हा आपणसुद्धा आनंदी राहू शकू. विश्वबंधुत्वाची भावना आपल्या संस्कृतीतच आहे. तिला आपण कृतीत आणू शकू, तेव्हा आनंद आपल्यापासून लांब राहण्याचे धाडस का करेल? समर्थ रामदासांच्या भाषेत सांगायचे झाले तर...
 
येथुन वाढला धर्मु।
रमाधर्म समागमे।
संतोष मांडला मोठा।
आनंदवनभुवनी॥
 

- डॉ. शुभांगी पारकर
 
Powered By Sangraha 9.0