समाजाचे वैभव : सुनीता देवधर

29 Mar 2022 12:39:17

sunita deodhar
 
 
कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न बाळगता समाजाचे, या मातीचे ऋण फेडण्यासाठी सातत्यपूर्ण कार्य करणार्‍या मुलुंडच्या सुनीता देवधर यांच्या कार्यविस्ताराचा घेतलेला मागोवा...
आज पूर्व उपनगरातच नव्हे, तर मुंबईमध्येही मुलुंड या उपनगराला महत्त्वपूर्ण स्थान आहे. सुशिक्षित, सुसंस्कृत म्हणून या उपनगराची एक खास ओळख. मुलुंडच्या सांस्कृतिक आणि सामाजिक विकासाचा इतिहास लिहिताना सुनीता मधुकर देवधर यांचे नाव ओघानेच येते.
 
१९६० ते आता २०२२ साल, या प्रदीर्घ कालखंडात सुनीता देवधर यांनी मुलुंड आणि परिसरासाठी सामाजिक, सांस्कृतिक कार्याचा सागर उभा केला. मुलुंड आणि परिसरातील प्रतिष्ठित संस्था, सेवा उपक्रम यामध्ये सुनीता देवधर यांची भूमिका महत्त्वाचीआहे. सुनीता देवधर आज वयाच्या ८५व्या वर्षीही तल्लख बुद्धिमता आणि संवेदनशील विचारकृतीच्या धनी आहेत. लक्ष्मी आणि सरस्वती यांची सढळ साथ असलेल्या सुनीता यांनी आपण सुखात आहोत बसं, आपल्याला काय करायची दुनियादारी, असा स्वार्थी विचार केला नाही, तर आपला जन्म हा समाजाच्या उन्नतीसाठी आहे, समाजजागृती आणि सेवा ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे, असे त्यांचे मत आहे. मुळात मुलुंडमध्ये ‘मेडिकल डायग्नोस्टिक सेंटर’ ‘इन द मेमरी ऑफ सुनील देवधर’, सुनीता देवधर मुलुंड जिमखाना बॅडमिंटन हॉल, तसेच ‘मैत्री’, ‘महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड’ आणि ‘महाराष्ट्र सेवा संघ, ऐरोली’, ‘दृष्टी सेवा शाळा’ तसेच, ‘इनरव्हिल क्लब ऑफ डिस्ट्रीक’ (यात मुंबईतले ७० इनरव्हिल क्लब समाविष्ट आहेत) या सगळ्या संस्था आणि उपक्रम म्हणजे सुनीता यांच्या अफाट कार्याचे आणि समाजशीलतेचे मूर्तिमंत रूप म्हणता येईल. मुलुंडच्या सुधाताई केळकर यांनी जेव्हा महिलासांठी ‘इनरव्हिल क्लब’सुरू केला, त्यावेळी सुनीता त्यांच्यासोबत होत्या. त्याच काळात साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रमाच्या प्रेमासाठी सुनीता या ‘महाराष्ट्र सेवा संघा’च्या सदस्यही झाल्या.
 
सुनीता यांचे पती मधुकर हे ‘रोटरी क्लब’चे पदाधिकारी होते. तसेच ते उद्योगपतीही होते. त्यांची साथ सुनीता यांना होतीच. सुनीता म्हणतात,“आयुष्यातल्या प्रत्येक छोट्यामोठ्या चढउतारात पती मधुकर यांची भक्कम साथ लाभली, म्हणूनच आयुष्यात काही करताना तसा तणाव आला नाही.” त्यामुळेच सुनीता यांनी आपल्या विविध सेवा-उपक्रम राबविले. त्यावेळी त्या मुलुंड सेवा संघाच्या महिलांच्या ‘मैत्रेयी’ या शाखेच्या अध्यक्षा होत्या. २००० साल होते ते. त्याकाळी ऐरोली नुकतेच नावारूपाला येत होते. तिथे ‘महाराष्ट्र सेवा संघा’ची शाखा यशस्वी करणे, महिलांचेही संघटन करणे ही सोपी गोष्ट नव्हती. पण, सुनीता यांनी हे शिवधनुष्य पेलले. त्यावेळी त्या पुरंदरे शाळेत शिक्षिका होत्या. नोकरी करून, घर कुटुंब सांभाळून, ‘इनरव्हिल क्लब’चे सेवाउपक्रम राबवून त्या ‘महाराष्ट्र सेवा संघा’साठीही कार्य करत. त्या ऐरोलीला जात असत. तिथे संपर्क करून, महिलांशी स्नेह जुळवत शेवटी सुनीता यांनी ऐरोलीत ‘महाराष्ट्र सेवा संघ’ संबंधित ‘मैत्री’ हे महिलांचे संघटन उभे केलेच. पुढे ऐरोली परिसरात महिलांना वाचनाची, साहित्याची विचारांची आणि चिंतन कृतीची गोडी निर्माण व्हावी म्हणून ‘महाराष्ट्र सेवा संघा’च्या ऐरोली शाखेत वाचनालयही निर्माण केले.
 
