भारत – चीनदरम्यानचे संबंध सीमाप्रश्न सुटेपर्यंत सुधारणार नाहीत – परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

25 Mar 2022 17:13:11
eam

चीनी परराष्ट्र मंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : सीमेवर मोठ्या संख्येने सैन्य तैनात केल्यामुळे भारत आणि चीनमधील संबंध सध्या सामान्य राहिलेले नाहीत. सीमेवर सैन्य जमविणे हे दोन्ही देशांदरम्यानच्या १९९३ – ९६ च्या कराराचे उल्लंघन आहे. त्यामुळे जोपर्यंत सीमाप्रश्न निकाली निघत नाही, तोपर्यंत दोन्ही देशांदरम्यानचे संबंध सुरळीत होणे शक्य नाही, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषदेत केले.
 
 
पूर्व लडाखमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे गुरुवारी भारतात दाखल झाले. त्यांनी शुक्रवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांची भेट घेतली.
 
 
 
 
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि वांग यी यांच्यादरम्यान सुमारे तीन तास बैठक झाली. बैठकीनंतर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पत्रकारपरिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, १९९३ – ९६ च्या कराराचे स्पष्टपणे उल्लंघन झाले असून सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सध्या सुरळीत नाहीत, हे स्पष्ट आहे. सध्या दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये अतिशय धीम्या गतीने प्रगती होत असून जोपर्यंत सीमावाद निकाली निघत नाही, तोपर्यंत दोन्ही देशांमधील संबंध सुरळीत होणे शक्य नाही. एप्रिल २०२० मध्ये चीनकडून झालेल्या आगळिकीमुळे दोन्ही देशांमधील संबंधामध्ये अडथळे निर्माण झाल्याचे वांग यी यांना सांगितल्याचे एस. जयशंकर म्हणाले.
 
 
मुस्लिम राष्ट्रांच्या परिषदेत (ओआयसी) चीनने जम्मू – काश्मीरविषयी केलेल्या वक्तव्याचा भारतातर्फे निषेध करण्यात आल्याचे कारण पुन्हा एकदा वांग यी यांच्यासमोर मांडल्याचे जयशंकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, चीनसोबत पाकिस्तानच्या दहशतवादाविषयी चर्चा झाली असून क्वाडविषयी कोणत्याही प्रकारचा मुद्दा चर्चेत आला नसल्याचेही जयशंकर यांनी स्पष्ट केले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0