युरोपचा काळा इतिहास

26 Mar 2022 11:18:55

europe
ट्रान्स-अटलांटिकमधून प्रवास केलेल्या आणि बळी गेलेल्या गुलांमाच्या आठवणीसाठीही एक आंतरराष्ट्रीय दिवस संयुक्त राष्ट्राने ठरवला आहे. तो दिवस आहे दि. २५ मार्च. सोळाव्या शतकात युरोपमध्ये इंग्लंड असू दे, पोर्तुगाल असू दे, फ्रान्स असू दे की, इतरही अनेक छोटे-मोठे देश, त्यांनी जगभरातल्या इतर देशांवर अतिक्रमण करण्याचा सपाटा चालवला होता. व्यापाराच्या वेशात जाणारे हे युरोपीय देश इतर संपन्न देशांवर सत्ता गाजवायचे. व्यापार संपत्ती कमावण्याच्या नादात युरोपने अतिक्रमण केलेल्या देशावर अतोनात अत्याचार केले. हे अत्याचार धार्मिक, सामाजिक आणि मुख्यतः आर्थिक होते. आपली संपत्ती वाढवण्यासाठी त्यांनी माणसासारख्या माणसालाही गुलाम केले. ही गुलामी इतकी भयंकर होती की, त्याबद्दल बोलताना, लिहिताना या युरोपीय देशाबाबत आजही घृणा वाटेल. सर्वच युरोपीय देशांनी जगभरात चहा, कापूस इतर शेती आणि खनिज खाणी यावर कब्जा मिळवला. तिथे काम करण्यासाठी त्यांना मजदूर हवे होते. पण, मजदूर कामाला ठेवायचे म्हणजे त्यांना वेतन, सुविधा वगैरे सगळे द्यावेच लागणार. या युरोपीय देशांनी मग सैतानालाही लाजवेल असे निर्णय घेतले. त्यांनी पाहिले की, आफ्रिका खंडातील लोक निसर्गाशी झुंज देत प्रचंड कष्ट करतात. त्यांना नागरी सुविधांचा वाराही लागलेला नाही. ते आदिम काळातच जगत आहेत. या आफ्रिकेच्या लोकांना फसवून, घाबरवून मजदूर बनवणे सोपे होते. नव्याने देश म्हणून वसलेल्या अमेरिकेमध्ये मजदूर किंवा इतर स्तरावर काम करणार्‍या माणसांची कमी होती. युरोपीय देशांनी लाखो आफ्रिकन पुरुष, महिला आणि बालकांना अमेरिकेमध्ये अक्षरशः बंदी बनवून नेले. आफ्रिकेतून सागरीमार्गाद्वारे अमेरिकेमध्ये या लाखो लोकांना नेले गेले.
 
 
बोटींमध्ये अडगळीचे सामान भरावे तसे या लोकांना अक्षरशः बोटीवर फेकले गेले. ते जिवंत राहावेत म्हणून त्यांना पोटापुरते अन्न दिले जाई. या सागरी प्रवासात त्यावेळी हजारो आफ्रिकन अमेरिकेला पोहोचण्याआधीच मृत्युमुखी पडले. मृत पावल्यानंतर तिथेच त्यांना समुद्रात फेकून देण्यात आले. तेही त्याच्या आप्तांच्या समोर. या सगळ्या लोकांना मानवी हक्क नाकारले गेले. पुरुषांपेक्षा महिलांचे हाल तर शब्दातीत झाले. बोटीवर, प्रवासादरम्यान महिलांचे बालिकांचे लैंगिक शोषण केले गेले. जबरदस्तीने गुलाम बनवल्या गेलेल्या या सगळ्यांचे एक सुंदर भावनाशील जग होते. पण, युरोपीय देशांनी या आफ्रिकन लोकांचे भावविश्व कुटुंब समाज आणि जगणेच नरक बनवले. लाखो लोकांना त्यांच्या इच्छेविरूद्ध त्या कामात गुंतवण्याचा अधिकार या युरोपीय देशांना कुणी दिला होता? एकट्या इंग्लंडने सोळाव्या ते सतराव्या शतकादरम्यान ३० लाख लोकांना गुलाम बनवले. त्या गुलामांचा व्यापार केला. तसेच, पुढे सतराव्या व अठराव्या शतकात ‘डच ईस्ट इंडिया कंपनी’ने आग्नेय आशियात पाच लाख गुलामांची विक्री केली होती. पुढे अमेरिकेत गेलेल्या आफ्रिकन लोकांना अमेरिकेचे नैसर्गिक वातावरण मानवले नाही.
 
त्यामुळे अमेरिकेत त्यांचा मृत्यू झाला. या सगळ्यांची काय चूक होती? काय गुन्हा होता? या सगळ्या मरणयातनातून वाचलेल्या लोकांना अमेरिकेत शेतमळ्यावर किंवा खनिज खाणीवर मजदूर म्हणून नेमले गेले. या मजदूरांच्या वसाहती वसवल्या गेल्या. २०-२० तास त्यांच्याकडून काम करून घेतले जाई. एक-दोन तास विश्रांतीसाठी बंकरसारखी एखादी जागा असे. यांना केवळ दोन वेळचे अन्न दिले जाई. बस त्या मोबदल्यात यांनी काम करायचे. ही माणसं मेली, तर पुढे कोण काम करणार? यासाठी मग या बंदी गुलामांना अशाच गुलाम आफ्रिकन महिलांसोबत राहण्याची सुविधा मिळाली. या महिलाही कोण, तर ज्या कुठे विकल्या गेल्या नाहीत, ज्यांना कुणी खरेदी केले नाही त्या! त्यांनी मूलं जन्माला घालायची. जन्माला आलेली मूलं ही जन्मत:च गुलाम असत. त्यांची लोकसंख्या वाढेल, या भीतीने मग युरोपीय पुरुषांना इथे पाठवण्यात येऊ लागले. या पुरुषांनी इथल्या बायकांवर अत्याचार करून गोर्‍या मुलांना जन्म द्यावा म्हणून. पाश्चात्त्य देशांचा किती हा भयंकर आणि काळा इतिहास. या काळ्या इतिहासाचे क्रौर्य आणि अमानुषता कधीही मिटू शकत नाही. पुढे २००७ साली संयुक्त राष्ट्राने दि. २५ मार्च हा दिवस या गुलामांच्या स्मृतिप्रित्यर्थ ठरवला. मानवतेला काळिमा फासणारा हा युरोपचा काळा इतिहास केवळ ‘आंतरराष्ट्रीय दिन’ ठरवून विसरला जाऊ शकतो का?
Powered By Sangraha 9.0