तसे पाहिले, तर सुनीता यांनी आयुष्यभर स्वत:चे वैयक्तिक प्रश्न बाजूला ठेवले. नव्हे आयुष्यात क्वचित दु:खही आले तरी त्या दुःखातूनसमाजाचेच भले केले. याचे एक उदाहरण देता येईल ते असे- आपले बालक मृत्युमुखी पडणे यापेक्षा एखाद्या मातापित्यांना दुःखदगोष्ट असेल ती कोणती? सुनीता यांचे तीन वर्षांचा मुलगा सुनील देवाघरी गेला. हा मोठा घाला होता. पण, सुनीता आणि त्यांचे तितकेच समाजशील पती मधुकर यांनी बाळाच्या स्मृतिप्रित्यर्थ मुलुंडमध्ये ‘मेडिकल डायग्नोस्टिक सेंटर’ उभे केले. जनतेला वैद्यकीय मदत सुलभ मिळावी यासाठी हा प्रयत्न होता. केवढे हे मनाचे मोठेपण! वैयक्तिक दुःखातूनही समाजाच्या भल्यासाठीच कार्य करण्याचा निश्चय करणारे देवधर कुटुंब त्यातही सुनीता देवधर. सुनीता यांच्या सेवाउपक्रमाचा ठरावीक आयाम नाही. सांस्कृतिक कार्य करताना सुनीता यांनी मुलुंड परिसरातील झोपडपट्टीतील बालक व महिलांच्या सक्षमीकरण आणि आरोग्यासाठीही काम केले. या सर्व सेवाकार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्यातील काही प्रमुख सन्मान- आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘मार्गारेट गोल्डींग अवॉर्ड’, ‘महापौर अवॉर्ड’, गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते ‘द्रोणाचार्य अवॉर्ड’ होत.
 
सेवेचे हे व्रत सुनीता यांना माहेर आणि सासर दोन्हीकडून मिळाले. त्यांचे माहेर पुण्यातले. वडील महादेव गोळे आणि आई विमल गोळे. स्वातंत्र्यपूर्व काळात सदाशिव पेठेत राहणार्‍या या कुटुंबाच्या घरात अठरापगड जातीच्या लोकांना सहज प्रवेश होता. विमल तर घरातील मोलकरीण, अगदी सफाई कर्मचारी महिलांनाही भजन शिकवत. त्यांचा भजनाचा कार्यक्रम पुण्याच्या सुप्रसिद्ध दगडूशेठ गणपतीच्या गणेशोत्सवामध्येही केला जाई. गोळे कुटुंब प्रत्येक अडल्यानडल्या व्यक्तीला मदत करत असे. हे सुनीता यांनी अनुभवलेले. पुढे पती मधुकर हेसुद्धा सामाजिक भान असलेलेच लाभले. सुनीता यांचे सासरे बापु देवधर हे साहित्यिक. दिव्यांगांना ते सढळ हस्ते मदत करत. ते सुनीता यांना सांगत, “तू दृष्टिहीन लोकांना नेहमी मदत कर. त्यांना मदत करताना एकच विचार कर की, एक मिनिट तुझे डोळे बंद करून तू काही काम करू शकतेस का? नाही ना? पण, अंध बांधव जगतात. काम करतात. त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे.” सासरेबुवांचा हा संदेश सुनीता यांनी मानला. त्यातूनच पुढे ‘महाराष्ट्र सेवा संघा’च्या ‘दृष्टी सेवा’ या दृष्टिहिन विद्यार्थ्यांच्या शाळेच्या प्रमुख म्हणूनही त्या कित्येक वर्षे काम करत आहेत. जगभर सफारी केलेल्या सुनीता यांचे विचार आणि व्यक्तिमत्त्व आजही जमिनीशी जोडलेले आहे. या मातीचे आपण देणे लागतो, ते फेडलेच पाहिजे, असे सुनीता यांचे मत. सुनीता देवधरांसारखे व्यक्तिमत्त्व या समाजाचे वैभव आहेत, हेच खरे!
 
Powered By Sangraha 9.0