सांगली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगली-सोलापूर शहरांना रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या बोरगाव-वाटंबरे राष्ट्रीय महामार्ग १६६ आणि सानंद जत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६५ या दोन महामार्गांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी, "आपल्या देशातला शेतकरी पेट्रोल-डिझेलचा , ऊर्जेचा पर्याय देण्यास सक्षम असून शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे." अशी इच्छा व्यक्त केली.
पुढे त्यांनी म्हंटले की, "आगामी काळात साखरेऐवजी इथेनॉल आणि बगासपासून बिटूमीन बनवायला प्राधान्य द्यायला हवे. बिट्यूमिनचे रस्ते आता आम्ही तयार करत असून पुण्याच्या प्राज इंडस्ट्रीने उसाच्या चिपाडापासून आणि बायोमासपासून बायो -बिट्यूमिन तयार केलं आहे. येणारा काळ बिट्यूमिनचा असून राष्ट्रीय महामार्गांच्या बांधणीत ते अनिवार्य करण्याचा विचार सुरू आहे." अशी माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्तात्रय भारणे आणि सहकार ,कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम तसेच खासदार संजयकाका पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील सर्व वस्तू थेट निर्यात करता याव्यात यासाठी सांगली जिल्हावासीयांची मागणी असलेले ड्राय पोर्ट उभारण्याबरोबर सॅटेलाईट पोर्ट तसेच लॉजिस्टिक पार्क बांधण्याची केंद्र सरकारची तयारी असल्याचे गडकरी यांनी सांगितले.