ओवी हे महाराष्ट्राच्या स्त्री साहित्याचे वैभव. स्त्रियांनी केलेल्या या ओव्या म्हणजे स्त्री साहित्य निर्मितीचा आरंभ आहे. या ओव्या म्हणजे स्त्री मनाचा हुंकार आहे. स्त्री जीवनाच्या प्रत्येक पैलूवर, पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर या ओव्या रचल्या गेल्या. या ओव्या काही फक्त सणवार, लग्नसोहळे यापुरत्याच मर्यादित नसून त्यात दैनंदिन सामाजिक घटनांचे पडसादही उमटलेले दिसतात. त्या घटना या ओव्यांमध्ये स्त्रियांनी नोंदवून ठेवल्या आहेत. त्याचे हे शब्दचित्रण...
स्वातंत्र्याप्राप्तीपूर्वीचा काळ हा अत्यंत भारलेला होता. घराघरात त्या चळवळींचे, लढ्यांचे पडसाद उमटत होते. त्यातूनच मग पहाटेच्या वेळी त्या घटना स्त्रियांच्या ओव्यांत नोंदविल्या गेल्या, याचे फार कौतुक वाटते. लोकमान्य टिळकांचे कार्य जोरात सुरू होते. घराच्या ओसर्यांवर चर्चा झडत. माजघरातून जे काही थोडेफार ऐकायला येई, ते मनात साठविले जाई. दुसर्या दिवशी पहाटे मग ते ओव्यातून ओवले जाई. पुढील ओवी बघा-
पुण्याची पुण्याई। पुन्हा ग देही।
मूर्ती सावळी जन्मली। टिळकांची॥
ही ओवी रचणार्या स्त्रीचे सारे विश्व पुणे होते. पण, टिळक हे सगळ्या हिंदुस्थानच्या माथ्याचा मंगलतिलक होऊन उदयाला आले आहेत. याचीही या स्त्रीला चांगली कल्पना होती. ती पुढे म्हणते,
देशाचे वैभव। पुन्हा दिसेल ठळक।
आता आहे टिळक। देशभक्त॥
स्वदेशीचा मंत्र लोकमान्यांनी महाराष्ट्रभर केला. गावोगावी स्त्री-पुरूषांनी स्वदेशीच्या शपथा घेतल्या, त्यावेळचे वातावरण तीव्र भावनांचे होते. दोन स्त्रियांनी स्वदेशी वस्त्रे वापरण्याचा निर्धार केला. सौभाग्य लेणे असलेल्या बांगड्या त्या परदेशी काचेच्या आहेत, म्हणून काढून टाकल्या. ही फार मोठी गोष्ट होती.
स्वदेशीचा मंत्र। लोकमान्य देती।
मिळेल त्याने मुक्ती। हिंदुस्थाना॥
बायांनो नटू नका। परदेशी ग चिटाने।
बुडती कारखाने। साळियांचे॥
विदेशी बांगडी। नको भरू ग हातात॥
अज्ञान देशात। चोहीकडे॥
१९०८ सालचा तो काळ होता. साखर आपल्या देशात तयार होत नव्हती. मॉरिशसची साखर आपल्या देशात येत असे. त्याला ‘मोरस साखर’ म्हणत असत. म्हणून स्त्रियांनी चहा घेणे बंद केले. कारण, चहाच्या कपबशाही परदेशातूनच येत असत. त्यावरील ही ओवी बघा-
चहाचे व्यसन। दारूच्या बरोबरी।
कपबशा घरोघरी। खुळखुळती॥
लोकमान्य टिळक मंडालेला तुरूंगात होते. घरोघरी चिंतेचे वातावरण होते. “त्यांना मंडालेची हवा सहन होत नाही! प्रकृती क्षीण झाली आहे,” अशा वार्ता देशात येत होत्या. एके दिवशी अचानक लोकमान्यांना मुक्त केले गेले. मध्यरात्री त्यांना पोलिसांच्या बंदिस्त गाडीतून त्यांच्या वाड्याबाहेर पोहोचवून देण्यात आले. सगळीकडे आनंदवार्ता गेली. स्त्रियांच्या मनातही आनंदाचे भरते आले. त्याची ही सुंदर ओवी बघा-
टिळक सुटले। रात्रीचे साडेबारा।
मग देशोदेशी गेल्या तारा। देशभक्ता॥
टिळक सुटलेे। रात्रीचे साडेअकरा।
घरोघरी साखरा। वाटियेल्या॥
माझ्या दारावरून। कोण गेले ग गरजत।
जयजयकार करीत। टिळकांचा॥
असा तो प्रसंग या चार ओव्यांतून आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो ते पाहा! असे या ओव्यांचे सामर्थ्य आहे. त्यावेळी ‘खांडसरी’ ही देशी साखर सगळेजण वापरीत, हे मला यावेळी आवर्जून सांगावेसे वाटले. इंग्रजांच्या कुटिल राजकारणाचीही या स्त्रियांना माहिती होती. याची साक्ष पुढील ओवी देते.
इंग्रजांच्या नीती। फोडा आणि झोडा।
पंतांनी नेसला। खादीचा धोतरजोडा॥
स्वदेशीची चळवळ जोरात सुरू होती. वातावरण तापले होते. सत्याग्रही मुले लाठ्या खात होती. घरातल्या स्त्रियांनाही त्याचे चटके बसत होते. त्या म्हणतात,
देशाच्या सत्याग्रही। उडे आधणाचे पाणी।
परि माझ्या भगिनी। मानती हे फुलावाणी॥
सगळ्या स्त्रिया धीट झाल्या. स्वराज्याची चळवळ पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या पुढे नेऊ लागल्या.
बाया झाल्या धीट। त्यांची गेली भीती।
हातात झेंडा घेती। स्वराज्याचा॥
स्वराज्य स्वराज्य म्हणू लागले सारे।
लोक जखमी झाले। लाठीच्या मारे॥
इतके लोक धीट झाले. मुली फुगडी खेळताना म्हणू लागल्या-
आम्ही दोघी मैत्रिणी जोडीच्या
अंगात चोळ्या। खादीच्या॥
लोकांची भीती गेली. स्वातंत्र्याची चळवळ तळागाळात गेली. बायामाणसात मुलाबाळात गेली. त्या अर्थाने देशाच्या रोमारोमात भिनली. ‘वंदे मातरम्’चा नारा चहुदिशांना घुमू लागला
उठली मुलेबाळे। त्यांना भीती कशी नाही॥
वंदे मातरम् दिशा दाही। घुमतसे
‘वंदे मातरम्’ या मंत्राचे गारुड लोकांवर कसे झाले होते, हे या ओवीत नोंदवून ठेवले आहे. त्यांनी रचलेल्या असंख्य ओव्या नष्टच झाल्या. एकीने रचल्या, अनेकांनी ऐकल्या. बर्याचजणींनी मुखोद्गत केल्या. अशा या ओव्या थोड्याफार टिकल्या. त्यातल्या ज्या काही माझ्या हाती लागल्या, त्या तुमच्या समोर ठेवल्या आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात या स्त्रीवाड्.मयाचे महत्त्व फार मोठे आहे. त्या अनामिक कवियत्रींचे, त्यांच्यातील काव्यशक्तीचे आपण खूप कौतुक करूया, त्यांना प्रणाम करूया, अशी ही माझी त्या अनामिक स्त्रियांनी ओव्यात वर्णिलेली साठा उत्तरांची गीते माझ्या पाचा उत्तरात सुफळ संपूर्ण करते.
- राधा गानू