मी चेअरमन होण्यापूर्वीच जमिनीचा व्यवहार : प्रशांत ठाकूर

28 Mar 2022 20:15:59

Prashant Thakur
 
 
मुंबई : नगर विकास विभागाने भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पत्नी वर्षा ठाकूर यांच्या नावावरील ३०० कोटींचा भूखंड रद्द केल्याचे वृत्त आहे. मात्र, 'अजून मला सरकारकडून किंवा संबंधित यंत्रणेकडून कोणताही आदेश किंवा पत्र प्राप्त झालेलं नाही. जर असे काही आदेश निघाले असतील तर ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा महाविकास आघाडी सरकारवर थेट आरोप' भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना केला. 'जे काही वाटप आणि प्रक्रिया २०२० साली झालेली आहे. त्याच्यात सिडकोने जमिनीचा प्रत्यक्ष ताबा २०१७ ला घेतला आहे. या प्रक्रियेत माझ्या संदर्भातील आदेश आत्ता २०२२ मध्ये निघतो याचा अर्थ मुद्दाम शोध घेऊन हे प्रकरण उकरण्यात आलेलं आहे', असेही ते म्हणाले.
 
 
'माझ्या पत्नीच्या नावाची जी जमीन ही नवी मुंबई विमतळाच्या क्षेत्रात होती. त्या जमिनीची आवश्यकता सिडकोला विमानतळाच्या पुनर्वसच्या कामाला लागणार होती. त्यासाठी २०१७ मध्ये या जागेचा ऍडव्हान्स पझेशन घेतलं. मी सिडकोचा चेअरमन सप्टेंबर २०१८ मध्ये झालो. त्याच्या एकवर्ष आधीच सिडकोने या जागेचा ताबा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी घेतला होता. त्या विमानतळाच्या परिसरात सिडकोची योजना आहे की, एखाद्या जागेचा मोबदला पैशांच्या स्वरूपात न देता विकसित भूखंडाच्या स्वरूपात द्यायचा. म्हणून साडेबावीस टक्के विकसित भूखंड जो मोबदल्याच्या स्वरूपात मिळणार होता त्याच्या पोटी मला ही जागा मिळाली होती. त्यामुळे ही जागा सिडकोने मला देयच आहे. ते मिळवण्याच्या दृष्टिकोनातून मी काही विशेष प्रयत्न केले नाहीत. चालू पद्धती प्रमाणेच हे भूखंड देण्यात आले होते'. असेही प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले.
 
 
दरम्यान, 'यासंदर्भात नियमप्रक्रिया डावलून केलं जातंय हे जे काही आरोप होत आहेत. नियमप्रक्रिया जशी सिडकोच्या या विमानतळ पुनर्वसनच्या बाबतीत राबवली जाते त्याला अनुसरूनच ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहेत. उलट हे पुनर्वसनाच्या धोरणानुसार मला खूप आधीच हे भूखंड मिळायला पाहिजे होते. पण भूखंड मिळता मिळता २०१९ वर्ष उजाडलं. आधी माझी जमीन ताब्यात घेण्यात आली कारण सिडकोला पुनर्वसन करायचं होतं नंतर मला मोबदला मिळत आहे. माझ्या चेअरमन पदाचा कुठेही मी फायदा घेतलेला नाही. यामध्ये कोणत्याही पद्धतीचा गैरप्रकार झालेला नाही. त्यामुळे शासनाचे पत्रक जेव्हा मिळेल तेव्हा मला न्यायालयीन प्रक्रिया अवलंबवावी लागेल'. असं आरोपांवर उत्तर देताना प्रशांत ठाकूर म्हणाले.
 
Powered By Sangraha 9.0