नवी दिल्ली: भारतातील अभियांत्रिकी, आरोग्य, टेलिकॉम या क्षेत्रांमध्ये आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत १ कोटी २० लाख नव्या रोजगारांची निर्मिती होणार असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. टीमलीज डिजिटल या संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. या क्षेत्रांमध्ये उच्च दर्जाची कौशल्ये असणाऱ्या, तज्ज्ञ लोकांची गरज १७ टक्क्यांनी वाढेल असे या अहवालात म्हटले आहे. या क्षेत्रांतील ७५० तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करून हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
अहवालात म्हटल्यानुसार अभियांत्रिकी, आरोग्य, टेलिकॉम या क्षेत्रांत तयार होणाऱ्या रोजगारांची संख्या २५- २७ टक्क्यांनी वाढणार आहे. भारतातील एकूण रोजगाराच्या ८-९ टक्के रोजगार फक्त या तीन क्षेत्रांतच तयार होतील. या नवीन रोजगारांच्या बरोबरीने कंत्राटी पद्धतींने काम करणाऱ्यांची संख्यासुद्धा लक्षणीयरित्या वाढणार आहे. तसेच देशातील नवीन पिढी ही नवीन नवीन क्षेत्रांचा अनुभव घेण्यास उत्सुक आहे. या सर्व गोष्टींमुळे नवीन कौशल्यांची,ती आत्मसात करणाऱ्यांची मागणी भविष्यात वाढणार आहे.